यशवंतराव चव्हाण (4)

१९६३ साली मराठवाडा साहित्य परिषदेच्या इमारतीचं भूमिपूजन त्यांच्या हातून झालं. रा. गो. साळवी यांच्या ‘स्वाधीन की दैवाधीन’ पुस्तकाचं प्रकाशन झालं. निझामी राजवटीमध्ये आजवर असलेला मराठवाडा नव्या प्रगतीच्या दिशेनं आहे. विशेषत:  मराठी भाषेची निझामी राजवटीत जी गळचेपी झाली होती तीतून सुटका झाली. नव्यानं पुन्हा अशा साहित्य परिषदेसारख्या संस्था व साहित्य चळवळ उभी राहतेय हे पाहून त्यांनी आर्थिक तरतूद केली. निझामी राजवटीत अडकलेल्या माणसांचा तिथल्याच माणसांनी उठाव करून सोडवणूक केली. विशेषत: साहित्य व संशोधन यात खूप व्यासंगीपणानं काम केलं. ह्याचा त्यांनी मुद्दाम गौरव केला. ‘माझी मायबोली आज आली माहेराला’ ह्याचा खूप खूप आनंद त्यांच्या भाषणात ओतप्रोत होता. त्यांचं साहित्यावरलं भाषण हे एका जातिवंत जाणत्या साहित्यिकाचंच भाषण होतं. मी लांबवर बसून ऐकलं. त्यांच्या संपन्न विचारशील, साहित्यिक व्यिक्तिमत्त्वानं मी व माजे कित्येक स्नेही त्यांचे झालो. खेड्यातला माझा संकोच मला दूर घेऊन बसायचा. दूरवर बसून मी त्यांचा झालो.

‘रानातल्या कविता’ (१९६८), ‘वही’ (१९७०), ‘गांधारी’ (१९७३) ही माझी पिहली तीन पुस्तकं खूप गाजली. त्यांनी मला महाराष्ट्राचं केलं. त्याच वेळी जवळपास सगळ्याच विद्यापीठांत ही पुस्तकं अभ्यासक्रमात लागली. त्यांची भाषांतरं अनेक भाषांमध्ये झाली. त्यांवर खूप चर्चा परिसंवाद झाले. चांगलं काव्यवाचन करून मी कविता सर्वत्र पोचविली. ह्या माझ्या पहिल्या तीनही पुस्तकांना महाराष्ट्र राज्याची उत्तम साहित्यनिर्मितीची पारितोषिकं व सन्मान मिळाले. नव्या लेखकांच्या बाबतीत यशवंतराव जागरूक व स्वागतशील असायचे. त्याच्या जवळ जायचे. मलाही हे माहीत होतं, परंतु मला पुष्कळ लोकप्रियता व राज्यामान्यता मिळूनही का कोण जाणे, डिसेंबर १९७४ पर्यंत त्यांची – माझी ओळख झालीच नाही. मी त्यांच्या वाचनातून कसा सुटलो हे कळलंच नाही. यशवंतरावांच्या जवळ जाऊन ओळखदेख करून घेण्याची इच्छा अगोदरच्या अनेक कारणांमुळे व घटनांमुळे होतीच. बोलायची इच्छा होती. एक-दोनदा जिल्हा बँक, जिल्हा परिषदा व इतर विकास- कामांच्या मोठ्या समारंभात ते औरंगाबादला आले. मी राजकीय नेत्यांकडून थोडे प्रयत्न करून पाहिले. पण आमच्याकडले राजकारणी फार भारी. माझ्यासारख्या खेडवळ पोराला व कविता वगैरे लिहिणा-याला ते कसे भेटू देणार? मी खूप लहानपणीच वाचनानं, वड्मयीन विचारानं व राजकीय, सामाजिक विचारानं चांगल्या श्रेष्ठ नेत्यांना व लेखकांना ऐकून, त्यांच्या जवळ जाऊन शेंदुर्णीत घडत गेलो. त्यात समाजवादी प्रभाव होता. पण यशवंतरावांच्या पहिल्याच समक्ष ऐकलेल्या भाषणानं व नंतरच्या आत्मसात केलेल्या विचारांनी मी संपूर्ण त्यांचा झालो होतो. दूरवर राहून मी त्यांच्या प्रेमात पडलो होतो.

१९७४ साली डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात इचलकरंजीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं. श्री. पु. ल. देशपांडे हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांच्या लोकप्रियतेमुळे हजारो चाहते रसिक आलेले होते. विशेषत: चित्रपट, नाट्य, नृत्यसंगीत ह्या क्षेत्रांतही पुलंचे संबंध व कर्तृत्व असल्यानं त्या क्षेत्रांतली मंडळी फार मोठ्या प्रमाणावर संमेलनास होती. राजकारण, समाजकारण अशा अनेकविध क्षेत्रांतले लोक आलेले होते. राजकारण्यांनी व्यासपीठावर येऊ नये असा वाद व चर्चा साहित्य संमेलनापूर्वी महिनाभर गाजत राहिली. पन्नास हजार रसिकांच्या उपस्थितीत संमेलन वाजतगाजत सुरू झालं. यशवंतराव एक श्रोता म्हणून व्यासपीठाच्या समोर लोकांमध्ये येऊन बसले. अनेक उत्साही राजकारणी लोक व उत्साही साहित्यिक यशवंतरावांना व्यासपीठावर जाऊन बसावं म्हणून आग्रह करीत होते. यशवंतराव कोणाचंही न ऐकता शांतपणानं लोकांमध्ये बसले. साहित्य संमेलनात मनापासून सामील झाले. वादातला पारा व अकारणी चर्चा दोन तासांत संपूर्ण संपून गेली होती. साहित्याशिवाय तिथे काहीएक शिल्लक राहिलेलं नव्हतं. तीनही पिढ्यांमधले साहित्यिक संमेलनास आलेले होते. त्या सगळ्या साहित्यिकांत यशवंतराव पूर्णपणानं एकरूप झाले होते. त्यांच्याकडून नवीन लेखन, नवीन साहित्य प्रवाह समजावून घेत होते. नवीन लेखकांशी, अपरिचित लेखकांशी स्वत:च विचारपूस करून जवळीक साधत होते. राजकारणाचा आडपडदा दूर सारून यशवंतराव एक रसिक म्हणून साहित्य संमेलनात वावरत होते.