भूमिका-१ (8)

पाकिस्तानने भारताबाबत सतत शत्रुत्वाचीच भूमिका घेतलेली आहे. पाकिस्तानच्या दृष्टीने काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांच्यांतील एक विवाद्य प्रश्न आहे. काश्मीरचा भूभाग हा आमच्या दृष्टीने निश्चितच जसा महत्त्वाचा आहे, तसाच तो आमचा आहे. आमच्या भूमीचा इंच अन् इंच भाग आम्हांला प्रिय वाटतो; परंतु भारत-पाकिस्तान वाद केवळ काश्मीरपुरताच मर्यादित नाही. भूभागापेक्षाही अधिक महत्त्वाच्या गोष्टी त्यात अंतर्भूत आहेत. आपल्या लोकशाहीवादी राष्ट्रीय जीवनाशी तो प्रश्न निगडित आहे. खरे आव्हान तेच आहे.

आजचा भारत कसा आहे? भारत जर लोकशाहीवादी आणि धर्मनिरपेक्ष राहणार नसेल, तर त्याला काहीच अर्थ उरणार नाही, ही गोष्ट आपण नीट समजावून घेतली पाहिजे. आपल्या संरक्षणाच्या दृष्टीने ती महत्त्वाची आहे. त्यासाठी आपल्याला भारताच्या गेल्या एक हजार वर्षांच्या इतिहासावर नजर टाकली पाहिजे. गेल्या हजार वर्षांचा भारताचा इतिहास हा भारतावर झालेल्या आक्रमणांचा इतिहास आहे. पूर्वीच्या काळी वायव्येकडून ही आक्रमणे झाली. टोळ्यांमागून टोळ्या, सैन्यांमागून सैन्ये येत होती आणि भारत पादाक्रांत करू पाहात होती. नंतर पश्चिमेकडून सागरी मार्गाने आक्रमणे झाली. या प्रत्येक आक्रमणाच्या वेळी भारत पराभूत झाला, ही वस्तुस्थिती मान्य केलीच पाहिजे.

आपण का पराभूत झालो? आपल्या देशात प्रतिकाराची परंपराच नव्हती का? आपल्या देशात रणधुरंधर नव्हते का? तसे मुळीच नव्हते. उलट, या भूमीने अनेक पराक्रमी वीर आणि शूर योद्धे यांना जन्म दिलेला आहे. अशीच इतिहासाची साक्ष आहे. हा देश त्यागामध्ये कधीही उणा पडलेला नाही. तशी बुद्धिवंतांचीही कधी वाण नव्हती. तरीही आपण पराभूत झालो, ही वस्तुस्थिती शिल्लक उरतेच. मग असे का झाले? आपण चंद्रगुप्त, अशोक, चाणक्य आणि विजयनगर यांच्या परंपरा सांगतो. त्या परंपरा असूनही आक्रमकांसमोर आपल्याला नमते घ्यावे लागले. आपल्यापाशी शूर सैनिक होते, मोठे सैन्य होते, पराक्रमाचा वारसा होता आणि तरीही आपण आक्रमकांपुढे नमलो, याचे कारण आपण एक राष्ट्र नव्हतो. १९६२ मध्ये नेफा विभागात आक्रमकाला यशस्वी रीतीने रोखले, हा गेल्या हजार वर्षांच्या इतिहासातील पहिला प्रसंग आहे. १९६५ मध्ये पाकिस्तानच्या सुसज्ज लष्कराने आपल्यावर चाल केली, सुरुवातीला त्याला थोडेसे यशही मिळाले. परंतु नंतर आपण आक्रमकांना रोखले आणि त्यांचा पराभवही केला. याचे कारण आजचा भारत हा खरा भारत आहे. आजचा भारत हा लोकशाहीवादी देश आहे. सर्व प्रांतांतील सर्व धर्मांचे, सर्व भाषिक गटांतील भारतीय एक होऊन आक्रमकांविरुद्ध उभे ठाकले.

हा नवा भारत काही विशिष्ट मूल्यांवर उभा आहे. ही कोणती मूल्ये आहेत? लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता ही ती मूल्ये आहेत. पंजाब, काश्मीर, राजस्थान आणि सिंध येथे कोण लढले? ते केवळ सिंधी किंवा पंजाबी किंवा काश्मिरी नव्हते. पंजाब, काश्मीर, राजस्थान येथल्या भूमीवर केवळ पंजाबी, काश्मिरी आणि राजस्थानी लोकांचे रक्त सांडलेले नाही. तामीळ लोकांचे रक्त तेथे सांडले, केरळीयांचे सांडले, कर्नाटकीयांचे सांडले, गुजरात्यांचे सांडले. म्हणून मी म्हणतो, की भारताचा नवा इतिहास लिहिला जात आहे, तो केवळ शाईने आणि लेखणीने लिहिला जात नाही. तलवार आणि रक्त यांनी तो लिहिला जात आहे. तलवार आणि रक्त यांनी लिहिला जात असलेला इतिहास हा खराखुरा आधुनिक इतिहास आहे. आपल्याला असा इतिहास घडविणारा भारत हवा आहे.