लोकनेते यशवंतराव चव्हाण - ४३

१२. अखेरचा प्रवास

कोणत्याही यशस्वी पुरुषामागे त्याच्या पत्नीची साथ महत्त्वपूर्ण असते. यशवंतरावांच्या जीवनात त्यांच्या पत्नी वेणूताईंची साथ खूपच मोलाची मानावी लागेल. आयुष्याच्या प्रत्येक चढउतारावेळी वेणूताईंनी त्यांना खूप मोठा आधार दिला. १ जून १८८३ रोजी वेणूताई चव्हाणांचे दुःखद निधन झाले. आयुष्याच्या अखेरीस ख-या अर्थाने पत्नीचा आधार हवा होता, अशावेळीच वेणूताई निघून गेल्याने यशवंतरावांना खूप मोठा मानसिक धक्का बसला. वेणूताईंशिवया जीवन हा विचारच यशवंतरावांना सहन होण्यासारखा नव्हता. यानंतरचा बराच काळ यशवंतराव अस्वस्थ होते. ‘भारत-पाक युद्ध’, ‘भारत-चीन युद्ध’ अशा अनेक कठीण प्रसंगांना तोंड देणारा हिमालयासारखा खंबीर मनाचा हा माणूस यावेळी मात्र खचला. वेणूताईंच्या जाण्याचे दुःख यशवंतरावांना पचविणे खूपच मुश्किल बनले. अखेरीस नियतीपुढे कोणाचेच काही चालत नाही. काळ कोणासाठी थांबत नाही. यशवंतरावांना हे दुःख पचविण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

वेणूताईंच्या निधनानंतर यशवंतरावांनी आपले इच्छापत्र (वुईल) लिहिले. या इच्छापत्रानुसार ९ जानेवारी १९८४ रोजी ‘वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’ ची स्थापना करण्यात आली. १ जून १९८४ रोजी वेणूताईंच्या प्रथम पुण्यतिथीला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या उपस्थितीत कराड येय़े वेणूताईंच्या स्मारकाचे भूमिपूजन यशवंतरावांनी स्वतःच्या हस्ते केले. या स्मारकासाठी लागणा-या रक्कमेपैकी जास्तीत-जास्त रक्तम आपण स्वतःच द्यायची. सौ. वेणूताईंचे दागिने विकून व उरळीकांचन येथील बागायत जमीन विकून ती सर्व रक्कम या स्मारकासाठी देण्याची तरतूद यशवंतरावांनी आपल्या ईच्छापत्रात लिहून ठेवली होती. या स्मारकासाठी शिवाजीनगर को. ऑ. हौसिंग सोसायटीने १८ गुंठे जागा उपलब्ध करून दिली. बांधकामाची जबाबदारी न्यूट्रीओ बिल्डर्स यांच्यावर सोपविली गेली. हे स्मारक पूर्णत्वास आलेले पहाण्याचे भाग्य मात्र यशवंतरावांना लाभले नाही. यशवंतरावांच्या मृत्यूपश्चात या स्मारकाचे उद्घाटन महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल सी. सुब्रम्हण्यम यांच्या हस्ते २५ नोव्हेंबर १९९२ रोजी करण्यात आले. कराडच्या शिवाजी स्टेटियम समोरील अत्यंत रमणीय जागेत हे स्मारक उभारले गेले असून या स्मारकामध्ये यशवंतरावांनी वाचलेली पुस्तके, त्यांनी हाताळलेले संदर्भग्रंथ, दुर्मिळ नोंदी, लिहिलेली पुस्तके, वापरलेल्या वस्तू आदींचे वस्तूसंग्रहालय निर्माण केले आहे. १९६२ पासून यशवंतरावांनी वापरलेली अम्बॅसीडर गाडीही येथे जनत करून ठेवण्यात आली आहे. सौ. वेणूताई व यशवंतरावांच्या सहजीवनाची चिरंतन आठवण सांगणारा मौलिक ठेवा म्हणजेच ‘सौ. वेणूताई चव्हाण स्मारक’ होय.

आपल्या जीवनाचा उत्तरार्ध जवळ आला आहे याची जाणीव यशवंतरावांना होऊ लागली होती. आपल्या जीवनाची जडण-घडण कशी झाली याची मांडणी करण्याचा विचार त्यांच्या मनात घर करत होता. ज्या कृष्णेच्या काठावर लहानाचा मोठा झालो, ज्या कृष्णेने आपल्याला वाढविले, तिच्या आठवणी त्यांना सदैव होऊ लागल्या. विचार भूतकाळाचा वेध घेण्यासाठी धावू लागले. या विचारमंथनातून यशवंतरावांनी आपले आत्मचरित्र लिहावयास घेतले. ज्या कृष्णेच्या काठावरून आपल्या जीवनाची सुरूवात झाली, त्यावरून यशवंतरावांनी आपल्या आत्मचरित्राला ‘कृष्णाकाठ’ असे समर्पक नाव दिले. आपल्या संघर्षमय जीवनाचे सिंहावलोकन त्यांनी या आत्मचित्रातून केले. ७ फेब्रुवारी १९८४ रोजी या आत्मचरित्राच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन झाले. ‘केसरी-मराठा’ या संस्थेतर्फे आत्मचरित्रास ‘साहित्यसम्राट न. चि. केळकर पारितोषिक’ देऊन गौरविण्यात आले. यशवंतरावांचे संघर्षमय, त्यागमय जीवन ‘कृष्णकाठ’ या आत्मचरित्राद्वारे वाचकांसमोर आले.

जीवनभर अविश्रांत परिश्रम घेतलेला हा तेजोमय पुरुष आता थकला होता. मन धावत होते पण शरीर साथ देत नव्हते. घडणा-या घडामोडींकडे पहात रहाणे एवढेच आता हातात होते. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी पंतप्रधान इंदिराजी गांधींची पहारेक-यांकडूनच गोळ्य झाडून निघृण हत्या झाली. मारेकरी शीख धर्मीय असल्याने देशभर शीखविरोधी दंगल भडकलेली होती. यशवंतरावांसह सर्वच प्रमुख नेते धार्मिक सलोखा राखण्यासाठी प्रयत्नशील होते. दंगल कोणत्याही परिस्थितीत नियंत्रणात आणणे एवढेच उद्दिष्ट होते. अथक प्रयत्नानंतर दंगल नियंत्रणात येऊ लागली. हिंसेचा आगडोंब काही दिवसातच आटोक्यात आला. यशवंतराव काहीसे निर्धास्त झाले. नवे पंतप्रधान म्हणून राजीव गांधींची निवड झाली. नेहरू-गांधी घराण्यातील तिसरे नेतृत्त्व सत्तेवर आले. देशाला राजकीय स्थिरता प्राप्त करून देण्यात यशवंतरावांनी महत्त्वाची भूमिका बजावली.