सह्याद्रीचे वारे - १८

महाराष्ट्राच्या निर्मितीचा हा मोठा प्रश्न सुदैवानें कदाचित् जर आधीं सुटला असता तर पाठीमागच्या रांगेंत बसण्याची माझी नेहमींच तयारी होती व याच्या पुढेंहि राहील हें मी आपणांस सांगूं इच्छितों. पण मोठे प्रश्न निव्वळ एक मनुष्य सोडवूं शकणार नाही. त्याच्याकरितां शेकडों कार्यकर्ते आणि विचारवंत निर्माण व्हावे लागतात, तेव्हां कोणा एकाला त्याचा फायदा मिळतो असें मी मानतों. महाराष्ट्राच्या रचनेचा प्रश्न हा निव्वळ यशवंतराव चव्हाणांनी सोडविला आहे असें आपण कृपा करून समजूं नका. त्याच्या पाठीमागें महाराष्ट्रांतील तीन कोटि जनतेच्या वाढलेल्या भावना आहेत, त्याच्यासाठीं अनेक विचारवंत, इतर पक्षांतील कार्यकर्ते, या सर्वांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आहेत. त्या सर्वांना एका पद्धतीनें एका कामामध्यें गुंतंविण्याचें, एका माळेमध्यें गोवण्याचें काम मीं केलें; याच्यापेक्षा जास्त मी कांही केलें असें मी म्हणणार नाहीं. आणि म्हणून चुकीचें श्रेय मीं कधींच मागितलेलें नाहीं व मागणारहि नाहीं. कारण श्रेय मागून कोणी देत नाहीं. तो जगाचा प्रघातच आहे. परंतु जें श्रेय आहे तें कोणी नाकारूंहि शकत नाहीं. असें जरी असलें तरी मी आपणांला सांगूं इच्छितों कीं, कुठल्याहि समाजामधील कर्तृत्ववान मनुष्य हा समाजाला सोडून कर्तृत्व करूंच शकत नाहीं. नवनीत म्हणजे आपण ज्याला लोणी म्हणतों तें दुधांतून येतें. दूध नसेल तर लोणी नाहीं. समाजजीवन जेव्हां खळखळलेलें असतें, तेव्हां त्यामध्यें कांहीं तरी सांचत असते. नवनीत निर्मिणा-या दुधाप्रमाणें त्यांत एक शक्ति असते. नवनीताला स्वतंत्र अस्तित्व असतें ही खोटी गोष्ट आहे. तीच गोष्ट कुठल्याही कर्तृत्ववान दिसणा-या माणसाच्या जीवनासंबंधींहि खरी आहे असें माझें तत्त्व आहे.

परवां मला एक गृहस्थ भेटले. त्यांनी विचारलें की, तुम्हीं तुमचे गुण कुणाकडून घेतले तें सांगा. मीं म्हटलें तें सांगणें ही फार कठीण गोष्ट आहे. कुठल्याही सामाजिक प्रश्नाचें एकेरी उत्तर देणें यासारखा अडाणीपणा दुनियेमध्यें दुसरा असूं शकत नाहीं. एकेका माणसांचे जीवन म्हणजे एक 'सोशल कॉम्प्लेक्स' आहे असें जर मानलें, तर एका माणसाकडून मी हें सर्व शिकलों असें म्हणणें  म्हणजे स्वतःची फसवणूक करून घेण्यासारखें आहे, आणि दुस-यांचीहि फसवणूक करणें आहे. माझ्यासारखा मनुष्य जो तीस वर्षे राजकारणाच्या धकाधकीमध्ये राहिला त्यानें मी सगळें गांधीजींच्याकडून शिकलों असें जर म्हटलें, तर ती गांधीजींची स्तुति होईल; पण तें खरें असणार नाहीं. कारण किती तरी लोकांच्याकडून मी शिकलों आहें. लोकांशी कसें वागावें, कसें बोलावें, त्यांच्या पाठीवर कसा हात फिरवावा हें कदाचित् मी वसंतराव दादांच्याकडूनहि शिकलों असेन. समाजांतील माणसांच्या दुःखाची तळमळ कशी जाणावी हें कदाचित् मी खेड्यांतील एखाद्या शेतक-याकडून शिकलों असेन. राजकारणांत मुद्देसूद विचार करावा, हें मी रॉयपासून शिकलों. त्यांचें ऋण मीं जाहीरपणें स्वीकारलेलें आहे. अनेक माणसांपासून याप्रमाणें अनेक गोष्टी मी शिकलों. अशीं किती तरी माणसें आहेत. सतत तीस वर्षांचें राजकीय जीवन ही कांही लहानसहान गोष्ट नाहीं. या सगळ्या प्रयत्नांतून जात असतां मी जर मोठा झालों असेन तर मोठा मी नसून, ज्या कार्यकर्त्यांतून मी वाढलों, ज्यांच्याबरोबर मीं काम केलें ती पिढी मोठी आहे, त्या कार्यकर्त्यांचा संच मोठा आहे, असा माझा दावा आहे.

दक्षिण साता-यामध्यें आणि उत्तर साता-यामध्यें गांवोगांव पसरलेले माझे जे साथी आणि सहकारी आहेत, त्यांच्याशीं कधीं मी झगडलों, कधीं भांडलों, कधीं प्रेमानें वागलों, सगळें कांही केलें; पण त्यांनीं मला नेहमीं प्रेम दिलेलें आहे. त्यांच्या त्या प्रेमांतून माझी शक्ति वाढलेली आहे. आणि म्हणून मला परवां कुणीसें विचारलें कीं एक मोठें भाषण करण्यासाठीं दोन महिन्यापूर्वी तुम्हीं सांगली कां गांठलीत, तेव्हां मीं उत्तर दिलें कीं हा खरा सांगलीचा गुण आहे.