आशा-निराशेचे क्षण
तशी माझी प्रवृत्ती व प्रकृती आशावादी आहे. स्वभावाने मी संकटकाळी दबून जाणारा नाही. कठीण काळ येतो, तेव्हा सहन करीत वाट पाहावी लागते; आणि ते करण्यासाठी एक प्रकारचा आत्मविश्वास व त्यावर आधारलेला आशावादी दृष्टिकोन असावा लागतो. पण याचा अर्थ असा नाही, की दैनंदिन जीवनात आशा-निराशेचा पाठशिवणीचा खेळ मी अनुभवलेला नाही. मला वाटते, हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात येणारा नित्य अनुभव आहे. प्रासंगिक कारणासाठी का होईना, पण दैनंदिन जीवनात कधी आशावादी, तर कधी निराश व्हावे लागते; परंतु ते किंचित्काळ टिकणारे प्रसंग असतात. परंतु आज जेव्हा मी पाठीमागे वळून पाहतो, तेव्हा आशावादाने विशेष क्रियाशील झालो आणि निराशेने काही काळ का होईना, पण मनात चांगलेच घर केले, ते क्षण नजरेपुढे येतात. त्यांतल्या काही क्षणांची ही नोंद आहे.
माझ्या विद्यार्थिदशेतील एका कौटुंबिक प्रसंगाची आठवण मला नित्य येते. त्या वेळी मी मनाने एकदम थकून गेलो, असे मला वाटले होते. माझी आई आपला गरिबीचा संसार चालवून आमचे शिक्षण करीत होती. आपण काही विशेष कर्तृत्व करून आईला मदत केली पाहिजे, असे माझे बंधू गणपतराव यांच्या मनात वारंवार येत होते. माझे ते बंधू अत्यंत बुद्धिमान व उत्कृष्ट खेळाडू होते. माणसांची पारख करण्यात निष्णात असा त्यांचा लौकिक नंतर माझ्या भागात झाला.
एकदा इंग्रजी पाचवी-सहावीत असताना एका बऱ्यापैकी सुखी घरातील एका स्नेह्याबरोबर त्यांनी एक धाडसी प्रयोग करण्याचे ठरविले. तेव्हाच्या इंदौर संस्थानात शेती भरपूर होती, शेती करणारे कमी होते. शेती करण्यास उत्सुक व साधने जवळ असणाऱ्यांना भरपूर शेती देण्यात येत असे. गणपतराव व त्यांच्या स्नेह्याच्या कानांवर ही गोष्ट आली, तेव्हा त्यांनी इंदौर संस्थानात जाण्याचा विचार सुरू केला. त्यांचे वय तेव्हा सोळा-सतरा वर्षांचे होते. माझे बारा-तेरा वर्षांचे असेल. माझ्या कुटुंबातील सर्वांना त्यांनी ही गोष्ट सांगितली. माझ्या आईला ही गोष्ट आवडली नाही. पण मला मात्र त्यांच्या धाडसी निर्णयाचे कौतुक वाटले. त्या दोघांनी इंदौरकडे जाण्याची तयारी केली. स्नेह्याने आपल्याबरोबर काही साधने व थोडे-फार पैसे घेतले. गणपतरावांबरोबर आम्ही काहीच देऊ शकलो नव्हतो. लागणारे भांडवल किंवा इतर साधने आमच्या कुटुंबापाशी नव्हती. काम करण्याची हौस आणि धाडसी स्वभाव याचेच भांडवल घेऊ न माझे बंधू गेले.
ते गेल्यानंतर महिन्याने त्यांचे पत्र आले. इंदौर सरकारने त्यांना त्यांच्या राज्यातील गरोठ या गावी दीडशे एकर शेती कसण्यासाठी दिली होती. ही बातमी वाचून आम्हा सर्वांना आनंद झाला. आपण आता जमीनदार झालो, अशी खुळी कल्पना माझ्या मनात येऊन गेली. पुढे चार-सहा महिन्यांनंतर गणपतरावांबरोबर गेलेले त्यांचे स्नेही, शेतीसाठी लागणारी अधिक साधने घेऊन येतो, असे गणपतरावांना सांगून गावी परत आले. परंतु परत आल्यानंतर गरोठला पुन्हा जाण्याचा त्यांचा विचार काही दिसेना. त्यांची नाती बड्या खानदानी मंडळींत असल्यामुळे त्यांनी परत जाण्याचा विचार सोडून दिला व लष्करात नोकरी धरली.