भूमिका-१ (14)

३. भारतीय नागरिकत्वाची आठवण

१९६६ साली संरक्षणमंत्री असताना
स्वातंत्र्यदिनानिमित्ताने सैनिकांना व जनतेला
उद्देशून केलेले संदेशवजा भाषण.

भारतीय प्रजासत्ताकाची स्थापना झाली, तो दिवस या देशाच्या इतिहासातील नव्या लोकशाही युगाचा पहिला दिवस म्हणून आपण सर्वजण साजरा करतो. पण हा जसा लोकशाहीचा उत्सव आहे, लोकांच्या विजयाचा उत्सव आहे, तसाच आपण ज्या नव्या बंधनाने सर्वजण इतिहासात प्रथमच बांधलो गेलो, त्या समान भारतीय नागरिकत्वाचाही तो जन्मदिन आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. आपल्या राज्यघटनेने हे नवे नाते निर्माण केले. या नात्याने प्रचंड प्रजासत्ताक राज्याचा नागरिक म्हणून आपल्याला अधिकार मिळाले. कोणत्याही धर्माचा नागरिक या देशात सारख्याच दर्ज्याने वागविला जाईल. स्त्री आणि पुरुष असा भेद दाखविला जाणार नाही. कोणत्याही जातीचा, कोणत्याही वर्गाचा नागरिक असला, तरी राज्यसंस्था त्याला नि:पक्षपातीपणे वागवील. अशी ही राज्यघटनेची देणगी आपणांला या दिवशी मिळाली. प्रजासत्ताक राज्याचा उत्सव साजरा करताना हे ऋण आठवले पाहिजे. आपली नागरिक या नात्याने काय जबाबदारी आहे, हे ओळखले पाहिजे. हा एक लोकशाही नागरिकत्वाचे संस्कार करणारा उत्सव आहे. आपण भाऊबीजेच्या दिवशी बहिणीवरचे आपले प्रेम व्यक्त करतो. त्या नात्याची आठवण आपणांला येते. नात्याची आठवण देणारा तो एक संस्कार आहे. प्रजासत्ताक राज्याचा उत्सव हाही असाच एक राष्ट्रीय संस्काराचा प्रयत्न आहे. पण संस्काराचा उपयोग आपल्या वागणुकीसाठी झाला पाहिजे. संस्कार व्हावयाचे असतील, तर मन उघडे ठेवले पाहिजे. प्रजासत्ताक राज्याचा नागरिक म्हणून आपले वर्तन योग्य रीतीने व्हावे, असे वाटत असेल, तर आपल्याला आपल्या मनाचीही त्यादृष्टीने जोपासना करावी लागेल.

भारतीय प्रजासत्ताकाचा नागरिकधर्म यशस्वी व्हावयाचा असेल, तर आपले मन भारतीय राहिले पाहिजे. गेल्या दीडशे वर्षांत हे भारतीय मन घडविण्याचे प्रयत्न महर्षी दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी आदी राष्ट्रीय नेत्यांनी केले आहेत. स्वातंत्र्यासाठी लढत असताना ही जी भारतीयतेची घडण झाली, तिचाच भावनोत्कट उद्गार म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोसांनी दिलेली 'जय हिंद' ही घोषणा होय. इतिहासातील योगायोग असा, की ही घोषणा सैनिकांना दिली गेली, ती आराकानच्या, इंफाळच्या आणि सिंगापूर-मलायाच्या जंगलात घुमली आणि तिचे पडसाद भारतात उमटले. भारतातही ती स्वीकारली गेली. पण हा ऐतिहासिक योगायोग असला, तरी त्यात फार मोठे सत्य आहे. ते सत्य म्हणजे भारतीय सैन्य हे भारताच्या राष्ट्रीय ऐक्याचे प्रत्यक्ष दिसणारे रूप आहे.