प्रकरण २  - साहित्यविषयक भूमिका
मराठी साहित्यक्षेत्रात यशवंतरावांनी विविधांगी लेखन केले आहे. चरित्रात्मक, आत्मकथनपर, वैचारिक, ललित अशा स्वरुपाचे लेखन केले आहे. या लेखनाबरोबरच त्यांनी समीक्षेच्या क्षेत्रातही मोलाची कामगिरी केली आहे. या साहित्यविषयक विवेचनात त्यांनी वेगवेगळ्या वाङ्मयप्रकाराबद्दल समर्थपणे आपले विचार प्रकट केले आहेत. त्यातून त्यांची साहित्याकडे पाहण्याची भूमिका स्पष्ट होते. रसिक मराठी भाषिक, साहित्यप्रेमी मर्मज्ञ व समतोल भाष्यकार हा वाङ्मयीन प्रगतीचा घटक आहे असे मानणा-या यशवंतरावांनी सतत वाङ्मयाच्या विकासाचा विचार केला आहे. साहित्य आणि समाज याचा त्यांनी विचार मांडला. 'साहित्य हेच मुळी जीवन आहे. साहित्याची अंतिम प्रेरणा मानवी मूल्यांची जाणीव करून देणारी असावी. मानवी मूल्यांचा प्रत्यय हीच वाङ्मयाची कसोटी' असे ते मानतात. हे  यशवंतरावांचे विधान त्यांच्या साहित्य विचाराच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. अशी प्रसंगोपात त्यांनी व्यक्त केलेली मते समीक्षेचे स्वरुप दिग्दर्शित करणारी आहेत.
यशवंतरावांनी साहित्य आणि समाज, साहित्य आणि भाषा, साहित्य आणि अनुभव, इतर मानवी व्यवहार यांचे तारतम्याने आकलन करून विचार मांडले आहेत. यामधून त्यांचे भावस्पर्शी संवेदनशील मन आणि मार्मिक समीक्षा व आस्वादक डोळसपणा पाहावयास मिळतो.
यशवंतरावांचा जीवनवाद
यशवंतरावांचा साहित्यविषयीचा दृष्टिकोन हा पूर्णपणे जीवनवादी होता. १९२० नंतर देशात राजकीय व सामाजिक चळवळीचे नवे वारे वाहू लागले. त्याचाही परिणाम साहित्यावर आणि साहित्य विचारावर झाला. राजकारण, समाजकारण, अर्थकारण या सर्वांचे परिणाम भारतीय लोकजीवनावर होत असताना साहित्यक्षेत्रही त्याला अपवाद नव्हते. कला जीवनवादाचे वाद याच कालखंडात निर्माण झाले. साहित्याच्या रंजनमूल्याची आणि बोधमूल्याची चर्चा यापूर्वीच सुरू झाली होती. पाश्चात्य आणि भारतीय साहित्यशास्त्रातून आलेल्या साहित्यविषयक विचारांची बरीच उलटसुलट चर्चा या काळात झाली. कलावादी साहित्य, पुरोगामी साहित्य, साहित्यातील नवमतवाद, जीवनवाद, नीतीवाद, वास्तववाद अशा अनेक मतमतांतराची चर्चाचर्वणे झाली. अशा या कालखंडात यशवंतरावांच्या जीवनवादाचे स्वरुप पाहणे मोठे उद्बोधक आहे. यशवंतरावांनी लहानपणीच वाचनसंस्कारांनी मन समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. हरिभाऊ आपटे, रा. ग. गडकरी, श्री. कृ. कोल्हटकर यांच्या साहित्याचा सत्यशोधकीय चळवळीचा, मार्क्स, फ्रॉईड आणि गांधी यांच्या विचार प्रणालीचा सूक्ष्मपणे केलेला अभ्यास त्यांच्या जीवनवादी भूमिकेसाठी महत्त्वाचा ठरतो. तत्कालीन पुरोगामी साहित्य चळवळीचा विचारही यशवंतरावांच्या जीवनवादी प्रेरणेसाठी उपयुक्त ठरला असावा. यशवंतरावांचा वाङ्मयीन कालखंड हा विविध मतप्रणालींनी आणि विचारप्रवाहांनी गजबजलेला असल्यामुळे त्यांनी स्वकालीन विचारांचा मागोवा घेत आपला जीवनवादी विचार प्रकट केला आहे ते म्हणतात, "कलेसाठी कला की जीवनासाठी कला' हाही वाद पूर्वी फार गाजलेला आहे. मराठी साहित्यात अजूनही त्याचे पडसाद अधूनमधून उमटत असतात. माझ्यापुरते बोलायचे झाले तर माझा कल जीवनासाठी कला, त्या तत्त्वाकडे झुकलला आहे. केवळ शब्दसाहित्य आणि प्रतिमांचे सौंदर्य हीच चांगल्या साहित्याची कसोटी घेणे होय. असा कलेसाठी कला याचा अर्थ असला तर ही स्वत:ची फसवणूक करून घेणे होय. जीवनवादी भूमिका मांडताना कलावादाला छेद देणारी भूमिका त्यांनी मांडली. समर्पित जीवन हा यशवंतरावांचा आदर्श होता. कला व सौंदर्य ही जीवनाच्या इतर अनुभवावर अवलंबून असणारी मूल्ये आहेत. यशवंतरावांच्या जीवनवादी साहित्यामध्ये मांडलेल्या समाजविषयक वैचारिक भूमिकेचा सहभाव लक्षणीय आहे. त्यांनी जीवनवादी भूमिका समजून उमजून विस्तारपूर्वक मांडली आहे. सामाजिक आशयाच्या बाजूने जीवनवादाचा पुरस्कार करण्यामध्ये यशवंतरावांचा उत्साह उदंड आहे. याचे कारण हे की यशवंतराव हे सामाजिक जीवनात अंग घुसळून घेतलेला नेता, लेखक, समाजाच्या आशा-अपेक्षा, विचार कल्पना, चढ-उतार, भावभावना यांची जाण असलेला समाजधुरीण, असल्याने त्यातून त्यांची जीवनवादी भूमिका विचाराचे रूप मिळवून राहते.

 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
			 
									 
			