व्याख्यानमाला-१९९०-१

व्याख्यान पहिलेः दिनांक १३ मार्च १९९०

व्याख्यान दुसरेः दिनांक १४ मार्च १९९०

विषयः “भारतीय राजकारण : अभ्यासाची एक दिशा”

व्याख्याते : प्रा. डॉ. राम जोशी, माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

व्याख्यात्यांचा परिचय

प्रा. डॉ. राम जोशी यांचा जन्म १९२४ साली पडगे, जिल्हा ठाणे येथे झाला. शालेय शिक्षण चिंचणी, अनाथ विद्यार्थी गृह पुणे यांच्यामार्फत, तर महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या रूईया कॉलेज व मुंबई विद्यापीठाच्या अर्थ व राज्यशास्त्र विभागातून पूर्ण झाले. १९४७ ते १९७७ या तीस वर्षाच्या कालावधीत त्यांनी पोद्दार कॉलेज, रामनारायण रूईया कॉलेज, एस. आय. ई. एस. कॉलेज इत्यादि ठिकाणी अध्यापनाचे कार्य केले. तसेच परदेशातील टेक्सास, डेनव्हर, पेन्सिलव्हेनिया, मिल्स कॉलेज, व्हॅसार कॉलेज, सँन फ्रॅन्सिस्को या सारख्या अमेरिकेतील नामवंत संस्थेतही अध्यापनाचे कार्य केले.  

आपल्या ज्ञानलालसेतून त्यांनी अध्यापनाच्या पवित्र व्यवसायाद्वारे देशात व देशाबाहेर मोठा नावलौकिक संपादन केला. त्याचा परिपाक शैक्षणिक सन्मान त्यांच्याकडे आपणहून चालत आहे. उस्मानिया विद्यापीठाची सन्मान्य डी. लिट्. पदवी, टेक्सास विद्यापीठातील विद्यार्थ्यांद्वारे सर्वोत्कृष्ट शिक्षक म्हणून झालेली निवड आणि डेटन, ओहायो येथील इंडिया फौंडेशनतर्फे अमेरिकन विद्यापीठात गांधी विचारांचा प्रसार केल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आले.

साहित्यातील ही त्यांची कामगिरी नजरेत भरण्यासारखी आहे. त्यांनी भारतीय राज्य घटना, काँग्रेस आणि भारतीय राजकारण (संपादित ग्रंथ) व भारतीय राज्यांतील राजकारण – इंग्रजी लेखकासमवेत केलेले सहलेखन तसेच भारतीय व परदेशातील ख्यातनाम नियतकालिकातून ३० चे वर लेख प्रकाशित केलेले आहेत.

अध्यापन कार्य, लेखन कार्य आणि शैक्षणिक सन्मानांच्यामुळे त्यांना अनेक प्रशासकीय जबाबदा-या स्वीकाराव्या लागल्या. १९६३ ते ७७ पंधरा वर्षे प्राचार्य व १९७७ ते १९८३ मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून ते ख्यातकीर्त झाले. याशिवाय अनेक शासकीय समित्यांचे सभासदत्व, अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर इंडियन स्टडीज व अमेरिकन रिसर्च सेंटर इत्यादि संस्थांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरचे सभासदत्वही त्यांनी भूषविले.

सामाजिक, राजकीय कार्यातही त्यांचा मोलाचा सहभाग आहे. विद्यार्थीदशेत असताना १९४२ च्या चले जाव आंदोलनात सक्रीय सहभाग घेऊन कारावासही भोगला होता. महाराष्ट्र विधान परिषदेवरही त्यांनी काम केले आहे. डॉ. जोशी हे समाजवादी विचारसरणीचे एक क्रियाशील कार्यकर्ते आहेत.

महाराष्ट्रातील एख थोर साहित्यिक, परखड समाजवादी विचारवंत, राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक, व्यासंगी विद्वान आणि ख्यातनाम वक्ते म्हणून ते सर्वाना परिचित आहेत.