१९६२ मध्ये जे घडले, त्याचे स्वतंत्र महत्त्व आहे, असे मी मानतो. कारण त्या घटनेने भारताच्या केवळ संरक्षणविषयक समस्येच्या दृष्टीनेच नव्हे, तर राजकीय दृष्ट्याही दीर्घकालीन परिणाम घडवून आणला. त्यावेळी चीनने सीमावाद उकरून काढून भारतावर आक्रमण केले. चिनी सैनिक नेफा-लडाखमध्ये घुसले आणि एके दिवशी सकाळी अचानक चीनने आपण माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्याप्रमाणे त्याने आपले सैन्य मागे घेतलेही.
२० नोव्हेंबर १९६२ ची रात्र अजूनही आपल्याला आठवते. त्यावेळी चीनने एकतर्फी माघारीची घोषणा केली, त्याच दिवशी मी मुंबईहून संरक्षणपदाची वस्त्रे घेण्यासाठी दिल्लीस गेलो. चीनबरोबर लढण्यासाठी माझी संरक्षणमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. चीनबरोबरची लढाई आता उरलेलीच नाही, हे मला दुस-या दिवशी सकाळी समजले. मी दिल्लीस गेलो, म्हणून लढाई थांबली, असे मला म्हणायचे नाही; परंतु तसे घडले, हे मात्र खरे. महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की चीनने आक्रमण का केले आणि नंतर एकतर्फी माघार का घेतली? व्यापलेला सगळाच प्रदेश चीनने सोडलेला नाही. अजून लडाखचा काही भाग त्याच्याच ताब्यात आहे. यामागचे कारण समजावून घेतले पाहिजे. चीन काही गमतीकरिता आलेला नव्हता. किंवा हिमालयाची सहल करण्याकरिता त्याने आपल्या सैन्यास धाडले नव्हते. चिनी सैनिक शस्त्रास्त्रे घेऊन आलेले होते. त्यांच्यापाशी तोफखाना होता. ते आपल्या लोकांशी लढले. त्यांनी आपली शक्ती दाखविली. आपल्यापाशी सामर्थ्य आहे, हे त्यांना कळून आले; पण या आक्रमणामागचा उद्देश कोणता होता? ज्या देशाबरोबर आपल्याला युद्ध करावे लागते, त्याचा राजकीय उद्देश समजावून घेतल्याशिवाय आपल्याला लढता येत नाही. म्हणून चीनचा आक्रमणामागचा उद्देश समजावून घेतला पाहिजे. मला असे वाटते, की या आक्रमणामागे चीनचे दोन-तीन हेतू असावेत. ज्या जगात आपण राहतो, त्या जगात राजकीय दृष्ट्या चीन महत्त्वाचा आहे, भारत नव्हे, हे आफ्रिकी-आशियाई इ. देशांना कळावे, हा चीनचा एक हेतू असावा. लष्करीदृष्ट्या चीन बलवान आहे, भारत नव्हे, हे जगाला दाखवून द्यायचे असावे आणि आपले आर्थिक विचार, आर्थिक सिद्धता आणि आर्थिक साधनसंपत्ती यांच्यावर एक प्रकारचा ताण पडावा, हा त्याचा दुसरा हेतू असावा. कारण तोपर्यंत आपण आपल्या आर्थिक विकासावर विशेष भर देत होतो. आपण आपली आर्थिक साधनसामग्री वाढविली, आर्थिक बाबतीत देश स्वयंपूर्ण केला, तर आपली संरक्षणक्षमता वाढवू शकू, असे आपण मानत होतो.
आक्रमण करून भारताची आर्थिक ताकद खच्ची करावी, असे चीनला वाटत असले पाहिजे. भारताला अलिप्ततावाद सोडायला भाग पाडावे, हा त्याचा तिसरा हेतू असावा, असेही मला वाटते. अमेरिका आणि रशिया यांच्या दरम्यान सुरू असलेल्या शीतयुद्धापासून आपण अलिप्त राहावे आणि या दोन्ही गटांतील राष्ट्रांशी मैत्रीचे संबंध ठेवावेत, ही भारताची भूमिका चीनला रुचण्यासारखी नव्हती.
चीनच्या १९६२ मधील आक्रमणाने अनेक राजकीय प्रश्न स्पष्ट केले आहेत. शीत युद्ध हे दोन लष्करांतील युद्ध नसते. जागतिक वर्चस्वासाठी धडपडणा-या भिन्न विचारसरणींमधील ते युद्ध असते. अशा युद्धाचे नेतृत्व आपल्याकडे यावे, अशी चीनची आकांक्षा आहे. या आकांक्षेबरोबरच त्याला आणखी एका महत्त्वाकांक्षेने ग्रासलेले आहे. सा-या जगाचे नाही, तरी निदान आशियाई-आफ्रिकी देशांचे राजकीय नेतृत्व आपल्याकडे यावे, असे चीनला वाटते.