यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे-४

थोडक्यात व्यक्तिमत्त्व जेवढे वेगळे, श्रेष्ठ प्रतीचे तेवढे ते वाङ्मयही नवे व प्रयोगशील होत राहते. यशवतराव चव्हाणांच्या साहित्याचे स्वरुपही असेच होते. आशय, विषय, माध्यम, आविष्कार या सर्वच बाबतीत त्यांचे साहित्य अधिक रमणीय, अधिक वाचनीय असे बनले आहे त्यामागे असलेल्या सकस व संपन्न व्यक्तिमत्त्वाचा बाज, त्यामधून सतत जाणवत राहतो. रसिक मनाला नेहमीच लेखकाचे अंतरंग जाणून घेण्याची जिज्ञासा असते. यशवंतरावांसारख्या सजग लेखकाच्या आंतरिक व्यक्तिमत्त्वाचे पडदे हलक्या, हळुवार नाजूकपणाने उलगडून दाखवणे महत्त्वाचे वाटते. त्यांच्या लेखनातील संवेदना काव्यात्मकता, तरलता, भोगलेपण, अनुभवातील चैतन्य इत्यादि गोष्टींमुळे त्यांचे साहित्य, ताजे, टवटवीत व काव्यात्मक वाटते.

साहित्य हा यशवंतरावांचा आत्यंतिक जिव्हाळ्याचा विषय होता. माता, मातृभाषा आणि मानवता यांच्याविषयी त्यांना अतिशय आदर होता. त्यांचे ग्रंथावर प्रेम होते. अनेक साहित्यिक आणि विचारवंत व विविध क्षेत्रांतील मान्यवर त्यांचे मित्र होते. यशवंतरावांचे हे साहित्यप्रेम या मान्यवर लेखकांना माहीत असल्यामुळे अनेक साहित्यिकांनी त्यांना आपले ग्रंथ भेट म्हणून दिले. त्या मौलिक ग्रंथांवर काही टिका-टिप्पणी केली आहे. तर काही निरनिराळ्या ग्रंथांना प्रस्तावना लिहिल्या. हे मूल्यमापन म्हणजे साहित्याच्या आकलन आस्वादनाला, मूल्यमापनाला योग्य ती दिशा, दृष्टी देणारे आहे. हे मूल्यमापन म्हणजे एक प्रकारची साहित्य समीक्षाच आहे. समीक्षा म्हणजे साहित्याचे अंतरंग व बाह्यरंग उलगडून पाहण्याच्या दृष्टीने केलेली एक शोधयात्राच असते. यशवंतरावांच्या अशा जवळ जवळ १७६ प्रस्तावना उपलब्ध आहेत. या प्रस्तावना म्हणजे साहित्यातील आस्वादक समीक्षेचा एक आदर्श नमुना आहे. या प्रस्तावना म्हणजे ग्रंथाच्या आरंभी ग्रंथाच्या विषयाचे केलेले दिग्दर्शन होय. या प्रस्तावनेतून यशवंतरावांची अभिजात साहित्यिक रसिकता प्रकटते. मराठी साहित्य समीक्षेच्या क्षेत्रात या नव्या दृष्टिकोनाची कशी गरज आहे हे स्पष्ट होण्याच्या दृष्टीने यशवंतरावांचे या संबंधीचे लेखन किंवा त्यांचे विचार विषयक लेखन लक्षणीय आहे. विविध विषयांवरील पुस्तकांना त्यांनी आटोपशीर, विस्तृत आणि विचारांचा वारसा देण्याच्या अशा मौलिक प्रस्तावना लिहून दिल्या आहेत. भालचंद्र नेमाडे, ना. धों महानोर, अरुण साधू, लक्ष्मण माने, अनिल अवचट यांच्यासारख्या विविध प्रवृत्तीच्या साहित्यिकांच्या साहित्यप्रवृत्तीवर अभ्यासकास व संशोधकास निश्चितच उपयोग होईल त्याचबरोबर विविध विषयांवरील लेखकासही एक नवीन दृष्टिकोन मिळण्यासाठी त्यांच्या या वाङ्मयीन लेखनाचा अभ्यास होणे महत्त्वाचे आहे.

गोविंदाग्रज हे यशवंतरावांचे आवडते कवी होते. यशवंतरावांनी या गोविंदाग्रजांच्या कवितेचा अभ्यास तर केलाच पण सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी त्यांच्या काव्याचे अनुकरणही केले. कविता ही त्यांना स्फूर्तिसमान होती. त्यांची प्रतिभाशक्ती जागृत होती पण काव्यप्रांतात यशवंतरावांचे फारसे भरीव कार्य दिसत नाही. त्यांच्याकडे सर्जनशीलता होती, काव्यकलाकृती निर्माण करण्याचे सामर्थ्य होते. स्फूर्ती, प्रतिभा व कल्पना याच्या साहाय्यानेच कविमनात काव्यनिर्मितीची प्रकिया सुरू होते.

यशवंतरावांजवळ अशा प्रकारचे सर्जनशील मन असतानासुद्धा काव्यप्रांतामध्ये ते फारसे का रमले नाहीत? हा ही एक चिंतनाचा किंवा अभ्यासाचा विषय आहे.
यशवंतरावांचे साहित्य हे विशिष्ट भूप्रदेशातील मानवाच्या संस्कृतीशी निगडित साहित्य आहे. त्यांनी आपल्या देशातले साहित्य, संस्कृती, रीतीरिवाज यात आपल्या साहित्याच्या प्रेरणा शोधल्या. याच विचारसरणीवर अधिक भर देऊन त्यांनी आपली भूमी, वातावरण, जीवनपद्धती साहित्यात मांडल्या. लोकजीवनात निर्माण झालेल्या लोकसाहित्याच्या परंपरेचा त्यांनी विचार मांडला. एकंदरीत यशवंतरावांच्या साहित्यात भूमीवरचे भान, त्यातील सर्व जाती जमाती, वंशाचे समूह, संप्रदाय, धर्म, परंपरा, स्थलकाळाचे उभे आडवे छेद, या सर्वांसकट येणारे एकजिनसीपणाचे भान दिसते. म्हणून देशवादाचा पुरस्कार करणारे देशी साहित्यिक म्हणून त्यांच्या साहित्याचा विचार होणे महत्त्वाचे आहे.