विरंगुळा - ९५

चिंता करतो...पक्षाची,
सामान्यांची, महाराष्ट्राची

यशवंतरावांनी वेणूबाईंना लिहिलेली पत्रे वाचत असताना एक अग्रगण्य, दूरदर्शी, बहुश्रुत, प्रज्ञावंत मुत्सद्दी या रूपात त्यांचे दर्शन घडते. त्यांचे हे लेखन दीर्घ कालखंडाचे आहे. दूर अंतरावरून पत्नीशी अक्षर-संवाद साधण्यासाठी म्हणून त्यांनी लिहिलेले असले तरी या लेखनाला ललित साहित्याचा सुप्रसिद्ध आकृतिबंध आहे. त्यांनी सारी पृथ्वी प्रदक्षिणा केली. ते जेथे जेथे गेले तेथील विशिष्ट समाजजीवन, तेथील निसर्ग, त्या प्रदेशाचा इतिहास, रंगमंदिरे, वस्तुसंग्रहालये, तेथील राजकारण, अर्थकारण असा सखोल वेध घेतल्याचे या लेखनात आढळते. ऐतिहासिक, धार्मिक स्थळांची दर्शने आवर्जून घेतली. संयुक्त राष्ट्रे या जागतिक संस्थेशी त्यांचे वारंवार संबंध आले. जागातील शेकडो राष्ट्रांच्या प्रतिनिधींसमोर त्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सामंजस्य स्थापन करण्याच्या उदात्त उद्देशाने जे विचार मांडले त्याचाही उल्लेख या पत्रलेखनात आहे. परराष्ट्र दौऱ्यात त्यांनी भारताच्या तटस्थतेचे सूत्र अधिक अर्थपूर्ण रीतीने विशद करीत असताना महत्त्वाच्या व्यक्तींवर प्रभाव पाडणे, त्यांच्या विरोधाची धार कमी करणे, त्यांचे मतपरिवर्तन करण्याकरता ध्येयवादी दृष्टीने झटत राहणे असा सतत प्रयत्न केला. राजकारणाबरोबरच परदेशच्या दौऱ्यात असताना तत्त्वचिंतनालाही धार येत असावी असे सूचित करणारी काही पत्रे आहेत. अशा एका पत्रातून त्यांच्या अंतर्मनात गर्दी करून राहिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा एका निवांत वातावरणात प्रयत्न केला आहे. माँटेगो बे (जमेका) येथून ४ मे १९७५ला त्यांनी लिहिलेल्या पत्रातून अंतर्मनात डोकावून पहाताना मनाची जी अवस्था झाली ती शब्दबद्ध केली आहे. ती अशी –

हॅपीडेज
माँटेगो बे (जमेका)
४ मे १९७५

प्रिय सौ. वेणूबाईस

परवा संध्याकाळपासून या ठिकाणी आहे. आज दुपारी Week end संपवून सर्वजण किंगस्टनला जाऊ.

बऱ्याच वर्षानंतर अशी सुटी मिळाली. जमेकाचे बाहेरील धनिक लोकांनी आपल्या विश्रामासाठी बांधलेली ही सुंदर वसाहत आहे. समुद्र किनारा लागून असलेल्या छोटेखानी टेकड्यांवरील हिरव्यागर्द वृक्षराजींमध्ये इतस्तत: पसरलेले तीसएक बंगले असावेत. एका पेक्षा एक उत्तम, सुरेख रंगीबेरंगी फुलांनी वेढलेला झाडोरा आपला सोबती. एकमेकांपासून अलग पण म्हटल तर शेजार आहे. खाण्यापिण्याची व्यवस्था उत्तम. आम्ही पिणारे नाही हे पाहून आमच्यासाठी व्यवस्था ठेवण्यासाठी येथे हजर असणाऱ्या लोकांची फारच निराशा झाली.

मी काल येथील स्वीमींगपूलमध्ये फार वर्षांनी पोहून घेतले. येथून १२ मैलावर असलेले मॉटेंगो बे या शहरात फेरफटका मारला. सर्व दुपार चक्क झोपून काढली.