साहेब यशवंतरावजी चव्हाण-९

आणि अनन्वित अत्याचार केले-
पोलिसांनी घरा- घरात शिरून लोकांना मारलं...
(किंकाळया, आराडाओरडा आणि ‘वंदे मातरम्’ च्या घोषणा ऐकू येतात)
राघू अण्णा सेनानी आणि मी सैनिक!
आमचं दोन माणसांचं सैन्य-
ते सांगतील, तसं मी वागायचं!
त्यांनी देशपांडे वकिलांच्या दारावर टकटक केली.
“कोण आहे?”
“आम्ही सातारहून आलोत-“     
खुणेचा शब्द पटला!
“आत या-“
ठरल्याप्रमाणे अर्ध्य़ा, अर्ध्या तासाच्या अंतरानं
निरनिराळया गावची माणसं येऊन आम्हाला भेटून गेली.
मनात म्हटलं (खासगी आवाजात) शिवाजी महाराजांच्याही काळात या डोंगराळ भागातले लोक असेच लढले असतील-“
(प्रकाश मंद होतो. बोलणे फक्त कुजबुजीच्या सुरात)
“बिळाशींच नाव,
आता राज्यात सगळीकडे ठाऊक झालंय्-
लक्षात ठेवा:
तुम्ही काही एकटे नाहीत-
निर्भय व्हा!
मात्र, वातावरणात कुठंही ढिलाई येऊ देऊ नका...”
(‘वंदे मातरम्’च्या घोषणा)

डोंगर ओलांडून आम्ही बिळाशीत शिरलो,
तोच शीळ ऐकू आली (दचकून) म्हटलं,
“काय रे, पोलीस आले की काय?”
बरोबरचा तरूण शांतपणे म्हणाला,
“ही पोलिसांची शीळ नाहीए-“
गावात एक म्हातारे गृहस्थ भेटले, म्हणाले,
(खासगीत) “पोलिसांची सगळी व्यवस्था करून आलोय मी!”
आम्ही पारावर बसलो,
झेण्डे काढले; लोक जमले,
त्यांनी जयघोष केला:
“भारतमाता की जय!!”
“महात्मा गांधी की जय!!”
सभा संपल्यावर राघूअण्णांनी पुन्हा त्या म्हातारेबुवांना विचारलं:
“पोलिसपार्टी आलीय् म्हणता,
पण आम्हाला तर कुठं दिसत नाही ती?”
(अंगठयानं पिण्याची कृती दाखवीत) “सांगितलं ना- त्यांची सगळी व्यवस्था मी केलीय्!
चिक्कार दारू पिऊन पडलेत ते तिकडे!! (हशा)
आता मात्र, रात्रीच वारणा ओलांडून पलिकडे जा-
तोपर्यंत वाटेत कुठंही थांबू नका!”
त्या माहितगार मुलानं आम्हाला नदीच्या उतारापर्यंत पोचवलं, आणि तो म्हणाला:
“पलिकडं कोल्हापूर संस्थानची हद्द आहे-
निरोप गेलेलाच आहे;
कुणीतरी तुमच्या मदतीला येईलच!”
गुडघाभर पाण्यातनं वाट काढली-
(पाण्यात धोतर वर करून चालणे- लाटांचा आवाज)
पलिकडच्या गावात एकजण भेटला. म्हणाला,
“दमला असला! भाकरी खा आणि देवळात जाऊन झोपा-“
(रंगमंच पूर्ण प्रकाशानं उजळतो... नव्या उत्साही सुरात)