कथारुप यशवंतराव-...त्यांचे काय करायचे ?

त्यांचे काय करायचे ?

यशवंतरावांनी आपल्या सा-या निष्ठा कॉंग्रेस पक्षाला वाहिल्या होत्या. पण याचा अर्थ असा नव्हे की, त्यांच्यावर इतर राजकीय विचारांचा प्रभाव नव्हता. समाजवादी, रॉयवादी, हिंदुत्ववादी अशा अनेक विचारधारांशी त्यांचा परिचय झाला होता. पण त्यांची भूमिका डोळस सत्यशोधकाची असल्याने त्यांना फार काळ वैचारिक गोंधळाचा सामना करावा लागला नाही. राष्ट्रीय सभेचे जे व्यापक संस्कार त्यांच्यावर झाले ते प्रभावी ठरले. इतर समकालीन प्रवाहांचा अभ्यास मात्र ते आवर्जून करीत असत. अगदी वयाच्या विसाव्या वर्षापासूनच त्यांची ही चिकित्सक वृत्ती दिसून येते. ते १९३४-३५ सालचे दिवस होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे व्याख्यान कराडमध्ये आयोजित केलेले होते. तरूण यशवंतराव श्रोते म्हणून या व्याख्यानास हजर होते. डॉ. हेडगेवार यांच्या व्यक्तिमत्त्वाने ते प्रभावित झाले, पण ' आसिंधु सिंधू ' ही जी हिंदुत्वाची व्याख्या सावरकरांनी केली होती त्या व्याख्येप्रमाणे जो वागेल तोच हिंदुस्थानचा खरा निष्ठावान नागरिक असे मत हेडगेवारांनी मांडले. यशवंतरावांना ही भूमिका पटली नाही. व्याख्यान संपल्यानंतर त्यांनी हेडगेवारांना विचारले, ' आपण सांगितलेल्या व्याख्येत बसत नाहीत अशी कोट्यवधी माणसे या देशात आहेत , त्यांचे काय करायचे ?'

यावर हेडगेवार म्हणाले, ' जेव्हा हा प्रश्न उभा राहील, तेव्हा पाहता येईल.'

यशवंतरावांनी ओळखले की ही संघटना सर्व धर्मांच्या लोकांना बरोबर घेऊन जाऊ शकत नाही. तेव्हापासून आय़ुष्यभर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून दूर राहिले.