भूमिका-१ (13)

संरक्षणाचा विचार करताना शेतीचा प्रश्नही विचारात घेतला पाहिजे. आपण जर अन्नधान्यासाठी इतर देशांकडे याचना करू लागलो, तर त्यांची आपल्यासंबंधी काय कल्पना होईल? ते म्हणतील, 'तुम्हांला जर पुरेसे धान्य पिकवता येत नसेल, तर जागतिक शांतता, स्वातंत्र्यरक्षण इत्यादी बडे शब्द उच्चारण्याचा तुम्हांला अधिकार पोहोचत नाही.' अमेरिकेसारख्या मित्रदेशाने आपल्याला अन्नधान्याची मदत केली, याबद्दल आपण त्याचे आभार मानू; पण तेवढ्यावर थांबून चालणार नाही. आपल्याला अन्नधान्याची आयात करावी लागणार नाही, इतके शेती-उत्पादन वाढविले पाहिजे.

संरक्षणमंत्री म्हणून मी १९६४ मध्ये याचनायात्रेवर गेलो होतो. मी अमेरिकेला गेलो, इंग्लंडला गेलो, रशियाला गेलो. या देशांनी आपल्याला काही ना काही मदत देण्याचे आश्वासन दिले. हे सगळे देश आपल्याशी चांगले वागले. आपल्याला मदत करण्याची त्यांची इच्छा होती. हे सगळे ठीक होते. तरीही एक गोष्ट मला जाणवली. भारताला काय द्यायचे नाही, हे त्यांनी अगोदरच ठरविले होते. त्या गोष्टी सोडूनच त्यांनी आपल्याला मदत केली. कारण कोणताही देश आपल्याजवळची सर्वांत चांगली आणि प्रभावी शस्त्रास्त्रे दुस-याला देत नसतो. म्हणून आपल्याला जर स्वातंत्र्य टिकवायचे असेल, तर आपण स्वयंपूर्ण झालो पाहिजे. स्वयंपूर्णतेतूनच देश समर्थ होऊ शकतो.

स्वयंपूर्ण होणे अवघड आहे, याची मला जाणीव आहे. केवळ स्वयंपूर्णतेचा गजर करून ती साध्य होणार नाही. स्वयंपूर्णतेसाठी नियोजन हवे असते. आपली तांत्रिक क्षमता विकसित करायला हवी. कोणते कार्यक्रम आधी घ्यावयाचे, कोणते नंतर घ्यावयाचे, हे सारे ठरवायला हवे. स्वयंपूर्णतेचा प्रवास लांब पल्ल्याचा आहे. तरीही त्याला प्रारंभ हा केलाच पाहिजे.

भावी काळ आपली कसोटी पाहणारा ठरणार आहे. परंतु त्याचबरोबर संकटांना आणि अडचणींना तोंड देण्याचा निर्धार आपल्या हृदयात जागा झालेला आहे. या निर्धारावरच आपली प्रगती आणि शांतता निर्भर राहणार आहे. कारण शांततेसाठीही सामर्थ्य हवे असते. मी रशियाला गेलो असताना, बोलण्याच्या ओघात ख्रूश्चोव्ह म्हणाले, 'तुम्ही आमच्याकडे ब-याच गोष्टी मागत आहात, आम्ही त्या देऊही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमचा देश शांतताप्रेमी आणि अलिप्ततावादी आहे. तुम्हांला शांतताप्रेमी आणि अलिप्ततावादी राहायचे आहे; पण हे शांतताप्रेम आणि अलिप्तता टिकविण्यासाठीही तुम्हांला बलिष्ठ व्हायलाच हवे.' त्यांचा हा उपदेश मला फार महत्त्वाचा वाटला. आता आपण तो अमलात आणीत आहोत. ही गोष्ट आपल्याला माहीत नव्हती, असे नाही; परंतु अनुभवाने पुन्हा आपल्याला तिचे महत्त्व जाणवले आहे.

आपण दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. मैत्री आणि जागतिक शांतता यांच्यावरील आपली श्रद्धा कधीही कमी होता कामा नये. आपल्याला कोणत्याही देशाचा द्वेष करावयाचा नाही, इतर देशांच्या मैत्रीचा आदर करून जागतिक शांतता बळकट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर आपण आपला देश आर्थिक आणि लष्करी दृष्टीने बलिष्ठ करावयास हवा. देशभक्तीची जाणीव सतत प्रज्वलित ठेवायला हवी. आपण या दोन्ही गोष्टी ध्यानात ठेवल्या, तर जगातील कोणतीही शक्ती भारताची प्रगती रोखू शकणार नाही.

भारताने लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. तो निरंतर लोकशाहीवादीच राहील, अशी माझी श्रद्धा आहे. लोकशाहीमध्ये अंतिम सत्ता लोकांच्याच हातांत असते. लोकांची ही सार्वभौमता अखंडित राहिली पाहिजे, असे मी मानतो. निर्धार, विश्वास आणि देशनिष्ठा यांच्या आधारांवर आपल्याला आपल्या या महान देशाचे उज्ज्वल भवितव्य घडवायचे आहे.