व्याख्यानमाला१९७३-१२

जातीव्यवस्थेच स्वरूप मुलत:संपूर्ण आर्थिक नाही. ते एक विषमतेचं दुखणं आहे, तो एक सामाजिक रोग आहे. अस्पृश्याचं दु:ख हे सामाजिक आहे. आर्थिक नाही. जर एखाद्या महारवाडयातील माणसाचा पगार ५०० रूपये असला आणि माझे उत्पन्न ५०० असते आणि मी जर खेड्यात गेलो तर आर्थिक दृष्ट्या आम्ही जरी सारखे असलो तरी सामाजिक दृष्ट्या तिथं ताबडतोब फरक केला जातो. माझा जर महार समाजातील मित्र असेल तर त्याला माझ्यासारखी सामाजिक समता नाही. त्याच दुखशं आर्थिक विषमतेचं नाही, तर त्याचं सामाजिक विषमतेतच आहे. दुर्दैवानं या भारतीय समाजवादानं हे जातीव्यवस्थेचं, अस्पुश्यतेचं दु:ख  मूलत: समजावून घेतलेलं नाही. सगळ लक्ष जे आहे ते आर्थिक समस्येवर केंद्रीत केलं आहे. डॉ. आंबेडकर हे संाजवादी मंडळीपासून सतत दूर राहिले. कम्युनिझमपासून दूर, खुद्द मार्क्सवादापासून दूर राहिले. त्यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली ती ही की, मार्क्सने भांडवलशाहीची मीमांसा केली असेल पण भांडवल शाहीची मीमांसा करून भारताचे प्रश्न सुटत नाहीत. इथल्या अस्पृश्यतेची मीमांसा, जातीव्यवस्थेची मीमासा हीही त्याचे बरोबर केली पाहिजे. किंबहुना भारतीय समाजवादासमोर आंबेडकरांच्या मतें ‘ दोन आव्हानं आहेत Capitalism  आणि अस्पृश्यता जातीयव्यवस्था. मार्क्सच्या ग्रंथामध्ये फक्त भांडवलशाहीचे उत्तर दिलं आहे. पण अस्पुश्यतेचं उत्तर दिलेलं नाही. आणि इथं जे जे समाजवादी होते ते पोथीनिष्ठ होते. पुस्तकी होते. सैध्दांतिक होते.  ठोकेळेबाज होते. त्यामुळे त्यांना खेड्यापाड्यातील मांगवाडे दिसले नाहीत खेड्यापाड्यातील जातीयव्यवस्था दिसली नाही. आपल्याकडे सामाजिक- समतेसाठी ज्या चळवळी झाल्या त्याकडेही त्यांनी पाठ फिरवली आणि अशा ज-हेचा जो समाजवाद आहे त्याला या मातीमध्ये मुळेच मिळाली नाहीत. It has roots in the soil. त्यामुळे आंबेडकरांसारख्या माणसाची जी टीका आहे ती मला मूलभूत योग्य वाटते. इतकेच नव्हे तर त्या काळामध्ये त्यांनी सगळ्याच प्रश्नांचे ज्याला इंग्रजीमध्ये Over Simplified  म्हणतो Over Simplification  असे केल आहे. हिंदू मुसलमानांचे दंगे हा देखील आर्थिक प्रश्नांचा आविष्कार आहे असं सांगायला त्यांनी सुरूवात केली. हिंदू-मुसलमानांचे दंगे यांचे स्वरूप मूलत: काही आर्थिक नाही. कोणताही एक भांडवलदार कोठेतरी एक मजूर असा प्रकार नाही. आहे, मार्क्सवाद तो ही सर्व प्रकारची मास्टर की आहे. जगातील सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा हा एक तत्त्वज्ञान्यांचा प्रयत्न आहे. मग भारताची अस्पृश्यता असो, अमेरिकेतला वंशवाद असो वा अमेरिकेमधले वंशवादाचे तत्त्वज्ञान असो, काहीही असो !  पण आंबेडकरांना मूलभूत उणेपणा दिसला. आंबेडकर हे कम्युनिझमपासून व समाजवादापासून दूर राहिले. या समाजवादी मंडळींच्या जवळपास ते कधी गेले नाहीत. कारण त्यानी सांगितलं की या देशातील समाजवाद, या देशातील समाजव्यवस्था, या देशातील दुखणी तुम्हाला समजलीच नाहीत, तुम्ही पोथीनिष्ठ झालात. तुम्ही मार्क्सचे ग्रंथ वाचता आणि प्रत्येक प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करता आहात ही आंबेडकरांची टीका मला अत्यंत योग्य वाटते. यापुढील काळातदेखील भारतीय समाजवादाला  जे आव्हान आहे ते केवळ भांडवलशाहीचे नाही, तर अस्पृश्यता, सामाजिक नीति, जातीयव्यवस्था ही देखील तितकीच बलवत्तर आव्हानं आहेत. या समाजवादानं हे आव्हान स्वीकारले  नाहीतर भारतीय समाजवादामध्ये काहीतरी उणिवा राहिल्या आहेत असे म्हणावं लागेल. ही गोष्ट मला अत्यंत महत्त्वाची वाटते. हे भारतीय समाजवादाच दुसरं वेगळेपण आहे. कारण जातीय व्यवस्था फक्त भारतीय भूमीतच जन्माला आली आहे. अशाप्रकारची जातीयव्यवस्था जगाच्या पाठीवर कोठेही सापडणार नाही. खास भारतीयत्व सशात असेल तर या महारवाड्यामध्ये आहे. आमच्या मांगवाड्यामध्ये आहे. आमच्या बौध्दवाड्यामध्ये आहे. जातीय व्यवस्थेमध्ये आहे . आणि समाजवादाने हेही आव्हान स्वीकारलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट अशी की भारतीय समाजवादावर या देशातल्या गांधीवादाचा फार मोठा प्रभाव पडलेला आहे. ही गांधीवादाची गोष्ट जगातल्या कोणत्याही राष्ट्रात दिसून येणार नाही. भारतीय समाजवादावर फार मोठ्या प्रमाणात गांधीवादाचा पगडा पडला आहे, त्याचं कारण अस आहे की समाजवाद येथे १९३३|३४ च्या सुमारास उद्यास आला. या देशामध्ये समाजवादी पक्ष म्हणून आला तो विचार देखील २/४ वर्षे अगोदर आला. पण ज्यावेळेस समाजवाद येथे जन्मास आला त्या काळामध्ये गांधीवादाचा प्रभाव हा या देशामध्ये शिगेस पोहचला होता असं माझं प्रामाणिक मत आहे. गांधींच्या काही विचाराशी माझे जरूर मतभेद आहेत. गांधीचे सगळेच्या सगळे तत्त्वज्ञान मला मान्य नाही. पण गांधीच्या विचारामधला काही जो भाग आहे, हा इतका मोठा आहे की गांधी मला फार मोठे पुरूष वाटतात. मानवी इतिहासामधले जे २/४ पुरूष मोठे वाटतात त्यामध्ये गांधी आहेत.