मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १५३

१५३.  महाराष्ट्राची एक कर्तबगार व्यक्तीर्धन – डॉ. वसंत पटवर्धन

यशवंतरावजींबद्दल मी ऐकलं बरंच ते संयुक्त महाराष्ट्राच्या काळात, १९५६ साली आणि त्यानंतर. आणि त्यांच्या वैचारिक वाटचालीबद्दलच ते बरंचसं होतं. मग सत्तावन्न सालच्या महाराष्ट्र समरांत एस्. एम्. च्या निवडणुकीत पुण्यात मी बराचसा वैयक्तिक भाग घेतला त्यावेळेला त्यांचे विचार सतत आवर्जून बघत होतो ते त्या वेळी तरुण मनाला निष्ठेच्या दृष्टीनं अव्यभिचारी वाटत नव्हते. मग संयुक्त महाराष्ट्र झाला, तरी लक्षावधि नसले तरी हजारो निष्पक्ष कार्यकर्त्या व्यक्तींनी जी तळमळ दाखवली त्याबद्दल आंतरिक ओलावा दिसला नाही म्हणून खंत वाटत असतानाच महाराष्ट्र बँकेच्या रजत जयंतीनिमित्त मुख्य अतिथी म्हणून डिसेंबर १९६० मध्ये ते आले. त्या वेळी त्यांची माझी प्रथम भेट झाली ती कै. वामनराव वर्दे यांनी आवर्जून करून दिल्यामुळे. मराठीत अर्थशास्त्र सोपं करून शिकवताच येत नाही म्हणून महाविद्यालयांतही तो विषय घेणा-यांची व उत्तीर्ण होणा-यांची संख्या कमी असते असं व्हीनस बुकस्टॉलचे श्री. अनंतराव लिमये म्हणाले तेव्हा ‘हे शक्य आहे’ असं सांगून मी ‘सोन्याचं हरिण’ हे पुस्तक लिहिलं होतं. ते सगळ्यांनाच आवडलं व आमचे त्या वेळचे अध्यक्ष वामनराव वर्दे यांनाही आवडलं म्हणून त्यांनी मला एक प्रत यशवंतरावजींना देण्यास सांगितली व त्यासाठी बँकेत मुद्दाम स्वतंत्रपणे त्यांची माझी पांच मिनिटे गांठ घालून दिली. महाराष्ट्र सरकारचं त्या वर्षीचं म्हणजे खरं तर पहिल्याच वर्षाचं अर्थशास्त्र विभागातील उत्कृष्ट पुस्तक म्हणून पारितोषिक मिळालं.

त्यानंतर माझी गाठ पडली ती ते अर्थमंत्री असताना. यशवंतराव ग्रंथप्रेमी होते त्यामुळे त्यांच्या अर्थसंकल्पात त्यांनी करमुक्त मर्यादेत व्यावसायिक ग्रंथासाठी ५०० रुपयाची सवलत दिली होती. ही सवलत स्तुत्य असली तरी कमी आहे व त्यांत व्यावसायिक वा करमणुकीची असा भेदभाव न करता सर्रास ती १००० रूपयाची असावी अशी मी त्यांना विनंती केली होती. त्याचप्रमाणे त्यांच्या अर्थसंकल्पावर विशालसह्याद्रीसाठी मी चार लेख लिहिले होते ते त्यांच्या नजरेला आणावेत अशी श्री. अनंतराव पाटील यांची इच्छा होती. त्यांची प्रतिक्रिया काय होती ते कळले नाही. कारण समोरच्या व्यक्तींच्या सूचना, शंका, विचारणा यावर त्यांचं मत बहुधा कळत नसे वा मिळत नसे असं मी अनेकांकडून ऐकलं होतं. त्याच कारकीर्दीत मग बँकांच्या व्याज-उत्पन्नावर कर (Interest tax) लावला गेला तेव्हा ही रक्कम सर्व अंदाजपत्रकी उत्पन्नात जमा होण्यापेक्षा त्यातून बँकांची गंगाजळी जर वाढवता आली तर चांगलं होईल असं मी सुचवलं होतं. पण १९६९ ते १९८४ पर्यंत बँकांचं भाग भांडवल, गंगाजळी, ठेवींच्या काही टक्के असावी असं कुणालाच वाटलं नव्हतं.(८४-८५मध्ये मात्र भारत सरकारनं त्यात लक्ष घालून यंदा सर्व बँकांचं भाग भांडवल घसघशीतपणे वाढवलं आहे.)

महाराष्ट्र बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा पडल्यावर मी आवर्जून त्यांचे आशीर्वाद मागण्यासाठी गेलो होतो. ‘आर्य’ कादंबरीची माझी टिपणंही त्या वेळी माझ्या बरोबर होती. बंगल्यावर ते एकटेच होते त्यामुळे ब-याच वेळ मनमोकळ्या गप्पा झाल्या. कादंबरी प्रसिद्ध झाल्यावर श्री. पारेख यांनी त्यांचेकडे ती पाठवली होती व त्यांनी ती आवर्जून वाचली होती असं मला नंतर कळलं तेव्हा मला आनंद झाला होता.

त्यांची माझी आणखी एक प्रदीर्घ गांठभेट झाली ती दुस-या एका बँकेसंबंधीच्या महाराष्ट्र बँकेच्या एका प्रस्तावाबाबत. जाहीररित्या राष्ट्रीयीकरणाची अर्थमंत्री म्हणून धुरा वाहून भलावणी केली असतानाही त्या वेळचे त्याचे ‘राष्ट्रीयीकरण’ चांगलेच असते असे नाही असे उद्गार ऐकल्यावर मी चक्रावलो होतो. पण तो विषय वाढवायचा नसल्याने त्याबद्दल जास्त चर्चा वाढवण्यात कुणालाच स्वारस्य नव्हते.

या सर्व भेटी वेगवेगळ्या संदर्भात झाल्या तरी येणा-या व्यक्तीचं म्हणणं पुरं ऐकून घ्यायची त्यांची तयारी असायची व त्यात मंत्रीपदाचा भपकारा नसायचा ही गोष्ट सुखद वाटायची. म्हणून विषय कुठलाही असला तरी त्यांचेकडे जायला कधी संकोच वा भीती न वाटता महाराष्ट्राची एक कर्तबगार व्यक्ती म्हणून मतभिन्नता असली तरी आदर वाटायचा हे मात्र खरं!