शब्दाचे सामर्थ्य २४५

७८

काही संस्मरणीय वाढदिवस

मी माझा वाढदिवस एका वर्षी साफ विसरलो होतो. पण त्या वेळच्या दिल्लीतल्या वाढदिवसानं माझ्या मनात कायमची आठवण नोंदविली.

१९६७ सालचा तो वाढदिवस. सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच झाल्या होत्या आणि महामंत्र्यांच्या निवडीची गर्दी सुरू होती. ती निवडणूक झाली १२ मार्च या दिवशी. इंदिरा गांधी महामंत्रिपदावर विराजमान होताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. आम्ही मंडळी काही वेळ तिथं थांबलो, गर्दी एवढी झाली की, त्यांच्यापर्यंत पोहोचावं आणि अभिनंदन करावं, यासाठी मलाही अवसर मिळेना. शेवटी पुन्हा निवांत भेटून अभिनंदन करावं, असा विचार करून त्या गर्दीतून वाट काढली आणि थोड्या वेळानं घरी परतलो.

तो काय! काही मिनिटांतच इंदिराजी माझ्या घरी दाखल.

मी बुचकळ्यात पडलो. 'असं काय घडलं, एवढ्या तातडीनं तुम्ही आलात?' मी इंदिराजींना उत्सुकतेनं विचारलं.

'चौहान, गर्दीत मी विसरून गेले. तुम्हांला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करण्याचं राहून गेलं.' इंदिराजींनी असं म्हणतच शुभेच्छा व्यक्त केल्या. इंदिराजींच्या मनाच्या स्निग्धतेनं माझा वाढदिवसाचा त्या दिवशीचा आनंद द्विगुणित-शतगुणित झाला.

कराडला कृष्णामाईच्या वाळवंटात आमच्या गप्पा रंगल्या होत्या. गप्पाच त्या, विषयाला धरबंध कुठला! १९३० साल. दांडीमार्च सत्याग्रह सुरू झालेला तो काळ, गप्पांच्या ओघात दांडीमार्चही सापडला. सत्याग्रह्यांचे मोर्चे जागोजाग निघत होते. कोणीतरी म्हणालं. 'काय होणार असल्या सत्याग्रहानं ?'

आचरटपणानं पुढे जो तो बोलत राहिला होता. त्यात मीही सामील झालो, पण गंभीरपणानं.

'यातून काही चांगलं निघणार आहे...' मी त्या सत्याग्रहाबद्दल म्हणालो.
'ते कसं काय?' एकानं आचरट हावभाव करीत विचारलं.
'अरे, दांडीमार्च सत्याग्रहाची सुरुवात १२ मार्चला झाली आहे.' मी.
'बरं मग!' सर्वांची पुच्छा
'दोस्तांनो, १२ मार्चला, म्हणजे माझा वाढदिवस... त्या दिवशी काही तरी चांगलं होणारच!'
- आणि मग आम्ही सारेच त्या वाळवंटात हसता-हसता गडबडा लोळलो. 'आचरटपणाचा अगदी कहर झाला!' कुणीतरी म्हणालं.

माझा एक वाढदिवस झाला. प्रतापगडावर भवानीमातेच्या दर्शनानं भारावलेल्या मनानं, अंतकरणानं. मी तेव्हा जंगल खात्याचा मंत्री होतो. मला वाटतं, १९५३ साल असावं. मी आणि सौ. वेणूताई महाबळेश्वरात होतो. प्रतापगडाला ब-याच वर्षांत गेलो नव्हतो, म्हणून त्या दिवशी जायचं ठरवलं. प्रतापगडावर जाण्यासाठी त्या वेळी मोटारचा रस्ता नव्हता. मी गड चढून जायचं ठरवलं आणि सौ. वेणूताईसाठी खुर्चीची व्यवस्था केली.

आम्ही गडावर पोहोचलो. बरोबर फारसं कुणी नव्हतं. मंदिराच्या गाभार्‍यात गेलो आणि उभयतांनी भवानीमातेचं दर्शन घेतलं.

अतिशय शांत, पवित्र, मंगलमय असं तिथलं वातावरण.

मनासमोरून इतिहासाची पान उलगडू लागली. छत्रपती शिवरायांचं हे श्रद्धास्थान. येथून कामगिरीवर निघताना आणि परतल्यावर महाराजांनी या जगन्मातेचे कौल घेतले.

असेच आणखी किती तरी प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहिले.