यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ८६

४) “विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि इतर विभाग या सर्वांनी भाऊ-भाऊ म्हणून नांदू या, विदर्भ असो, मराठवाडा असो, कोकण असो किंवा इतर विभाग असोत, तेथील सर्व प्रश्नांकडे आईच्या अंत:करणाने पाहिले पाहिजे. त्यांच्यातील भिन्न भिन्न प्रश्न असतील तर ते समजावून घेतले पाहिजेत आणि ते प्रश्न आईच्या ममतेने सोडविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. त्यांना प्रेमाचा मार्ग सांगितला पाहिजे. ही परीक्षा मी जरूर घेत आहे. सर्व मागासलेल्या लोकांच्या विकासाचा प्रश्न याच माध्यमातून सोडविता आला पाहिजे. त्यांच्यातील अनेक प्रश्न आहेत. शेतीचा प्रश्न, सहकारितेचा प्रश्न, विणकरांचा प्रश्न आपुलकीने सोडविताना मी नापास होणार नाही.”

(शहीद शंकरदिन समारंभ, जानेवारी १९६१)

५) “नव्या महाराष्ट्र राज्याच्या जन्माचे आपल्याला भरभराटीचे व सुखाचे दिवस येतील, ही सामान्य जनतेची अपेक्षा योग्य अशीच आहे. हा जनतेच्या अपेक्षापूर्तीचा क्षण जवळ आणणे हा महाराष्ट्र राज्याचा मी मानबिंदू मानतो.”
(१ मे १९६० गजभवन येथील भाषणातून).

६) “आज मी असे म्हणू शकणार नाही की, हा अपेक्षापूर्तीचा मानबिंदू आम्ही जिंकलेला आहे. महाराष्ट्राचे समाजजीवन हे जातिधर्मामध्ये विस्कटून, तुटून फुटून निघालेले आहे. या समजाजीवनास एकजिनसी रूप आणता यावे हा एक प्रमुख उद्देश राज्यनिर्मितीत होता. त्यासाठी काही ध्येयधोरणे घालून दिली होती व निश्चित अशी प्रयत्नांची दिशा ठरवली होती. उपेक्षित दलित समाजाच्या सहकार्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा व ध्येयधोरणांचा पाठपुरावा करून महाराष्ट्राचे राज्य व राजकारण करावे असा हेतुपुरस्सर प्रयत्न केला गेला. परंतु चंद्रपूरपासून कोकणच्या टोकापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्राच्या विशाल भूमीतील या समस्या दूर करण्याकरिता प्रयत्न करणा-या कार्यकर्त्यांची उणीव, तसेच त्यासाठी लागणारी निष्ठा व सामाजिक प्रयत्न यांची कमतरता पडली. प्रयत्न झाले नाहीत असे मी म्हणणार नाही. पुरेसे आणि सातत्याने झाले नाहीत, ते कबूल करावे लागेल आणि त्यामुळे आज या दिशेने आमची प्रगती जशी व्हावी तशी झालेली नाही, हे प्रामाणिकपणे कबूल करावे लागले. या प्रश्नाचे स्वरूप विसरून एकटाच महाराष्ट्र काही संपूर्ण वेगळे करू शकेल हे खरे नव्हते. हा एक विचार म्हणून मी त्याची नोंद केली आहे. अपयश झाकण्यासाठी एक सबब म्हणून नव्हे.”

(१ मे १९८०)

७) “मानवी जीवन विकसित करण्याची, समाज गतिमान करण्याची क्षमता विचारात आहे म्हणूनच विचारांचे, नव्या विचारांचे स्वागत झाले पाहिजे. विचारांतून विचार जन्माला येतात. कलह झाला पाहिजे तो विचारांचा, विचाराचे धन घेऊन समाजाचे मन समृद्ध करण्याची आवश्यकता आहे. विचाराने माणसे निर्भय बनतात. त्यांचा आत्मविश्वास वाढतो. समस्येच्या मुळाशी जाण्याची, तर्कशुद्ध विचार करण्याची, बोलून दाखविण्याची, कृतीत उतरविण्याची आणि त्यातून समाज व देश यांच्या उन्नतीसाठी झगडण्याची तळमळ लोकांमध्ये वाढावी. तरूण पिढी कोणत्या संस्काराने आणि विचाराने प्रभावित होते यावर देशाचे भवितव्य अवलंबून आहे. व्यक्तीच्या जीवनाप्रमाणेच राष्ट्राच्या जीवनात जी आव्हाने येतात ती झेलण्याचे सामर्थ्य जेव्हा प्रत्यक्ष अनुभवाला येते तेव्हा राष्ट्र मोठे होते. हे सामर्थ्य शस्त्राने प्राप्त होत नाही तर विचारांतून व संस्कारांतून प्राप्त होते. प्रत्येक तरूणाला समाजात आपले स्थान कोणते आहे समाजासाठी आपण काय करतो याचा विचार करावा. हा अमुक जातीचा तो अमुक जातीचा असा विचार जर तरूण पिढी करू लागली तर हिंदुस्थानचा विचार कोण करणार?”

(थोर शिक्षणमहर्षी स्व. बापूजी साळुंखे यांच्या सत्कारप्रसंगी १६-४-८२)