विरंगुळा - ९३

कौलालंपूर (हिल्टन)
२६ एप्रिल १९७४

ए. डी. सी. च्या वार्षिक सभेचा अध्यक्ष म्हणून (चेअरमन) मी आलो असल्यामुळे स्वागत वगैरे समारंभपूर्वक झाले. त्यातून मुक्त होऊन चारच्या सुमारास हिल्टनमधे पोहोचलो.

कौलालंपूर हे पाच लाख वस्तीचे शहर आहे. ब्रिटीश राजवटीची सर्व छाप, इमारतींचे बांधकाम, रस्त्यांची बांधणी आणि इतर शिल्प यावरूनच चटकन ध्यानात येते. गेल्या दहा-वीस वर्षात काही बदल झाले असणारच. परंतु गेल्या दोन-तीन वर्षात नवी हॉटेल्स मात्र बरीच झाली आहेत. आजकाल शहरांचे मोठेपण आधुनिक हॉटेल्सच्या उंच हवेल्यांवरून मापण्याची प्रथाच पडलेली दिसते.

आम्ही ज्या हॉटेलमध्ये (हिल्टन) उतरलो आहोत ते गेल्या चार महिन्याखालीच तयार झाले. सर्वात मोठे व अत्यंत आधुनिक असे ते मानले जाते. बहुतेक सर्व देशांची प्रतिनिधी मंडळी येथेच
उतरली आहेत. आम्ही सर्वजण २४व्या मजल्यावर आहोत.

माझ्या खोलीतून शहराचे फार सुरेख दृश्य दिसते. अगदी पुण्यासारखे दिसते. डोंगराच्या उतारापर्यंत शहर पसरले आहे. घरांची शेवटची रांग बहुधा लहान टेकड्यांच्या कुशीत, वृक्षराजांनी झाकलेली दिसते. हॉटेलपासून जवळच विस्तृत असे 'रेसकोर्स' आहे.

उत्तम ठेवलेली, काहीशी चक्राकार, घोड्यांची धावपट्टी आणि त्याच्या दोन्ही बाजूला सुरेख राखलेली आणि मर्यादशीर पसरलेली गवत जमीन (लॉन) मन मोहून घेते. वेळ मिळाला की, या रेसकोर्सकडे पहात गरम चहा घेत बसणे हा येथील माझा आवडता छंदच झाला आहे.

कोण जाणे, हे रेसकोर्स मी पाहिले की मला पुण्याची आठवण येते. या रेसकोर्स भोवती जुन्या ब्रिटीश राजवटीत बांधलेले, वसाहती रस्त्यांना शोभणारे शैलीदार बंगले आहेत. त्यामुळे 'क्वीन्स गार्डन, पूना'ची याद मन भरून टाकते. पाठोपाठ रेसकोर्स रोड दिल्लीचा ताजाताजा सहवास मन उल्हसित करतो.
सकाळी लवकरच जाग आली. झुंजुमुंजु झाले होते. पंचवीस तीस उमदी घोडी रपेटीसाठी किंवा सरावासाठी मैदानावर होती. काही आली होती, किंवा येत होती. पावसाची रिमझिम चालू होती. हे सर्व पाहिले नि डोळ्यासमोर उभी राहिली ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यातील पुण्यातील एक पावसाळी सकाळ. आठवणींनी मनात गर्दी केली.

कितीतरी आठवणी - सुखदु:खाच्या! आशा निराशेच्या! नव्या भेटलेल्या आणि जुन्या जिव्हाळ्याच्या हरवलेल्या माणसांच्या!

मनात कसली तरी हुरहुर असावी आणि ती शोधून हुडकून काढावी म्हटले तरी सापडत नसे - हुरहुर कुठतरी हरवून गेली होती. आज अचानक हलकेच ती परत आली. आठवतात का तुला, पंधरा नंबर, सतरा नंबर, अकरा नंबर - क्वीन्स गार्डनमधले दिवस?