यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : १८

प्रस्तुतचे पुस्तक हा त्याचाच भाग आहे. यशवंतराव चव्हाणांनी सत्यशोधक – ब्राह्मणेतर – दलित – आदिवासी – स्त्री मुक्ती चळवळींचा वारसा मनोमन स्वीकारला होता कां? त्या परंपरेचे पाईकत्व मान्य होते कां? अशा प्रश्नांवर खूप खल झालेला आहे. यशवंतरावांनी आपल्या आत्मवृत्तांत त्यावर काही लिहिले आहे. सत्यशोधक चळवळीतील दिनकरराव जवळकरांची भाषा व टिळकांवरील टीका यशवंतरावांना भावलेली नाही. मात्र दलित चळवळीतील भटक्या विमुक्त लक्ष्मण मानेंना अपत्य मानून त्यांच्या मागे बळ उभे करण्यास मागेपुढे पाहिलेले नाही. शिक्षणासाठी कोल्हापूरात राहूनही शाहू छत्रपतींनी सुरू केलेल्या मराठा वस्तिगृहांऐवजी बाहेर राहणे पसंत केले आहे. राजकारणात यशवंतराव रॉयवादापर्यंत पोचलेले दिसतात. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींशी त्यांची दृढमैत्री होती. रा. ना. चव्हाणांच्या समोरच हे घडले. यशवंतरावांच्या बरोबर दिल्लीत झालेल्या मुलाखतीनंतर रा. ना. चव्हाणांच्या मनांत खूप बदल घडलेला आहे. याविषयांवर आमच्या सतत चर्चा होत. यशवंतरावांचा वैचारिक पिंड वेगळा होता. त्यांना सत्यशोधक चळवळीची आपुलकी होती. परंतु बांधिलकी नव्हती. मी त्याचा वेगळ्या अंगाने विचार करतो. १९६२ – ६३ सालात डॉ. राम मनोहर लोहिया लोकसभेवर निवडून गेले. लोहियांनी राजकारणांत आगडा-पिछडा लाईन मांडली. महाराष्ट्रातील सत्यशोधक चळवळीबद्दल डॉक्टरांची काही मत राखीव होती. त्या काळात बार्शीला नाना पाटलांची व त्यांची संयुक्त जाहीर सभा झाली. नाना पाटलांच्या भूमिकेवर डॉक्टरांनी मतभेद स्पष्ट केले. ब्राह्मण की ब्राह्मण्य? मद्रासच्या पेरियार रामस्वामी नायकरांबद्दलही असेच घडले. यशवंतराव चव्हाण व डॉ. राम मनोहर लोहिया याबाबतीत समविचारी होते. परंतु डॉ. लोहियांच्या मांडणीला यशवंतरावांनी दुजोरा दिल्याचे दिसत नाही. महाराष्ट्रातील समाजवादी नेतृत्व ब्राह्मणी असल्याची टीका लोहिया यांनी जाहीरपणे केली. महाराष्ट्रातील बहुजनांना लोहिया आवाहन करीत असत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पत्र पाठवून दाद दिली. परंतु एक-दीड महिन्यांतच बाबासाहेबांचे परिनिर्वाण झाले. यशवंतराव चव्हाणांनी राष्ट्रीय पातळींवर काँग्रेस व नेहरूनिष्ठा मानली.

महर्षि विठ्ठल रामजी शिंदेनी मांडलेली बहुजन विचारधारा तिचा उगम महात्मा फुलेच्या विचारधारेतून झालेला आहे. यशवंतराव चव्हाणांना बहुजनांनी मनोमन नेता मानले. महाराष्ट्रातील बहुजन सतत आघाडीवर राहात आले आहेत. बहुजन शब्द आता महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही. त्याला राष्ट्रीय स्वरूप आलेले आहे. अशावेळी सामाजिक चळवळीतील नेत्यांच्या जीवनाचे मूल्यमापन उपयोगी ठरू शकते, मार्गदर्शक ठरू शकते. रा. ना. चव्हाणांच्या कुटुंबियांनी चालविलेल्या प्रकाशन कार्याबद्दल त्यांना मनोमन धन्यवाद द्यावेसे वाटतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरचा इतिहास विशेषत: महात्मा फुल्यांच्या नंतरचा इतिहास आता साक्षेपाने पुढे येत आहे. चव्हाण कुटुंबियांनी अत्यंत निर्लेपपणे-नि:पक्षपातीपणे हे कार्य चालविले आहे. चळवळींच्या अभ्यासकांसाठी हे दालनंच खुले केले आहे.

डॉ. बाबा आढाव
डॉ. राम मनोहर लोहिया स्मृतिदिन – २०१०
दि. १२.१०.२०१०