मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १५४

१५४. शब्दबंधू यशवंतराव – आत्माराम सावंत

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदापासून भारताच्या उपपंतप्रधानपदापर्यंत यशवंतराव चव्हाणांचा गेल्या पावशतकातील प्रवास आपण पाहिला. ६२ साली संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीत गेल्यापासून, पं. जवाहरलाल नेहरू, लालबहाद्दूर शास्त्री आणि श्रीमती इंदिरा गांधी या तीन पंतप्रधानांबरोबर, मंत्रिमंडळातील एक निकटचा विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी काम केले. संरक्षण खात्यानंतर गृह, अर्थ, परराष्ट्र अशी खाती सांभाळली. यातली प्रत्येक जबाबदारी कसोटीच्या वेळी त्यांच्यावर टाकण्यात आली आणि प्रत्येक वेळी यशवंतरावांनी आव्हान म्हणून ती स्वीकारून आपल्यावरचा विश्वास सार्थ ठरवला. या पावशतकात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या धबडग्यात सतत वावरत असतानाही, यशवंतरावांचा मूळचा मराठमोळा, रसिक, सुसंस्कृत पिंड मात्र कायम राहिला.

राजकारण, हे बोलूनचालून संघर्षाचे क्षेत्र. त्यात मित्र आणि शत्रू परिस्थितीनुसार बदलत असतात. त्या त्या वेळी जो प्रतिस्पर्धी म्हणून समोर येईल, त्याच्याशी कधी सरळ दोन हात करून, तर कधी कुटील डावपेचानी लढावे लागते. बाजी मारण्यासाठी भल्याबु-या मार्गाचा अवलंब करावा लागतो. या सर्व गदारोळात सतत वावरणारा माणूस रुक्ष, कठोरच नव्हे, तर निगरगट्टही बनतो. त्याच्यामध्ये मृदूता, सुसंस्कृतता, रसिकता, खिलाडूवृत्ती मुळात असली तरी ती टिकणे शक्यच नसते. पण यशवंतराव आयुष्यातील पन्नास वर्षे राजकारणात घालवूनही, या नियमाला एक सन्माननीय अपवाद ठरले. ही किमया खरोखरच अद्भूत म्हणावी अशी. यशवंतरावांना ती साधली याचे कारण त्यांच्यावर मुळात झालेले संस्कार सखोल व पक्के होते हे तर आहेच, पण सबंध राजकीय कारकीर्दीत त्यांनी ते प्रयत्नपूर्वक जपले हे
लक्षात घेण्यासारखे आहे.

कृष्णाकाठचे संस्कार

ज्या कृष्णाकाठावर यशवंतराव जन्मले आणि वाढले, त्याने बालवयातच त्यांच्यावर साहित्य, संगीत कलेचे संस्कार केले. अभिजात साहित्याचे वाचन त्यांनी त्यावेळी जसे झपाटून केले, तसाच संगीताचा स्वादही मनमुराद घेतला. परिसरातल्या नामांकित गायकांची भजने, पखवाजवादन ऐकण्यात, स्वत: टाळ वाजवून त्यात रंगण्यात यशवंतरावांनी रात्रीरात्री जागवल्या. कराडबाहेरच्या नामांकित भजन मंडळ्यांची भजने आपल्या गावात आयोजित केली. नाटकांची भूक कराडमध्ये येणा-या कंपन्यांच्या नाट्यप्रयोगांनी भागेना, तेव्हा कोल्हापुरात जाऊन नाटके पाहिली. गंधर्व नाटक मंडळी, महाराष्ट्र नाटक मंडळी, ललितकलादर्श अशा कंपन्यांची नाटके कोल्हापुरात पिटात बसून त्यांनी पाहिली. नाटकांची पुस्तके मिळवून ती वाचण्याचा नाद त्यांनी मनसोक्त केला. गडक-यांच्या नाटकातले संवाद तर त्यांना तोंडपाठ असत. कोल्हापूरला राजाराम कॉलेजमध्ये ना. सी. फडके यांच्यासारखा साहित्यिक त्यांना प्राध्यापक म्हणून लाभला. वि. स. खांडेकरांच्या साहित्याने त्यांचा समाजाभिमुख पिंड घडवण्यात मोठी मदत झाली. खांडेकरांच्या ‘दोन ध्रूव’ व ‘पांढरे ढग’ या कादंब-यांनी यशवंतरावांच्या मनावर खोल ठसा उमटवला होता. आपल्या गावात हरिजन मुलांसाठी शाळा उघडण्याचा व तिचे उद्घाटन कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या हस्ते करण्याचा जो उपक्रम वयाच्या विशीत त्यांनी केला, त्याच्यामागे हेच सामाजिक संस्कार होते. क्रिकेट हा त्यांचा आवडता खेळ होता. स्वत: क्रिकेट खेळलेही पण गरिबीमुळे क्रिकेटचे साहित्य विकत घेता येत नाही, म्हणून त्यांनी खेळणे सोडले. आवड मात्र गेली नाही. त्या काळातल्या कवींमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या राष्ट्रीय काव्याने यशवंतराव प्रभावित झाले होते. इतके की, ३२ साली राष्ट्रीय चळवळीत भाग घेतल्याबद्दल तुरुंगवास घडला, तेव्हा तेथे सावरकरांच्या ‘कमला’ सारखे दीर्घकाव्य लिहिण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तो काही ओळीनंतर सोडून दिला, तरी इतर अनेक कविता त्यांनी केल्या होत्या. काही कथाही लिहिल्या होत्या व त्या प्रसिद्धही झाल्या होत्या. साहित्य सहवास ‘तरुण वयात प्रत्येकजण कविता करतो, अशाच त्या माझ्या कविता होत्या,’ असे यशवंतराव थट्टेने म्हणत. त्यातला थट्टेचा भाग बाजूला सारून विचार केला तर यशवंतरावांच्या मनाची घडण समजू शकेल. कविता करण्यासाठी मुळात माणसाकडे हळवे मन असायला हवे. ते यशवंतरावांपाशी होते. कृष्णाकाठच्या निसर्गाने या मनावर केलेले संस्कार स्वत: यशवंतरावांनी फार सुरेख शब्दांकित करून ठेवले आहेत. ‘नदीकाठचे गाव’ हा ठसा त्यांच्या मनावर इतका पक्का उमटला की, पुढे राजकारणाच्या निमित्ताने भारतभर आणि जगभर फिरताना कुठल्या गावाशेजारून नदी वाहताना पाहिली की, यशवंतरावांचे कविमन उचंबळून येत असे. परराष्ट्र मंत्री म्हणून रशियाला गेले तेव्हा वोल्गा नदीच्या काठावरच्या शहराने त्यांना असेच उल्हसित केले. एका रेस्टॉरन्टमधील भोजनासाठी यशवंतराव गेले. तिथे एका वाद्यवृंदाने गायलेल्या गीताचे प्रथम त्यांना सूरच आवडले. शब्द कळले नाहीत. पण मग त्यांनी चौकशी केली आणि त्या गीतात वोल्गा नदीचे वर्णन आहे असे जेव्हा त्यांना कळले, तेव्हा त्या गीताचे इंग्रजी भाषांतर त्यांनी ताबडतोब आपल्या डायरीत उतरवून घेतले. पुढे जेव्हा जेव्हा त्यांना नदीकाठचे गाव हा विचार आठवे तेव्हा ते वोल्गागीत डायरीतून काढून वाचीत. ते वाचतांना प्रत्यक्ष पाहिलेला परिसर, धुंद वातावरणासह माझ्या डोळ्यापुढे येतो, असे यशवंतरावांनी लिहून ठेवले आहे.