सह्याद्रीचे वारे - १४

सुरुवातीला छोट्या वस्तादाला जमून गेलें, पण पुढें जेव्हां अवघड प्रश्नांची चर्चा सुरू झाली तेव्हां छोट्या वस्तादानें सांगितलें कीं, या प्रश्नाचें उत्तर माझ्या वस्तादांना विचारल्याशिवाय मी देऊं शकत नाहीं. त्याप्रमाणें तर मला सांगतां येत नव्हतें. मी जर तुमच्यातर्फे निर्णय घ्यावयास बसलों आहें तर मला निर्णय हे घेतलेच पाहिजेत. कारण आम्हांला अनेक त-हेचे प्रश्न हातावेगळे करावयाचे होते. त्यांत आम्हीं मुंबईचा प्रश्न हा महत्त्वाचा आणि मानाचा मानला होता. तो नुसताच मानाचा प्रश्न नव्हता तर तो आमच्या हिताचाहि प्रश्न होता. मुंबई विदर्भ आणि मराठवाड्यासह आम्हांला एक मराठी राज्य लवकरांत लवकर निर्माण करावयाचें होतें. मला निर्णय घेते वेळीं असें म्हणतां आलें नसतें कीं, तुमचें आमचें दहा खेड्यांचे जमत नाहीं ना - मग पडूं द्या हा प्रश्न तसाच लोंबकळत. या प्रश्नाचा निकाल लागेपर्यंत आम्ही कांही करणार नाहीं. ही कांहीं तत्त्वनिष्ठेची भाषा नाहीं. नाहीं लागत निकाल तर पडूं द्या प्रश्न बाजूला, असें करून नाहीं भागत. तेथे कांही केलें पाहिजे, म्हटलें पाहिजे. संग्रामांत उभा राहिलों आहे. समोरच्या माणसाचा पवित्रा पडलेला आहे. तिथें पुस्तकांतील आकृत्या पाहून मीं पवित्रा घ्यावयाचा कीं काय ? तिथे धैर्यानें आणि विश्वासपूर्वक निर्णय घेतले पाहिजेत, बाबी निकालांत काढल्या पाहिजेत. अशा निर्णयात्मक स्वरूपाच्या व्यवहारी राजकारणाची, दैनंदिन जबाबदा-या पार पाडणा-या जिम्मेदारीच्या राजकारणाची आतां आवश्यकता आहे. हे सर्व प्रश्न मी हेतुपूर्वक आपल्यापुढें मांडीत आहें. हे सगळे प्रश्न आपण समजावून घेतले पाहिजेत. कारण महाराष्ट्र राज्य हें महाराष्ट्राच्या जनतेचें राज्य आहे. आणि तसें तें जनतेचें राज्य व्हावयाचें असेल तर जनतेनें राजासारखा राज्याचा विचार केला पाहिजे. हें काम एकदोन माणसांशीं करार करून होणारे नाहीं. माझ्या ठिकाणीं तुम्ही तिथें असतां तर तुम्हीं कोणता निर्णय घेतला असता, हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. निव्वळ म्हणणें मांडणें सोपें आहे, प्रश्न निर्णयाचा आहे. परंतु कांही तात्त्विक फॉर्म्युले लावून राजकारणाचे प्रश्न सुटतील कां हें आपणच सांगा. फॉर्म्युल्यांनी जर राजकारणांचे प्रश्न सुटत असते तर एकच फॉर्म्युला दुसरीकडे लावला असता आणि दुसरीकडचा फॉर्म्युला तिसरीकडे गेला असता. परंतु फॉर्म्युल्यांनीं हे प्रश्न सुटत नाहीत. खरी अडचण अशी आहे कीं, जगांत फॉर्म्युले चालत नाहींत. जर फॉर्म्युल्यांनी प्रश्न सुटत असते तर संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न पांच वर्षांपूर्वीच सुटावयास पाहिजे होता. परंतु कांही गुंतागुंत होती. कांही परिस्थितीच्या अडचणी होत्या. मनांतल्या अनेक गोष्टींची उकल करावयाची होती. मनाशीं सारखा विचार करून यांतून मार्ग काढावयाचा होता. अशा पूर्ण विचारानंतरच हा संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न आम्हीं राष्ट्रीय वृत्तीच्या पार्श्वभूमीवर सोडविला आहे; मित्रामित्राच्या, बंधूबंधूच्या वृत्तीनें सोडविला आहे. याच पार्श्वभूमीवर कांही देवाण-घेवाण करावी लागली. परंतु त्यांत महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनें घाबरून जावें अशा प्रकारचे कांही होतें असें मला वाटत नाहीं. कारण मीं असें पाहिलें कीं, शेवटीं राष्ट्र आणि महाराष्ट्र यांच्या प्रवृत्ति कांहीं परस्परविरोधी नाहींत. आमची राष्ट्रनिष्ठा आणि आमची महाराष्ट्रनिष्ठा या एकमेकांच्या हातांत हात घालून चालणा-या असल्या पाहिजेत. म्हणून आपण अशी भावना निर्माण करतां कामा नये कीं, आमच्या महाराष्ट्राच्या विरोधी, आमच्याशीं वैर करणारीं कुणीतरी माणसें कोठेंतरी बसलेली आहेत. अशा भावनेनें आपल्याच मनानें आपल्याविरुद्ध एखादा शत्रु निर्माण करून आणि त्याच्याशीं आपल्याच मनांतली समशेर काढून लुटुपुटूची लढाई करीत बसण्यामध्यें कांहीं अर्थ राहिलेला नाहीं. आपणहि पराक्रम करूं शकतों, विजय मिळवूं शकतो, या भावनेची आज आपणांला आवश्यकता आहे. आमचे कोणी विरोधी आहेत, आमचें कोणी भलें होऊ देत नाहीं अशी भांडखोर, रडवी, निराशावादी, विफलतेची भावना निर्माण करणारी वृत्ति आपण राजकारणांतून मोडून काढली पाहिजे, तिला बाजूला टाकलें पाहिजे आणि विजिगीषु भावनेनें पुढें जावयाचा प्रयत्न केला पाहिजे. आम्हीहि कर्तृत्व करूं शकतो अशी भावना, असा आशावाद तरुणांमध्ये, कार्यकर्त्यांमध्यें आपण निर्माण केला पाहिजे, आणि अशा भावनेंतून कर्तृत्वाचा एक सुंदरसा बाग निर्माण केला पाहिजे. आमचा इथें पराभव झाला, तिथें पराभव झाला हें किती वेळ आपण सांगत बसणार आहोंत ?