• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

व्याख्यानमाला-१९७६-८

सर्वाभूती एकच परमेश्वर पहाणारे आम्ही असल्यामुळे, एकच चित्तत्त्व, एकच आत्मतत्त्व प्रत्येक प्राणिमात्रामध्ये मनुष्येतर प्राणी सुध्दा – इतकेच नव्हे तर जड सृष्टीमध्येसुध्दा असल्यामुळे, सगळेच समान आहे. सगळेच सारखे आहे. हीच समत्वाची भावना हीदेखील आम्हाला नवीन नाही. बंधुता, समता आणि स्वातंत्र्य या फ्रेंच राज्यक्रांतीतून निर्माण झालेल्या या कल्पना आम्हाला नवीन आहेत असं आपण काही समजण्याचे कारण नाही. आमच्या संस्कृतीतून, आमच्या जीवन प्रवाहातून, आमच्या अध्यात्मिक दृष्टीतून या देशामध्ये त्या यापूर्वीच रुजलेल्या होत्या. मोक्षात त्याचं रूपांतर झालेलं होतं. नंतर त्या जीवनातून सुटल्या होत्या, हा नंतरचा भाग आहे. लोकशाहीची कल्पनाही काही नवीन नव्हती, इथे गणराज्यं होऊन गेली. आपल्या देशाला आपण भारतीय गणराज्य म्हणतो. ही गणराज्याची कल्पनाही आम्हाला नवीन नव्हती. विशेषत: भगवान श्री कृष्णाचा या देशातील जो महान प्रयोग होता तो राजसत्ता नष्ट करून गणसत्ता स्थापण्याचा होता. जरासंधासारख्या एखादया राजसत्तेचा नाश करून यादव गणांची, वृष्णीगणांची स्थापना करण्याचा त्याचा हेतू होता. असं म्हणत म्हणत जर आपण मागं गेलो तर आपल्या लक्षात येतं की जगातल्या राजकीय तत्त्वज्ञानांतून आलेली सगळी नवी विचारसरणी आम्हाला तशी नवीन नव्हती.  असं तेजस्वी तत्त्वज्ञान लाभूनसुध्दा आम्ही मागासलेलो होतो, असं असूनसुध्दा आमच्या स्वातंत्र्याचं अपहरण शतकानुशतकं होत होतं, असं असून सुध्दा आम्ही दारिद्र्यामध्ये पाडलेलो होतो. त्याची कारणमीमांसा शोधायला लागलं की आपल्या असं लक्षात येतं की हे सगळं धन आम्ही ग्रंथांमध्ये गुंडाळून ठेवलेलं होतं. हे सगळं आम्ही देवळाच्या धर्माच्या चार भिंतींमध्ये तेवढ्याच पुरतं मानीत होतो. हे सगळं परलोकाच्या दृष्टीने -  या समोर दिसणा-या सृष्टीच्या पलीकडे असल्यामुळे – त्याचा विचार या जगामध्ये करायची काय गरज आहे? असं म्हणून परलोकामध्ये रमलेलो होतो. आणि त्यांमुळं हे सगळं समर्थ तत्त्वज्ञान जवळ असूनसुध्दा आमच्यामध्ये कितीतरी अंतर्विरोध होते.

आम्ही स्व:त:ला पुरोगामी म्हणत असताना अत्यंत प्रतिगामी होतो. समतेचा उद्घोष करत असतांना विषमतेचा उच्चबिंदू आम्ही गाठला होता. असं जरी असलं तरी ह्या नव्याने आलेल्या कल्पना नवीन नसल्यामुळे या देशामध्ये त्या सहज रुजणे सोपे होते. महात्माजींनी या देशामध्ये जी स्वातंत्र्याची चळवळ उभी केली त्या चळवळीमध्ये या संस्कृतीच्या काही मूलभूत अंगांचा स्पर्श देखील त्यांनी या चळवळीला घडवला होता. हे लक्षात घेण्यासारखं आहे. समाजाच्या परिवर्तनाच्या दृष्टीने विचारवंत, प्रतिभावंत माणसं लोकांमध्ये आधीच असलेल्या, मुळातच सहज रूपात असलेल्या गोष्टींचा वापर करून त्याची पुनर्रचना, त्याचा नवा आकृतिबंध, कसा तयार करतात आणि आपली कार्यसिध्दी कशी करून घेतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे महात्माजींची राजकीय दृष्टी आहे. त्यांनी बुध्दाचं सत्य अहिंसेचं तत्त्वज्ञान राजकारणात आणलं. त्यानी भारतीय संस्कृतीतलं आत्मसाक्षात्काराचं तत्त्वज्ञान आणलं त्याच्या अधिष्ठानावर उभ्या असलेल्या असहकार, सत्याग्रह, समता, अस्पृश्यता निवारण, स्त्री मुक्ती या सगळ्या आधुनिक कल्पना या सांस्कृतिक संचिताशी त्यांनी जोडल्यामुळे इथल्या लोकांना चटदिशी समजल्या. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये महात्माजींच्या मागे लोक सागरासारखे लोटले. दांडीयात्रेंमध्ये जे दृश्य पाहिले. ते अपूर्व होतं, अतूट होतं. जगातल्या इतिहासामध्ये न घडलेलं होतं. शस्त्रसज्ज अशा सरकारपुढे नि:शस्त्र माणसं प्राणाची पर्वा न करता केवळ मिठाची एक मूठ उचलण्यासाठी रामचंद्राच्या सेतूबंधनासाठी वानर सेना गेली त्या वानरसेनेप्रमाणे विशिष्ट निष्ठेने, निर्भयपणे, निर्मल  मनाने, विरक्त बनून जाऊ शकत होती. त्याचे कारण भारतीय राजकारणातल्या स्वातंत्र्याच्या निष्ठेला महात्माजींनी हा आध्यात्मवादाचा स्पर्श दिलेला लोकांना चटदिशी समजलेला होता. लोकांच्या मनामध्ये तशा प्रकारची बैठक पूर्वीच्या संतांनी, विचारवंतांनी निर्माण केलेली होती. ती सुप्तावस्थेत होती. त्याचा बरोबर फायदा आपल्या राष्ट्राला मिळाला. म्हणून मी म्हणतो या मूलकल्पना, समाजाला जिथे आपण घेऊन जाणार त्याची साधनं, लोकशीहीच्या, समाजवादाच्या, संसदीय पध्दतीच्या कल्पना किंवा व्यक्तिस्वातंत्र्याची, व्यक्तिमुक्ततेची, कल्पना या सगळ्या या देशांत नवीन नसल्यामुळे नव्या राजकीय विचारामध्ये लोकांना त्या समजून सांगणे व लोकांनी त्या समजावून घेणे सोपं गेलं. त्यामुळे हा देश अनेक अंतर्गत विरोधाभास असताना सुध्दा जागाच्या आजच्या सगळ्या गुंतागुंतीच्या राजकारणामध्ये सदैव अचल खडा आहे. उभा आहे परंतू हे जरी असलं तरीही अप्रत्यक्षरीत्या घडणारी गोष्ट! एखादं झाड उभं असतं, वठलेलं दिसतं, त्याच्यातलं सत्त्व जर निघून जात असेल, तर ते नुसत उभं आहे म्हणून चालत नाही. उभ्या असलेल्या झाडामधल सत्त्व जर निघून जात असेल, त्यातला प्राण जर निघून चालला असेलं, त्याचा तजेला, त्याचा हिरवेपणा त्याची फलधारणाशक्ती ही जर निघून जाणार असेल तर त्याची तत्क्षणी देखभाल करण्याचे, त्याला खतपाणी पुन्हा घालून संजीवन देण्याचं काम करावं लागतं. म्हणून ज्या गोष्टी मुळात होत्या असं आपणं मानतो त्यामुळे आपलं केवळ अस्तित्त्व सिध्द होईल, त्यामुळे आपलं सामर्थ्य सिध्द होणार नाही. त्याच्या संबंधींचा विचार आपणाला उद्याच्या व्याख्यानात करता येईल.