मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १५५

१५५. आभाळाला प्रंचड खिंडार पडलंय - माधवी रणजित देसाई

‘‘आजवर मी अनेक भाषणातून मृत्यूबद्दल बोललो आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात मृत्यूला आव्हान देणं फार धाडसाचं. तेव्हा स्वत:चा मृत्यू डोळ्यासमोर असायचा. पण प्रियजनांच्या मृत्यूला आपण कसं तोंड देऊ हे मी कल्पनेतही जाणून घेतलं नव्हतं. वेणूबाई गेल्या आणि सारा आवेश संपला. अश्रूंनी माझा साफ पराभव केला आहे.’’

‘‘हे तुलसी-वृन्दावन, ही गोठ्यातली गाय आहे ना? ती वेणूबाईच्या आग्रहानं इथं आणलीय.’’

‘‘हे सारं सामान तिनं जसं लावलं होतं तसंच ठेवलं आहे. मी त्यात बदल केलाच नाही. हे सारं तिला क-हाडला न्यायचं होतं. ‘विरंगुळ्या’ त आम्ही दोघं राहणार हातो ’’

‘‘मी आता ज्या खुर्चीवर बसलोय ना, त्याच खुर्चीवर ती बसायची. सर्व घर सांभाळायची. इथं बसून पुणं, मुंबई, क-हाडची सर्व घरं ती जपायची.’’

‘‘माधवी, देवघर बघून या. हे सारे देव तिनं जमवलेले. तो एकमुखी रुद्राक्ष, ती साईबाबांची मूर्ती सारा हट्ट तिचा. एरवी मी देवभोळा नाही. पण हे घर आजही तिच्याच पद्धतीनं मी जपतोय.’’

अशी साहेबांची अनेक वाक्यं आज परत परत ऐकू येताहेत, हे सारं यशवंतरावजी सांगत असायचे. कुणी पुरूष आपल्या पत्नीवर इतकं प्रेम करू शकतो? इतका हवालदिल, हळवा होऊन दीड वर्षात या जगातून निघून जातो? साहेब गेले. आज सा-या आठवणींचा पट उलगडून गेलाय. मन व्याकूळ होऊन उठलंय. क-हाडला जाताना वाटेवर रस्त्याच्या कडेला गुलमोहर फुललेले असतात. या गुलमोहरी वाटेवरून हा अश्रूंचा सौदागर आज निघून गेला. पण जाताना सा-यांची जीवनं आपल्या स्नेहानं, मायेने चिंब भिजवली.

स्नेहाळ आदरातिथ्य

१ रेसकोर्स रोडवरचं आमंत्रण आलं. ‘‘नेपाळला जाताना, दिल्लीत थांबा. चार दिवस माझ्या घरी राहा. तुम्ही याल तेव्हा मी कोणतेही कार्यक्रम घेणार नाही. जेवढा वेळ तुम्हा लोकांचा सहवास लाभेल तेवढा थोडाच अशी माझी भावना आहे.’’ साहेबांचं पत्रं आलं. एवढ्या मोठ्या माणसाच्या घरी जायचं कसं? या विचाराने मी धास्तावून गेले होते. आम्ही दोघे १ रेसकोर्सवर पोचलो. दारात टॅक्सी गेली न गेली, साहेब स्वत: पोर्चमध्ये स्वागताला उभे! वाकून नमस्कार केला.

‘‘नमस्कार’’ भरदार आवाज आला. घरात पाय ठेवला. आणि क्षणभर अडखळलेच. समोरच वेणूतार्इंचा नथ घातलेला, डोकीवर पदर घेतलेला हसरा फोटो, त्यासमोर दोन समया तेवत होत्या. फोटोला घवघवीत हार! मी पुढे जाऊन फोटोपुढे माथा टेकला. मागे वळले. साहेबांच्या डोळ्यातून धारा लागल्या होत्या. अशावेळी आपण काय करायचं असतं?

मी चटकन आम्हाला दिलेल्या खोलीत पळाले. रणजितना म्हणाले, ‘‘मला फार संकोच वाटतो. त्यांच्याशी काय बोलू? खोलीत शिरले आणि आश्चर्य करण्याची पाळी माझी होती. चांदीचे करंडे घासून चकचकीत केलेले, त्यात कुंकू, ड्रेसिंग टेबल सज्ज होतं. तेल, शांपूपासून पेस्टपर्यंत सर्व सरंजाम होता. ती सारी व्यवस्था साहेबांनी स्वत: उभी राहून करवून घेतली होती. असं नंतर गंगारामनं (त्यांचा नोकर) मला सांगितलं. या घरात एक स्त्री पाहुणी येणार, तिला काही कमी पडू नये, ही त्यांची धडपड होती. मी त्याच करंड्यातलं कुंकू लावलं. सुवासिनीचा तो करंडा होता. प्रत्येक स्त्रीला हेच भाग्य हवं असतं.

संकोचाचा अर्धाच दिवस होता. आजवर कुणा राजकीय पुढ्या-यांशी कधीच परिचय नव्हता. उलट या सा-या ‘‘बड्या’’ मंडळींची एकप्रकारे धास्ती किंवा आकसच माझ्या मनांत असे. पण यशवंतरावजींच्या घरातल्या सहा दिवसात माझी विचारांची धारा पूर्ण बदलून गेली. त्या सहा दिवसांत त्यांनी आईच्या मायेनं आम्हाला जपलं. त्या घरातल्या प्रत्येक क्षणी त्यांनी, आमची काळजी घेतली. आमचं जेवणं, उठणं, बसणं, फिरणं सारं कौतुकानं बघत असायचे.

नंतर नंतर माझा संकोच कमी झाला. त्या घरातल्या त्यांचा एकाकीपणा लक्षात आला . त्यांना स्नेहाची गरज आहे, मायेनं जपणं आवश्यक आहे, याची जाणीव झाली व त्यांना हंसवणं, रिझवणं हेच आमचं काम सुरू झालं. काहीच मागायचं नव्हतं. देवघेव होती स्नेहाची. जपणूक होती हळव्या भावनांची.