ऋणानुबंध (14)

१९४० साली युद्धाची ऐन धुमश्चक्री चालू असताना माझ्यावर पुन्हा एकदा असाच निवड करण्याचा प्रसंग आला. युद्धाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष हळूहळू स्वातंत्र्याच्या रोखाने आक्रमक पवित्रा टाकण्याचा विचार करू लागला होता. रॉयवादी मंडळींनीही ब्रिटिशांच्या विरुद्ध लढ्यात उतरावे, असे मला वाटत होते. काही तरी विधायक कार्य करण्याची ही वेळ आहे, असे आमच्यांतील अनेकांचे मत होते. परंतु रॉयवादी मंडळींकडून लढ्याच्या विचारसरणीला पाठिंबा मिळाला नाही. मी यावर खूप विचार केला. सांप्रदायिकतेने एखाद्या विचाराशी बांधून घेणे हा माझा स्वभाव नाही. ते मला पटत नाही. त्या विचारातून आणि कृतीतून दैनंदिन जीवनाला योग्य ते मार्गदर्शन लाभणार नसेल, तर मी अशा विचारापासून अलग होत गेलो आहे. वैचारिक सिद्धान्तांचा अचूकपणा मी तोच जाणतो, की ज्यातून कार्याचा प्रवाह निर्माण होऊ शकतो. तसे न होईल, तर त्या विचारातच काही तरी चूक असली पाहिजे, असे समजण्यास हरकत नसावी. तशी चूक असेल, तर तो विचार तपासण्याची माझी वृत्ती असते. रॉयवादी विचारसरणी मी त्या संदर्भात तपासली, त्या वेळी प्राप्त परिस्थितीशी जुळते घेण्याची वृत्ती काँग्रेसच्या ध्येयवादात मला अधिकांशाने आढळली. आजसुद्धा नवा विचार स्वीकारून, त्या त्या घटनेचा स्वतंत्र विचाराने निर्णय करण्याची काँग्रेसची वृत्ती आहे. माझ्या वृत्तीशी ती तंतोतंत जुळती आहे. १९४० पासूनची ती वैचारिक बैठक राजकीय प्रवासातील माझी कायमची सोबत झालेली आहे.

मला असे नेहमी वाटते, की माणसाचे जीवन फुलावयाचे असेल, तर त्याला अशी काही तरी सोबतीची सांगड पाहिजे. माझा तरी तो अनुभव आहे. माझ्या आयुष्यात जर काही घडल्याचे दिसत असेल, तर ते माझ्या सोबत्यांनी घडविले, असे माझे प्रांजळ मत आहे. प्रत्येक मनुष्य स्वत:चे जीवन स्वत:च घडवितो, असे मी तरी मानीत नाही. प्रत्येकाने काही तत्त्वे जरूर न्याहाळलेली असतात. पण तेवढाच त्याच्या कर्तृत्वाचा भाग असतो. त्यातून मनुष्य जो घडतो, तो भोवतालचे वातावरण, सामाजिक परिस्थिती आणि काही अंशी योगायोग याचाच तो परिणाम असू शकतो.

जीवनाची मी जी काही वाटचाल केली, त्यात योगायोगाचा काही भाग जरूर आहे. योगायोग याचा अर्थ, तेथे कर्तृत्व निष्प्रभ होते, असा नव्हे. मनुष्य हा स्वयंप्रकाशित आहे, ही अध्यात्माची भाषा खरी असली, तरी व्यवहारात मनुष्याची शक्ती मर्यादित आहे, हा अनुभव येतो. अदृष्टातील अनेकानेक शक्ती मानवी जीवन मागे-पुढे खेचू शकतात, ही वस्तुस्थिती निर्विवाद मानावी लागते. माणसाची इच्छाशक्ती असीम खरी, पण तिची पूर्तता सर्वस्वी मानवाधीन आहेच, असे नव्हे. तसे जर नसते, तर 'योगायोग' या शब्दाचा जन्मच होऊ शकला नसता. मानवमात्राच्या ठिकाणी विचाराची शक्ती मोठी असली, तरी त्याच्याही पलीकडे नियती शिल्लक उरतेच. एखाद्या गोष्टीचे ज्ञान पूर्णांशाने होऊ च शकत नाही, ही नियतीची अबाधित व्यवस्था आहे. नियतीचा हा क्रम बदलण्याची शक्ती अजून उपलब्ध व्हावयाची आहे. जगाच्या अर्ध्यावर अंधार आणि अर्ध्यावर उजेड, हा नियतीचा नियम मानवी जीवनातही आढळतो. संपूर्ण उजेड किंवा संपूर्ण अंधार असे जीवन असूच शकत नाही. माझ्या जीवनातील योगायोग असेच ऊन-पावसाचे आहेत. मी आजही जीवनाकडे वळून पाहतो, त्या वेळी ऊन-पावसाचा खेळ मला मोठा रम्य वाटतो.