यशवंत चिंतनिका ४२

श्रध्दा आणि निष्ठा

श्रध्दा ही एक शक्ती आहे. सत्य धारण करते, ती श्रध्दा. सत्याचा पाठपुरावा हा त्या अर्थाने श्रध्देचाच पाठपुरावा असतो. अढळ आणि निस्सीम श्रध्दा सत्याच्या आचरणातून, तशा आचरणामुळेच वाढते आणि स्थिर बनते. अढळ आणि निस्सीम श्रध्दा मानवाला सर्वस्वाचा स्वाहाकार आनंदाने करण्यास सिध्द बनवते. स्वातंत्र्याविषयीची श्रध्दा ज्यांनी जोपासली, त्यांच्या सर्वस्वाच्या स्वाहाकाराची उदाहरणे आपल्यासमोर आहेत. इतिहासाने त्यांची नोंद घेतलेली आहे. माझ्या व्यक्तिगत, सार्वजनिक आणि राजकीय जीवनात संघर्षाचे, श्रध्दा दोलायमान करणारे, जीवननिष्ठा दोलायमान करणारे प्रसंग निर्माण झाले. घटना शिजल्या. त्या प्रत्येक वेळी जीवननिष्ठा आणि श्रध्दा अधिक मजबूत, बळकट करण्याची ती एक संधी मी मानली. लोकांवरील, लोकशाहीवरील श्रध्देच्या बळावर राष्ट्रनिष्ठा, समूहनिष्ठा, मानवतेवरील निष्ठा जीवननिष्ठेपासून अलग होऊ दिल्या नाहीत. एरवी हे जीवन निर्माल्य बनले असते!