यशवंत चिंतनिका ३४

प्रौढमताधिकार-एक राजकीय क्रांती

गांधीजींनी प्रौढमताधिकाराचा आग्रह धरला. कारण आता जर हा अधिकार दिला नाही, तर तो गरिबांना मिळावयास अनेक वर्षे झगडा करावा लागेल, असे त्यांचे मत होते. ज्या वर्गाच्या हातांत मर्यादित मतदानाने सत्ता जाईल, तो वर्ग ती सत्ता दलितांच्या हाती जाऊ देणार नाही. त्यासाठी डावपेचांचे राजकारण करीत राहील. या प्रौढमतदानाने आमचे भारतीय लोकशाहीचे प्रचंड स्वरूप आपण पाहत आहोत. त्यामुळे काही समस्या निर्माण झाल्या आहेत हे खरे, पण ती एक फार मोठी राजकीय क्रांती आपण केली आहे.