अभिनंदन ग्रंथ - राजकीय सहयात्री - 2

माझा पुन: काँग्रेसप्रवेश व श्री. चव्हाणांशी सहकार्य

या निवडणुकीनंतर पुणे येथील काँग्रेस भवनांत प्रांतिक काँग्रेसची साधारण सभेची पहिली बैठक भरली. दरवाजावर श्री. भाऊसाहेब हिरे उभे होते. त्यांनी माझे मोठ्या आनंदाने स्वागत केलें. परंतु आंत बैठकींत गेल्यावर अनेक मंडळींना मी परत आलेलो पाहून बरें वाटलें नसावें, असें त्यांच्या चेह-यावरून व कित्येकांच्या "आलांत?" या खोचक प्रश्नावरून दिसून आलें. मी श्री. चव्हाण यांच्या नकळत त्यांच्या पाठीशीं जाऊन बसलों. त्यांच्या हें मागाहून लक्षात आलें. त्यांनी सस्मित मुद्रेने मागे वळून मला म्हटलें की, 'पुढे या, पाठीमागे कां?' मी चटदिशी उत्तर दिलें कीं, 'मी पाठीशीं राहण्याकरतांच आलों आहें.' माझे शेजारी माझे परम मित्र श्री. किसनवीर होते. त्यांनी माझे हें वाक्य ऐकून माझ्या पाठीवर थाप मारली.

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नुकतेंच एक प्रकरण घडलें होतें. राजे श्री. मालोजीराव निंबाळकर व श्री. गणपतराव तपासे यांना श्री. मुरारजी भाई देसाई यांनी मंत्रिमंडळांत घेतल्याबद्दल कांही महाराष्ट्र काँग्रेसचे नेते नाखूप होते. श्री. मुरारजीभाई यांनी मुख्य मंत्री या नात्याने आपलें मंत्रिमंडळ स्वत:ची सोय पाहून निवडलें होतें, हें घटनाशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत योग्य झालें आहे, असें माझे मत होतें. श्री. चव्हाण यांनी श्री. मुरारजीभाईच्या या संचाला संमति दिल्यामुळे महाराष्ट्रीय नेत्यांच्या गटांत त्यांच्याबद्दल नाखुषी होती. मी मुरारजीभाईंच्य मताचा होतों ही गोष्ट श्री. चव्हाण यांना माहीत नसेल; परंतु श्री. किसनवीर यांस माहीत होती.

संघटना व राज्यघटना यांच्याशी इमान

संघटना व भारताची राज्यघटना यांच्यावरील चव्हाणांच्या श्रद्धेची कसोटी लागण्याचे असे प्रसंग वेळोवेळी येऊ लागले. त्या त्या वेळीं या कसोटीस श्री चव्हाण पुरेपूर उतरले. याची साक्ष हा अगोदरचा इतिहास व नंतरचा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा संग्राममय इतिहास उच्च स्वराने श्री. चव्हाणांच्या बाजूनेच देतो. त्याकरिता त्यांच्यावर वाटेल ते वाकडे-तिकडे आरोप केले गेले गैरसमज पसरविण्यात आले.निंदा उपहास, बहिष्कार, धिक्कार व अधिक्षेप करणा-या अनेक अग्निदिव्यांमधून श्री. चव्हाम यांना या निष्ठेकरिता जावें लागलें.

१९५५-५६ साल हें राज्य-पुनर्रचनेच्या प्रचंड आंदोलनाचें साल होय. महाराष्ट्रांतील राजकारणांत प्रचंड उलथापालथी याच वेळीं झाल्या. काँग्रेस संघटनेवर प्राणघातक प्रहार या वेळींच पडले. या कालखंडापासूनच महाराष्ट्र राजकारणांतील श्री. चव्हाणपर्व सुरू झालें, असें म्हणतां येईल. कर्णाच्या रथाप्रमाणे काँग्रेसच्या रथाचे चाक महाराष्ट्र भूमीने गिळले होतें. परंतु सुदैवाने या पर्वाचा कर्णपर्वाप्रमाणे शेवट झाला नाही. श्री. चव्हाण व त्यांचे सहकारी यांचा तेजोभंग करणारे शेकडो शल्य महाराष्ट्रभर निर्माण झाले. तीक्ष्ण अशा अधिक्षेपरूप शल्यांचा मर्मभेदी वर्षाव श्री. चव्हाणांवर होऊ लागला. पुण्यांत नगरपालिकेच्या एक रंगमंचाचा उद्घाटनसमारंभ श्री. चव्हाणांच्या हस्ते झाला. त्यावेळीं त्यांच्या सभेवर कडक बहिष्कार पडला. रस्त्यावर दुतर्फा धिक्कार करणा-या हजारों स्त्रीपुरुषांच्या रांगा लागल्या होत्या. मित्रांच्या एका खाजगी बैठकींत स्वत:वर झालेल्या या हल्ल्याचें निवेदन करीत असतांना श्री. चव्हाणांच्या डोळ्यांतून अनिवारपणे अश्रूहि ओघळले. त्यांचे चित्त विव्हल होतें. परंतु चलित होत नाही. कारण राष्ट्रनिष्ठेचा बळकट आधार आहे. या प्रसंगी काँग्रेस घटनेमधील श्री. हिरे-चव्हाण मतभेद पूर्ण उघडकीस येऊन चव्हाट्यावर आले; परंतु हे मतभेद संयुक्त महाराष्ट्राच्या ध्येयाबद्दल नव्हते. पद्धतीबद्दल व तें ध्येय मिळविण्याच्या साधनांबद्दल होते. काँग्रेस संघटना व काँग्रेसचे नेतृत्व ज्याच्या योगाने निर्बल होणार नाही अशीच साधन व अशीच पद्धति मान्य करणार, असा श्री. चव्हाण यांचा दावा होता. कारण सध्या तरी या संघटनेवरच सर्व राष्ट्राची मदार व जबाबदारी आहे. राष्ट्राची जबाबदारी वहाणारी दुसरी कोणतीच व्यापक संघटना देशांत आज उभी नाही. राष्ट्राच्या सुरक्षितेकरितां काँग्रेस ही बलशाली राहिलीच पाहिजे. काँग्रेसचें बळ म्हणजे श्री. नेहरुंचे नेतृत्व,असें समीकरण त्यांनी मांडले. या विचाराने प्रेरित होऊनच संघटनेच्या नीतिशास्त्राचें परिपूर्ण पालन श्री. चव्हाण यांनी आणीबाणीच्या प्रसंगी केलें.