आपल्या देशात वारंवार आंदोलने होत असतात, त्यांचे मी चार वर्ग करू इच्छितो. नैतिक संतापातून जन्म पावणारी आंदोलने पहिल्या वर्गात येतात. अशा आंदोलनांत लोकांच्या संतापाला तसेच काही तरी कारण घडलेले असते. त्याचे एक उदाहरण सांगतो. कोणी एक फकीर मुलांना पळवून नेतो, अशी बातमी पसरताच लोकांनी त्याला शोधून काढले व रागाच्या भरात ठार मारले. अशा घटनांबाबतचा लोकांचा राग मी समजू शकतो. परंतु त्यांनी कायदा स्वत:च्या हातात घेता कामा नये. गुन्हेगाराला त्यांनी कायद्यापुढे खेचले पाहिजे. लोक स्वत:च एखाद्याला शिक्षा करू लागले, तर देशात कोणती परिस्थिती उद्भवेल, याची कल्पना करणे अवघड नाही. काही विशिष्ट धार्मिक, जातीय वा आर्थिक कारणांमुळे लोक संतप्त होतात आणि आंदोलने सुरू करतात. ही दुस-या वर्गातील आंदोलने होत.
तिसरा वर्ग सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी आयोजित केल्या जाणा-या आंदोलनांचा.
चौथा आणि शेवटचा वर्ग राजकीय वा सामाजिक आंदोलनांचा.
लोकांचे जीवनमान सुधारावे, यासाठी प्रचलित अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्था बदलावी, ही मागणी न्याय्य आहे, याबद्दल वाद नाही. लोकांचे शोषण थांबले पाहिजे, उत्पन्नांतील तफावत कमी झाली पाहिजे, प्रत्येकाला आपला विकास करण्याची समान संधी लाभली पाहिजे, अशी मागणी करण्यात काहीही गैर नाही. वर्गविरहित आणि शोषणमुक्त समाज हा आपण आदर्श समाज मानतो. परंतु असा समाज अल्पावधीत निर्माण करण्याची काही लोकांना घाई झालेली असते. ते काहीही करायला मागेपुढे पाहात नाहीत. कायद्याने समाज-परिवर्तन होणार नाही, असे ते गृहीत धरूनच चाललेले असतात.
काही लोक असा प्रश्न करतील, की गांधीजींनी नव्हती का प्रत्यक्ष आंदोलनाची हाक दिली? म्हणूनच गांधीजींची जनआंदोलनाची कल्पना आपण नीट समजावून घेतली पाहिजे. कारण भारतात प्रत्यक्ष आंदोलनाचे पहिले प्रवर्तक गांधीजीच होते. मी तर असे मानणारा आहे, की सत्याग्रहाची कल्पना गांधीजींची आधुनिक जगाला लाभलेली फार मोठी देणगी आहे. परंतु त्याचबरोबर हेही लक्षात घेतले पाहिजे, की गांधीजी आपल्या आंदोलनाला सत्याग्रह म्हणत असत. गांधीवादी सत्याग्रह हे केवळ सामुदायिक आंदोलन नव्हते. गांधीजी साध्याइतकेच साधनालाही महत्त्व देत असत. दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्यापासून ते जीवनाच्या अखेरपर्यंत गांधीजींनी अनेक सत्याग्रह केले. त्यांचे बलिदान, हाही एक सत्याग्रहच होता, असे मी म्हणेन.