ऋणानुबंध (23)

सोनहिरा

सागरोबाचे शिवार हे देव-देवेन्द्राला पडलेले एक स्वप्न आहे, असे मला नेहमी वाटते. स्वत:ला एखादे घरकुल असावे, म्हणून जणू शोधाशोध करीत आलेली देवमंडळी या शिवारात पोचताच कायमचीच स्थिरावली असावीत. आणि या शिवाराचे मग त्यांनी 'देवराष्ट्र' बनवून टाकले.

तसे पाहिले तर पुरा भारत हे एक देवराष्ट्रच आहे, असे वाटते. त्याची घडण तेहतीस कोटी देवांच्या हातांनी झाली असली पाहिजे. खरोखरच हा एक अलौकिक देश ! निसर्ग-चमत्काराच्या अनेक गुहा आणि लक्ष्मीच्या अनेक खाणी असलेली ही भूमी. सिद्धांचा आणि सिद्धांतांचा परिमल येथील द-याखो-यांत अखंड दरवळत राहिलेला आहे. सज्जनांचा जिव्हाळा आणि सरस्वतीचे सौंदर्य या भूमीला जसे लाभले आहे, तसे तिच्या सद्गुणाला चांगुलपणाचे तेज आहे. भव्यत्व आणि दिव्यत्व यांनी इथे परिसीमा गाठली आहे.

सागरोबाचे शिवार हे जणू काही तिचे एक प्रतीकच असावे. अनेकदा हे शिवार मी धुंडाळले आहे, पायदळ केले आहे. ऊन-पावसाच्या आंघोळी येथे मी हरघडी केल्या आहेत.

सातारा जिल्ह्याच्या टोकावरील डोंगराच्या कुशीत वसलेले देवराष्ट्र हे एक लहानसे गाव. गावाचा आसमंत ऐतिहासिक अवशेषांनी भरलेला. इथे लेणी आहेत. देवळे आहेत. गावाच्या नैऋत्येस महादेवाची पुरातन मंदिरे उभी आहेत. सर्वांत जुने देऊळ समुद्रेश्वराचे - महादेवाचे. गाव त्याला 'सागरोबा' म्हणते. गावाचे हे दैवत. डोंगरही सागरोबाचा. आसपासच्या टेकड्यांत ऋषींच्या गुहा आहेत. समुद्रेश्वराच्या शेजारीच त्याच्या नावाचे कुंड आहे - टाके म्हणतात त्याला ! या टाक्यातील पाणी गुणकारी असल्याबद्दलची शेकडो वर्षांची श्रद्धा ! असे म्हणतात, की देवराष्ट्र हे एका राजाचे ठिकाण होते. सातवाहनाच्या राज्यानंतर महाराष्ट्रात जी अनेक लहानमोठी राज्ये आणि राजे उदयाला आले, त्यांतील देवराष्ट्र हे एक राज्य होय. या गावच्या आसपासच्या गुहा हिंगणदेव राजाने बांधल्या, अशी सांगी आहे. या राज्याच्या नावाची निशाणी घेतलेले हिंगणगड हे खेड्याच्या स्वरूपात तिथे आहे.