Yashwantrao Rastriya Vyaktimatva
यशवंतराव राष्ट्रीय

व्यक्तिमत्त्व

संपादक : भा. कृ. केळकर
--------------------------------

pdf inmg Ebook साठी येथे क्लिक करा 

प्रास्ताविक

महाराष्ट्राच्या जडणघडणीचे एक शिल्पकार, कर्तव्यदक्ष प्रशासक, चतुर राजकारणी, साहित्याचे सहृदय रसिक, संवेदनक्षम माणुसप्रेमी, एक निरलस ज्ञानपिपासू आणि कुटुंब-जनातील सुखदुःखात सहवेदनेने रंगणारा, अशा विविध पैलूंत कै. यशवंतराव चव्हाण यांचे व्यक्तिमत्त्व नटले आहे.  संपन्न झाले आहे.

महाराष्ट्राने, खरे म्हणजे जे अनेक महापुरुष निर्माण केले आहेत त्यांपैकी यशवंतराव हे निश्चितच एक होते.  मराठी भाषिक राज्याचे पहिले मुख्यमंत्री, राष्ट्राच्या कठीण प्रसंगी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हाकेला ओ देणारे संरक्षणमंत्री आणि विशाल दृष्टी असेला एक धुरंधर महापुरुष या विविध भूमिकांमुळे यशवंतरावजींचे नाव यावच्चंद्र-दिवाकरौ दुमदुमत राहणार आहे.  मराठी भाषिक राज्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षातच, किंबहुना थोडे अगोदरच त्यांना काळाने ओढून न्यावे हे महाराष्ट्राचे दुर्दैव होय.

प्रत्येक महापुरुषाचे कार्य हे देशातील आणि पुढील पिढीकरता न फिटणारे ॠण असते.  तरीपण नदीतील पाणी घेऊन आपण नदीतच अर्ध्य सोडत असतो.  श्री. यशवंतरावजी यांचा स्मृतिग्रंथही हा अशाच प्रकारचा.

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे यशवंतरावजी हे जनक.  त्यांच्या स्मृतिग्रंथाच्या रूपाने त्यांच्या स्मृतीस अर्ध्य देणे साहित्य संस्कृती मंडळाची, त्यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेची केवळ एक छोटीशी जाणीव.  श्री. भा. कृ. केळकर यांनी या ग्रंथाचे संपादन करण्याचे मान्य करून आमच्या आणि त्यांच्या कल्पनेला साकार केले याबद्दल मंडळ त्यांचे आभारी आहे.

श्री. वसंत साठे, श्री. रामभाऊ जोशी, श्री. राम खांडेकर, श्री. ना. बा. लेले, श्री. रवींद्र कुलकर्णी आदींनी या योजनेला सक्रिय साहाय्य केले.  त्याबद्दल त्यांचे आभार.  

यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतिग्रंथ काढावा असे जरी आमच्या मनात असले तरी त्यातील संपादनाची योजना ही श्री. भा.कृ.केळकर यांची.  ती त्यांनी (१) चरित्र व संपन्न व्यक्तिमत्त्व (२) यशवंतरावांचा राजकीय प्रवास (३) मंत्रालयातील वर्षे (४) रसिक व सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व (५) ए रेअर नॅशनल लीडर आणि (६) कौटुंबिक जीवन आणि शेवटचा प्रवास या सहा विभागांत सिद्ध केले आहे.  अशी ही महात्त्वाकांक्षी योजना सिद्धीस नेण्याकरिता यशवंतरावजींच्या निकट सहवासात असलेल्या लोकांनी लेखन करण्याची आवश्यकता होती.  आठवणी सांगावयास हव्या होत्या.

सर्वश्री वसंतदादा पाटील, वसंत साठे, अटलबिहारी वाजपेयी, एस.एम.जोशी, मधु लिमये, मोहन धारिया, एल.पी.सिंग, शरद पवार आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी तसेच, जनरल कुमार मंगलम, ऍडमिरल भास्करराव सोमण, ले.ज.शंकरराव थोरात व शंतनुराव किर्लोस्कर, श्री. राम प्रधान, डी.डी.साठे, राम खांडेकर आणि कृ.पां. मेढेकर त्याचप्रमाणे पां.वा.गाडगीळ, द्वा.भ.कर्णिक, ना.बा. लेले, नारायण पुराणिक, गंगाधर इंदुरकर, एस.एम.केळकर, रामभाऊ जोशी आणि डॉ. सरोजिनी बाबर, रणजित देसाई, शिवाजी सावंत, भा.द.खेर, मो.ग.तपस्वी, आनंद यादव, ग.नी. जोगळेकर, स.शि.भावे व ना. धों. महानोर.  तसेच, पं. भीमसेन जोशी, सुधीर फडके, सुलोचना, शामराव पवार, शंकरराव साळवी आणि भा.क़ृ. केळकर, टी.व्ही. उन्हीकृष्णन, पी.व्ही.आर.राव अशा अनेकांनी लेख, आठवणी आदी साहित्य उपलब्ध करून दिले याबद्दल सर्वांचे आभार.

कै. यशवंतरावजी यांच्याशी त्यांच्या शेवटच्या दिवसांत माझा बराच जवळचा आणि जिव्हाळ्याचा संबंध आला.  त्यातून माझ्या मनात त्यांच्याबद्दल निस्सीम श्रद्धा उत्पन्न झाली.  त्यांच्या निधनामुळे व्यक्तिशः माझी फार मोठी हानी झाली आहे.  याही दृष्टीने यशवंतरावजींवरील स्मृतिग्रंथ माझ्या अध्यक्षीय कारकीर्दीत प्रसिद्ध व्हावा हे पण माझे त्यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेचे गमक समजतो.

हा ग्रंथ विक्रमी वेळात मुद्रित करून दिल्याबद्दल कल्पना मुद्रणालयाचे मालक श्री. चिं. स. लाटकर आणि कामगार यांचे मनःपूर्वक आभार.

सुरेंद्र बारलिंगे
अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ