यशवंतराव चव्हाण (10)

“तुम्ही कोणाला तरी सांगा, मी सगळ्या मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना भेटून थकलो. मुंबई-दिल्ली-औरंगाबाद असे हेलपाटे घालून थकलो. आमच्यामुळे ह्या खुर्च्यांवर बसलेले हे लोक आमच्यासाठी काहीएक करू शकत नाहीत. मी थकून गेलो. स्वातंत्र्यसैनिक म्हणून मला पेन्शन मिळाली तर मी जगू शकेन. माझे फार हाल आहेत. तुम्ही दिल्लीला यशवंतरावांकडे चला. माझी हात जोडून विनंती आहे.”

“हे मला अशक्य आहे.” मी फारच वैतागलो. ते नित्य यायचे. भैरवी सांगायचे.

“प्रत्येकाचं ज्याच्या-त्याच्या कामामापुरतं पाहणं व सांगणं असतं. ह्या महिन्यात चिठ्ठी नेणारे तुमही शंभराव्वे असणार. मला फार फार मुश्किल झालं. मी मूर्खासारख्या भिडस्तपणानं किती चिठ्ठी द्याव्यात? काय संबंध?” तरीही मी फार वैतागून हरीभाऊंना चिठ्ठी दिली.

हरीभाऊ दिल्लीला जाऊन यशवंतरावांना भेटले. परराष्ट्र खात्याच्या कामासाठी यशवंतराव युगोस्लाव्हियाकडे त्याच दिवशी निघायचे होते. हरीभाऊंच्या कामासाठी दोन-तीन ठिकाणी त्यांना फोन केले. गृहमंत्रालय व पंतप्रधानांना फोन केले. “ऑफिसचे लोक तुम्हांला मदत करतील ते सांगतील तसं करा व संबंधितांना भेटा. गृहखात्याशी संबंधित काही भाग आहे- कागदपत्र पाहिजेत पण संबंधित अधिकारी मदत करतील व पंतप्रधान इंदिरा गांधींची भेट घालून देतील. मी दोन-तीन दिवसांत येतो तोवर थांबा. तुमची सगळी व्यवस्था इथे केलेली आहे. काही अडचणी असल्यास ह्या मंडळींना नि:संकोच सांगा.” असं सांगून यशवंतराव निघून गेले.

दोन-पाच दिवसांनी यशवंतराव येणार. पंतप्रधान इंदिरा गांधी आपल्याला भेटूच शकणार नाहीत. खरोखरी हा दिल्लीतला नोकरवर्ग काम करणार काय? दिल्ली-मुंबईत असे खूप खेटे घालण्याचा अनुभव आहे. खूप वाईट अनुभव पदरी आहेत. हरीभाऊंना विश्वास वाटेना.

एवढ्या घाईगर्दीतही यशवंतरावांचं १ जुलै १९७५ ला मला पत्र आलं होतं :

“आपले दिनांक २५ जूनचे पत्र मिळाले. श्री. हरीभाऊ गोडबोले यांच्या पेन्शनबाबत मी प्रयत्न करीत आहे. गृहमंत्र्यांना लिहिण्यासाठी आवश्यक लागणारे कागदपत्र यांचेकडून त्वरित मागवून घेण्यास माझ्या ऑफिसला सूचना दिल्या आहेत. कळावे.”

यशवंतरावांनी पंतप्रधान इंदिरा गांधींना सगळं कळविलेलं होतं. हरीभाऊ हे एवढे मोठे स्वातंत्र्यसैनिक अशा अवस्थेत असणं शोभादायक नाही. महाराष्ट्रातल्या अशा एका कवीकडून ते आलेले आहेत. ते कधीही चुकीच्या माणसाला पाठविणार नाहीत. मी कागदपत्रं, माहिती पाहिली. हैद्राबादलढ्यातले ते स्वातंत्र्यसैनिक आहेत. काही कागदपत्रं अपूर्ण असतील ती मी स्वत: मागवितो. तुम्ही याच भेटीत त्यांना पेन्शन, ताम्रपट असा सन्मान देऊन पाठवा. – पुन्हा बोलतो इत्यादी.

ठरविलेल्या वेळापत्रकाप्रमाणे यशवंतरावांच्या अनुपस्थितीत अधिका-यांनी मदत केली. पंतप्रधान इंदिरा गांधी हरीभाऊंशी तेरा मिनिटं हैद्राबाद मुक्तिसंग्रामात व त्या काळातल्या घटनांसंबंधी बोलल्या. खूप आस्था दाखविली. परराष्ट्रमंत्री यशवंतराव परत येण्याच्या आत संपूर्ण काम झालेलं होतं.

हरिभाऊ गोडबोले दिल्लीहून आल्यावर सरळ माझ्या घरी आले. खूप-खूप भरभरून बोलले. ओथंबून रडले. त्यांच्या डोळ्यांत सार्थक झाल्याचं, आनंदाचं पाणी मला दिसलं.