लोकनेते यशवंतराव चव्हाण - १८

ऑक्टोबर १९७६ मध्ये अमेरिका भेटीप्रसंगी यशवंतरावांना हेस्टन येथील टेक्सास शहरातर्फे 'सदिच्छा राजदूत' म्हणून मानपत्र देऊन गैरविण्यात आले. देश-विदेशातील सन्मान स्विकारत असतानाच राजकीय क्षेत्रातील उलथापालथीतही यशवंतराव अग्रेसर होते. १९७२ च्या लोकसभेच्या पंचवार्षिक निवडणूकीत महाराष्ट्रात काँग्रेसला ४३ जागा मिळाल्या. यशवंतराव 'सातारा' लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. यानंतरची त्यांची केंद्रीय परराष्ट्रमंत्री पदाची कारकीर्द खूप उल्लेखनीय ठरली.

१९७१ च्या मध्यावधी निवडणूकीत काँग्रेसला मोठे यश मिळाले. याच सालात भारत-पाकिस्तान यांच्यात युध्द झाले. इंदिरा गांधींच्या कणखर नेतृत्त्वासमोर पाकिस्तानचा टिकाव लागला नाही. पाकिस्तानचा सपशेल पराभव करुन बांग्लादेशाची निर्मिती करण्यात भारताने मोठी भूमिका पार पाडली. इंदिराजींच्या कणखर नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब झाले. यावेळी यशवंतराव देशाचे अर्थमंत्री होते. १९७४ नंतर इंदिरा गांधीचा प्रभाव हळूहळू कमी होऊ लागला. लोकनायक जयप्रकाश नारायणांच्या 'संपूर्ण क्रांतीच्या' आंदोलनाची व्यापती संपूर्ण देशभर वाढू लागली. प्रथम गुजरात नंतर बिहार पाठोपाठ संपूर्ण देशभर हे आंदोलन पसरले गेले. याच दरम्यान ५ जून १९७५ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींची लोकसभेतील निवड रद्द ठरवली. शिवाय येथून पुढे सहा वर्षे निवडणूक लढविता येणार नाही असा ऐतिसाहासिक निकाल दिला. या निकालावर मात करण्यासाठी देशात आणीबाणी लागू करणे हा एकमेव पर्याय इंदिरा गांधींसमोर होता.  २५ जून १९७५ रोजी देशांत अंतर्गत आणीबाणी लागू करून नागरिकांचे मूलभूत अधिकार गोठविण्यात आले. अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आले. देशभर इंदिरा गांधींच्या निर्णयाविरुद्ध असंतोषाची लाट निर्माण झाली. याप्रसंगी पक्षनिष्ठेला प्राधान्य देऊन यशवंतराव इंदिरांजींसोबत राहिले.

लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्याचा आग्रह धरणारा जयप्रकाशांच्या नेतृत्त्वाखालील एक वर्ग तर दुस-या बाजुला इंदिरा गांधींची एकाधिकारशाही अशी भारतीय राजकारणाची विभागणी झाली होती. भारतीय राजकारण एका विशिष्ट वळणावर येऊन पोहचले होते. याचा अपेक्षित तो परिणामी आगामी लोकसभेच्या निवडणूकीत दिसून आला.

१९७७ च्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसला सपाटून पराभव पत्करावा लागला. विचारवंत नागरी स्वातंत्र्यावर निष्ठा असणार वर्ग जयप्रकाशांसोबत गेला. इंदिरा गांधी, शंकर दयाळ शर्मा, संजय गांधी असे दिग्गज उमेदवार पराभूत झाले. यशवंतराव मात्र महाराष्ट्रातून विजयी झाले. जयप्रकाश नारायणांच्या नेतृत्त्वाखालील जनता पक्षाची देशभर लाट निर्माण झाली. 

'अंधेरे में एक प्रकाश, जयप्रकाश ! जयप्रकाश !'

ही घोषणा देशभर लोकप्रिय झाली होती. जनता लाटेत काँग्रेस सरकार पराभूत झाले. यावेळी मोरारजीभाई, जगजीवनराम, चंद्रशेखर, मोहन धारिया आदी नेते जयप्रकाशांच्या सोबत होते. मोरारजीभाई देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार केंद्रात सत्तेवर आले. जनसंघ, समाजवादी, व स्वतंत्र आदी पक्षांचे हे सरकार होते. काँग्रेसला विरोधी बाकावर बसावे लागले. यशवंतरावांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून काँग्रेसने त्यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून निवडले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच लोकसभेतील मान्यताप्राप्त पक्षाचे विरोधी पक्षनेतेपद यशवंतरावांना मिळाले. विरोधी पक्षनेता कसा असावा याची प्रचिती यशवंतरावांनी लोकसभागृहात दाखवून दिली. मोरारजीभाई देसाईचे सरकार जास्त काळ टिकले नाही. अंतर्गत मतभेदामुळे जनता पक्षात फूट पडली. कशीबशी दोन वर्षाची कारकीर्द पूर्ण केलेले मोरारजीभाईंचे सरकार कोसळले व चौधरी चरणसिंग यांच्या नेतृत्त्वाखाली जुलै १९७९ मध्ये नवीन सरकार केंद्रात सत्तेवर आले. इंदिरा गांधीच्या अप्रत्यक्ष पाठिंब्यानेच या सर्व घडामोडी घडत होत्या.