अभिनंदन ग्रंथ - राजकीय सहयात्री - 4

श्री. यशवंराव चव्हाण हे नव्या द्वैभाषिक राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा अनेकांच्या मुखांतून उद्गार निघाले की, वयाच्या मानाने फार लवकर या अशा मानाच्या अधिकाराच्या मोठ्या पदवीस यशवंतराव पोचले; अवघ्या त्रेचाळिसाव्या वर्षी एवढ्या अधिकारावर आरुढ झालेला या देशांत दुसरा कोणी विद्यमान नाही. परंतु जरा विचार केला तर या गोष्टीचा नीट उलगडा होऊं शकतो. केवळ जन्मापासूनच्या वयाचा विचार न करतां त्यांच्या राजकीय वयाचा, म्हणजे प्रत्यक्ष राजकारणांत त्यांनी किती वर्षे जबाबदारी घेऊन कामें केलीं याचा विचार केला तर ही गोष्ट क्रमप्राप्तच होती, असेंहि एक प्रकारें म्हणतां येतें.

वयाच्या सोळाव्या वर्षीच ते भारताच्या स्वातंत्र्यसमरांत सामील झाले. गेलीं सव्वीस वर्षे ते राजकारण करीत आहेत. भारताच्या आधुनिक राजकीय इतिहासांतील अत्यंत महत्त्वाची अशीं स्वातंत्र्यपूर्वकालांतील दोन पर्वे व स्वातंत्र्योत्तरकालांतील दोन पर्वे त्यांच्या राजकीय जीवनाशीं संलग्न आहेत. इतिहास हा काळाची लांबी घड्याळाच्या लबकाच्या आंदोलनाने किवा पंचांगाने केवळ मोजत नसतो; त्यांत महत्त्वाच्या वैशिष्टयपूर्ण असलेल्या घटनांच्या योगानेच काळाचे दीर्घत्व वा हस्वत्व इतिहास ठरवीत असतो. फार विलक्षण अशा घटनांनी १९३० सालापासूनच काळ भरलेला आहे. या २६ वर्षांच्या अवधींत यशवंतरावांनी सर्वस्वी राजकारणांत भाग घेतला. हा काल त्यापूर्वीच्या ७० वर्षांच्या कालापेक्षा अधिक प्रगमनशील व वैचित्र्ययुक्त असा घडला आहे. या काळांत ज्यांनी राजकीय जीवनाचा अनुभव घेतला त्यांना तो अनुभव फार संपन्न आहे, याची खात्री होईल. मात्र अशा संपन्न अनुभवापासून शिक्षण घेण्याची योग्यता पाहिजे; अशी पात्रता व योग्यता यशवंतरावांच्या ठिकाणीं आहे. वस्तुत: वरील कालखंडांतील राजकारणांत प्रत्यक्ष भाग घेतलेले पुष्कळ आहेत; परंतु त्यापासून शहाणपणा शिकलेले फार थोडे आहेत. त्या थोड्यापैकी यशवंतराव एक महत्त्वाचे गृहस्थ आहेत.

उपकारक सामाजिक पार्श्वभूमि

बहुजनसमाजांतील गरीब शेतकरी कुटुंबांत जन्म, अत्यंत प्रयासानें हालअपेष्टा सोसूनहि नवशिक्षण घेण्याची तळमळ, भोवतालीं चाललेल्या राष्ट्रीय व जागतिक घडामोडी जाणण्याची तीव्र जिज्ञासा, आधुनिक ध्येयवादांचें आकर्षण, राजकीय संगरांत होण्याची नित्य तयारी इत्यादि गोष्टींमुळेच यशवंतरावांच्या व्यक्तित्वाची वैशिष्टयपूर्ण घडण झाली आहे. बहुजनसमाजांत जन्मून नवशिक्षण घेतलेल्या आणि राजकीय जीवनाचा दीर्घ अनुभव असलेल्या हातावर मोजण्याइतक्याच व्यक्ती मराठी भाषिक प्रदेशांत आढळतात. त्यांच्यांत अगदी वरच्या क्रमांकात यशवंतरावांची गणना करावी लागते. यशवंतरावांची सामाजिक पार्श्वभूमि त्यांच्या उत्कर्षास कारणीभूत झालेल्या गोष्टींपैकी एक अंश आहे. पांढरपशांत वा ब्राह्मणांत जन्मलेल्या राजकीय व्यक्तींपेक्षा यशवंतरावांची ही सामाजिक पार्श्वभूमि त्यांना अत्यंत अनुकूल अशीच लाभलेली आहे. परंतु तेवढ्यामुळेच त्यांचे महत्त्व स्थापित झालेले नाही. त्यांचे राजकीय कार्यक्षेत्र व त्यांत काम करतांना त्यांनी वैचारिक दृष्ट्या मिळविलेली पात्रता याहि गोष्टी सामाजिक पार्श्वभूमीबरोबरच जमेस धराव्या लागतात.

चव्हाणांचे राजकीय कार्यक्षेत्र पुण्यापासून कोल्हापूरपर्यंतचा प्रवेश व विशेषत: सातारा जिल्हा होय. हें महाराष्ट्रांतील वर्तमान युगांतील फार मोठ्या सामाजिक अंतर्विग्रहाचें केंद्रस्थान होय. १९९० ते १९५० पर्यंतच्या कालखंडांत याच प्रदेशांत सत्यशोधक समाजाची किंवा ब्राह्मणेतर-वादाची चळवळ नांवारुपास येऊन फोफावली. मात्र या चळवळींत स्वत: यशवंतराव प्रत्यक्षपणे कधीच शिरले नाहीत किवा त्या चळवळींतील विकृत जातिद्वेषाचाहि संस्कार त्यांनी आपल्या मनावर होऊ दिला नाही. त्या चळवळीपासून वा तिच्यांतील दोषांपासून ते अलिप्त राहिले. परंतु त्या चळवळीत निर्माण झालेल्या सामाजिक जाणिवेचा व बहुजनसमाजाच्या सामाजिक अवनतिविषयक प्रश्नाचा त्यांच्याहि मनावर परिणाम झाला. ते त्या चळवळींत सामील झाले नाहीत, हा कांही केवळ योगायोग नव्हे. त्या चळवळीवर मात करणारी अशी भारतव्यापी राजकीय चळवळ तीस सालीं महात्मा गांधींनी निर्माण केली. त्या चळवळींत यशवंतराव लहान वयांत, माध्यमिक शिक्षण पुरें होण्याच्या आंत ओढले गेले. सत्यशोधक चळवळीचा त्यांना अप्रत्यक्ष उपयोग झाला. तो म्हणजे ध्येयवाद व तत्संबंधी विचारसरणी कशा प्रकारची असावी, या गोष्टी समजण्याकरितां. क्रांतिकारक विचारसरणी आणि समाजवादी ध्येयवाद त्यांनी त्यामुळें अंगीकारिला. विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्क्सवादावर आधारलेल्या एम्. एन्. रॉय यांच्या मानवतावादी विचारसरणीचा आदरपूर्वक अभ्यास त्यांनी केला. या अभ्यासामुळे स्वतंत्रपणे सामाजिक व राजकीय प्रश्नांची मीमांसा करण्याची पात्रता त्यांना प्राप्त झाली. दुधांत साखर पडावी त्याप्रमाणे त्यांना बहुजनसमाजांतील जन्मामुळे त्यांच्या जीवनाशीं एकरुपता लाभली व नवशिक्षणामुळे जीवनाचा अर्थ समजण्याची योग्यता आली.