व्याख्यानमाला-१९७९-९

न्या. रानडे यांच्याही जीवनात असेच दोन प्रसंगी आलेले होते. एक प्रसंग असा. त्यांच्या बहिणीचा नवरा मरण पावला. न्या. रानडे हे कट्टे विधवा विवाहाचे पुरस्कर्ते. त्यामुळे सुधारक मंडळीनी न्या. रानडे यांना आपल्या बहिणीचा पुनर्विवाह करावा असा सल्ला दिला. परंतू न्या. रानडे यांचा तसे धैर्य झाले नाही त्यानी सांगितले की माझ्या बहिणीचा पुनर्विवाह केला तर माझ्या वडिलांच्या भावना दुखावल्या जाणार आहेत. तेव्हा मला या बाबतीत भावना दुखावल्या जाणार आहेत. तेव्हा मला या बाबतीत तुम्ही आग्रह करु नका. काही दिवसांनी न्या. रानडे यांची पत्नी वारली. त्यावेळी सुधारक मंडळींनी पुन्हा त्यांना सांगितलं की आपण विधवा विवाहाचे कट्टे पुरस्कर्ते, अनेक विधवा विवाहांना आपण हजर राहिलेला आहात. विंधवा विवाहासंबंधी काढलेल्या पत्रकावर आपण सह्या सुद्धा केलेल्या आहेत. तेव्हा आपण विवाह करणार असालच तर एखाद्या प्रौढ विधवेशी विवाह करावा असा आमचा तुम्हाला सल्ला आहे. न्या. रानडे यांचे वय त्या वेळी ३५ वर्षांचे होते. परंतु न्या. रानडे यांनी सुधारकांचा सल्ला झुगारून देऊन पुन्हा एकदा कच खाल्ली आणि १० वर्षाच्या रमा या कुमारिकेशी विवाह केला. न्या. रानडे यांच्या या उदाहरणामुळे सामाजिक पुरस्कार करणा-या मंडळीमध्ये सुद्धा दोन तट पडायला सुरुवात झाली. एकीकडे विधवाविवाहाचा पुरस्कार करायचा व दुसरीकडे स्वत:वरच पुनर्विवाह करण्याची पाळी आली की कच खायची विष्णुशास्त्री पंडित हे कर्ते सुधारक होते. उक्ती प्रमाणे त्यांनी कृती करुन दाखविली. परंतु न्या. रानडे हे बोलके सुधारक होते. त्यांच्यावर प्रसंग आला त्या दोन्हीही वेळी त्यांनी कृती करण्याचं साफ नाकारलं, जी धीट मंडळी होती त्यांनी अशा प्रकारच्या चळवळी पुढच्या काळातही चालविल्या. कौ. धोंडो केशव कर्वे यांचं उदाहरण आपल्यापुढे जिवंत आहे त्यांना त्यांच्या जातीतून विरोध झाला असतांना सुद्धा त्यांनी एका विधवेशी विवाह केला.

लोकहितवादी देशमुख हे त्या काळी गाजलेले मोठे सुधारक होते. त्यांनी आपल्या शतपत्रांतून हिंदुधर्मातील अनिष्ट रुढी, चाली, वर्णवर्चस्व, सामाजिक विषमता यावर प्रखर हल्ले चढविले. परंतू न्या. रानडे यांचे प्रमाणेच लोकहितवादी देशमुखांची शोचनीय अवस्था झाली. त्यांना इनाम कमिशनच्या संबंधात इंग्लंडला जाण्याची संधी आली असता समुद्रपर्यंटन करणे हे निषिद्ध असल्याने जाण्याचे टाळले. मात्र त्यांनी आपल्या मुलग्याला बॅरिस्टरच्या परीक्षेसाठी इंग्लंडला पाठविले होते. तो मुलगा इग्लंडहून परत आले नंतर सनातनी मंडळींनी लोकहितवादी देशमुख व त्यांचा मुलगा यांनी प्रायश्चित घ्यावं असा आग्रह धरला सुरुवातीला त्यांनी नकार दिला, परंतू सनातनी मंडळी स्वस्थ बसली नाहीत. त्यांनी लोकहितवादी देशमुख यांची मुलगी ज्या घराण्यात दिली होती तेथे तिच्या सासूला जाऊन ही मंडळी भेटली आणि तिला सांगितले तुझ्या व्याह्यांना प्रायश्चित्त घ्यावयास सांग, त्याप्रमाणे ती बाई देशमुखांच्याकडे गेली आणि त्यांना सांगितले की तुम्ही प्रायश्चित्त घ्यायचे नाकारून सनातन धर्माच्या विरुद्ध आचरण करीत आहात. तुम्ही मुकाट्यान प्रायश्चित्त घ्या. नाहीतर तुमच्या मुलीला मी नांदविणार नाही, तिला परत तुमच्याकडे पाठवून देईन. सनातन्यांनी असा पेच टाकल्यामुळे लोकहितवादी देशमुखांनी नाईलाजाने का होईना प्रायश्चित्त घेणेचे मान्य केले आणि गोमूत्र आणि गोमय प्राशन करुन प्रायश्चित्त घेतले.

विचारवंत आणि कर्ते सुधारक यांच्या मधला फरक हा, न्या. रानडे व लोकहितवादी देशमुख एका बाजूला व विष्णुशास्त्री पंडित आणि म. फुले दुस-या बाजूला यावरुन दिसून येते.

म. जोतिबा फुले यांचा अव्वल इंग्रजी अमदानीतील महाराष्ट्रातील एक कर्ते सुधारक किंबहुा सामाजिक क्रांतीचे अग्रदूत म्हणून त्यांचा गौरवपूर्वक उल्लेख करावा लागेल. म. फुले. समाजकारणात आल्यानंतर महाराष्ट्रातील बहुजन समाज ढवळन निघाला. आणि सामाजिक चळवळीला अगदीच आगळं आणि वेगळं वळण लागलं म. जोतिबा फुले यांच्या अगोदर ख्रिश्चन मिशन-यांनी गोरगरिबांच्या वस्त्यांत मोफत शिक्षण देण्याचं व्रत अंगिकारलेलं होत. ब्राम्हणमंडळीनी ज्या शाळा काढलेल्या होत्या. त्यांत ब्राह्मणेंत्तरांना प्रवेश करण्यास पूर्ण मज्जाव होता. नाही म्हणावयास बहुजन समाजाच्या लोकांपैकी मी मघाशी सांगितल्याप्रमाणे मुंबईस जगन्नाथ शंकरशेठ यांनी एक शाळा काढलेली होती व सातारच्या प्रतापसिंह महाराजांनी साता-यामध्ये मुलींची शाळा काढण्याचा प्रयत्न केला होता. या नंतर बहुजन समाजाला स्त्रियांचा आणि दलितांचा विद्येची गोडी लावण्याचे काम पहिल्यांदा म. जोतिबा फुले यांनी १८४८ साली मुलींची शाळा काढून व १८५२ साली अस्पृश्यांची शाळा काढून केलं मुलींच्या शाळेत शिकवायला शिक्षिका मिळत नव्हत्या. म. जोतिबा फुले यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिले. आणि त्यांना मुलींच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करावयास सांगितले महाराष्ट्रातील पहिली शिक्षिका म्हणून जर कोणाचा उल्लेख करायचा असेल तर तो सावित्रीबाईचाच करावा लागले.