यशवंतराव चव्हाण (6)

‘हजार लोकवस्तीच्या एवढ्याशा खेड्यात कसं राहता?’
‘घरी सगळे अशिक्षित आहेत तर हा छंद कसा जडला?’
‘छंद जडला त्यापेक्षा तो इतका चांगला कसा वाढविला?’
‘थोडीशीच बरड शेती. घरातली प्रतिकूल स्थिती-’
‘शेतीत काय पिकवता? किती माणसांचं कुटुंब?’
अशी आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांनी माझा पत्ता लिहून घेतला.

मी फारच कमी बोलत होतो व घाबरत होतो, हे त्यांच्या लक्षात आलं होतं. त्यांनी मला मुलासारखं खूप जवळ मायेनं घेतलं. विश्वास दिला. त्यांच्या प्रेमात कायम बांधून ठेवलं.

आता आपण कायम भेटत राहणार असं ते म्हणाले. काहीही अडचण असो संकोच न करता मला भेटा. फक्त तुमच्या कवितेकडे दुर्लक्ष करू नका असं यशवंतराव म्हणाले. इचलकरंजीच्या साहित्य संमेलनानं मला चांगली लोकप्रियता दिली. माझ्या कवितेला शक्ती दिली. रसिक, साहित्यिक जवळ केले. यशवंतरावांसारखा माणूस माझ्या वाट्याला आला. त्यांची-माझी गाठ व्हावी, चांगली ओळख व्हावी असं खूप वर्षांपासून वाटत होतं. इचलकरंजीमध्ये अशा स्थितीत भेट पक्की झाली.

२५ व २६ जानेवारी १९७५ ला माझे कार्यक्रम नरहर कुरूंदकरांनी नांदेडला बांधलेले होते. ते संपवून २६ ला रात्री नांदेडहून मी औरंगाबादेला आलो. २७ ला सकाळी घरी जायचं होतं. निघणार त्या वेळी प्रा. चंद्रकांत पाटील ह्या माझ्या मित्राच्या घरी श्री. अंकुश भालेकर मोटरागाडी घेऊन काही कामासाठी आलेले होते. ते म्हणाले. आम्ही सिल्लोडकडेच निघालो आहोत, तिथपर्यंत आमच्यासोबत चला. तसंच तुम्हाला घरी जाता येईल. सिल्लोड हा माझा तालुका व मतदारसंघ. त्याच दिवशी सिल्लोडच्या सिद्धेश्वर साखर कारखान्याचं उद्घाटन परराष्ट्रमंत्री यशवंतराव चव्हाण ह्यांच्या हातून होतं. मुख्यमंत्री वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहिते असं अर्धअधिक मंत्रिमंडळ त्या समारंभासाठी आलेलं होतं. सिद्धेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री. माणिकराव पालोदकर ह्यांनी उद्घाटनानंतर पंचवीसेक हजार लोकांची सभा बोलाविलेली होती. सगळे त्या सभेत छान बोलले. त्यानंतर लगेच ह्या पाहुणेमंडळीचं जेवण व भेटीगाठी सिल्लोडच्या विश्रामगृहावर होत्या. मोठ्या लांबलचक पोलिसांच्या लायनीतच पुढा-यांची लाईन हारतुरे घेऊ उभी होती. त्यांना हात जोडून नमस्कार करीत, भेटी घेत मुख्यमंत्री वसंतराव नाईक, यशवंतराव व इतर नेतेमंडळी व्यासपीठावरून उतरून निघालेली होती. इचलकरंजीत माझी नि यशवंतरावांची ओळख झालेली वृत्तपत्रातून अनेकांना कळलेली होती. माहीत होती. बहुसंख्य लोक मला म्हणाले, ते ठीक आहे. राजकारण्यांचं ओळख व बोलणं तात्पुरतं असतं. पुष्कळदा खोटंही असतं. एवढ्या मोठ्या ठिकाणी यशवंतराव यांनी पुन्हा विचारणं, ओळख ठेवणं शक्य नाही. लोकांच्या ह्या बोलण्यावर विश्वास ठेऊन मी भेटण्याचं टाळलं. समोर गेलोच नाही. अंकुश भालेकर, पांडुरंग व मी पोलिस लाइनीजवळ उभे असताना गर्दीत त्यांना मी नमस्कार केला.

मला पाहून यशवंतराव थांबले. वसंतराव नाईकांना जवळ बोलाविलं. माझी ओळख करून दिली. मी ज्यांच्याविषयी खूप बोललो तो हाच पोरगा- शेतक-यांचा कवी. ते मला विश्रामगृहाकडे घेऊन गेले. सगळं राजकारण व साखर कारखानदारीवरील बोलणं बंद केलं. तिथे असलेल्या सगळ्या मंत्र्यांना, पुढा-यांना माझी चांगली ओळख करून दिली.

‘ह्या नभाने या भुईला दान द्यावे
आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे’

ही माझी संपूर्ण कविता यशवंतरावांनी पाठ म्हणून दाखविली. ‘जरा अस्मान झुकले’ ह्या कवितेच्या दोन ओळी म्हणून दाखविल्या व पुढल्या ओळी मी म्हणाव्यात असा आग्रह धरला. आमचं दोघांचं काव्यवाचन सुरू झालं होतं.