यानंतर वैयक्तिक सत्याग्रह आणि 'भारत छोडो' चळवळीचा काळ आला. आयुष्यातील महत्त्वाच्या संधीचा हा काळ आहे, या भावनेने भारावून जाऊन मी कामात उडी घेतली. आशा-निराशावादाचा माझ्या आयुष्यातील हा कालखंड मी फार महत्त्वाचा मानतो. निराशेच्या काळात मनुष्य पुष्कळ वेळा अंतर्मुख होतो. आपल्या उणिवा तपासतो. त्या अर्थाने निराशेचे क्षण हे जीवनाला शक्ती देणारे क्षण असतात, असे मला वाटते. यातूनच कर्तृत्वाची संधी प्राप्त होत असते.
'भारत छोडो' चळवळीच्या काळातील १९४३चा एक दिवस मला आठवतो. त्या दिवशी मी विलक्षण निराश झालो. भूमिगत अवस्थेत काम करीत असताना त्या दिवशी माझा मुक्काम पुण्यात होता. महात्मा गांधींचे आगाखान पॅलेसमध्ये उपोषण चालू होते आणि दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत चाललेली होती. अशा काळातील तो दिवस होता. भूमिगत अवस्थेत मी माझ्या एका मित्राच्या घरी राहत होतो. त्या संध्याकाळी त्या माझ्या मित्राने येऊन बातमी सांगितली, की महात्माजींची प्रकृती फार खालावली असून, आता ते फक्त काही तासांचेच सोबती आहेत. ही बातमी ऐकल्यापासून ती सबंध रात्र मी एक प्रकारच्या, पूर्वी कधीही न अनुभवलेल्या निराशेने खचून काढली. म. गांधींशिवाय स्वातंत्र्यसंग्रामाच्या यशस्वितेची शक्यता वाटत नव्हती.
गांधीजींशिवाय हिंदुस्थान कसा असेल, तेच मनाला उमजत नव्हते. हे एवढे सारे दु:ख होते, परंतु डोळ्यांत पाणी येत नव्हते. सारे अश्रू आटले होते. सगळे व्यर्थ आहे, असे वाटत होते. ती सर्व रात्र मी तशीच जागून काढली.
पहाट होताच मित्राला वर्तमानपत्रे आणायला सांगितली. वर्तमानपत्रांत गांधींची प्रकृती अस्वस्थ आहे, परंतु धोका नाही; आणि सरकार त्यांची सुटका करणार आहे, अशी बातमी आली होती. ते वाचून काहीसे बरे वाटले. माझ्यासारखे असे सहस्रावधी लोक त्या दिवशी अशीच चिंता करीत असतील, अशी जाणीव मला झाली. ही निराशेची रात्र मी कधीही विसरू शकणार नाही.
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची व्यवहार्य शक्यता आहे, या विचाराचा धागा माझ्या हाती १९५७ च्या अखेरी अखेरीस आला. तेव्हापासून तीन-चार वर्षांचा काल हा एक नव्या आशावादाने भरून गेलेला काल आहे. १९५९ साली महाराष्ट्र राज्यनिर्मिती शक्यतेपासून निर्णयाप्रत पोहोचली होती. कृषि-औद्योगिक विकासावर आधारलेली नवी अर्थरचना, महाराष्ट्रातील दलित व पुढारलेल्या समाजांतील मानसिक दुरावा दूर करून, सामाजिक एकतेची नवी वाटचाल व शतकानुशतके एकमेकांपासून वेगळे असलेल्या विभागांना एकात्मतेचा अनुभव हे माझे कार्यक्रम जीव ओतून पुरे करण्याची ही सुवर्णसंधी आहे, या दृष्टीने मी या नव्या राज्याकडे पाहत होतो. ५९-६० साली या नव्या राज्यासंबंधी मी केलेली भाषणे परवा 'सह्याद्रीचे वारे' या माझ्या पुस्तकामध्ये मी चाळून पाहत होतो.