यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ३०-३१०२०१२-२

लक्ष्मण, मराठी भाषेतला एक वेगळा बाज आपण पाहिला.  माझे खूप मित्र अभिजनवर्गातले आहेत.  त्यांच्याशीही मी असा तासनतास बोललोय.  गप्पा मारल्यात.  पण खरे सांगू, आजचे जेवण भलरी म्हणताना मारलेले बरबाटाचे झुरके जसे असते तसे वाटले.  सर्व जातीधर्मातले लोक जेव्हा लिहू लागतील ना तेव्हाच मराठी समृद्ध होईल.  'उपरा'तल्या कितीतरी शब्दांबद्दल लोक मला विचारतात.  मी त्यांना सहज अर्थ सांगू शकतो.  सातारी बोलीभाषा हे 'उपरा'चे खास वेगळेपण आहे.

साहेबांचा ताईंचा निरोप घेऊन आम्ही निघालो.  सायंकाळी आम्ही मुंबईला परतणार होतो.  तेथून सातारला.  दुसर्‍या दिवशी मुंबईत पोहचलो.  दया त्याच्या घरी गेला.  मी माझ्या मित्राच्या घरी जाऊन झोपलो होतो.  न्यू यॉर्क, दिल्ली, मुंबई असा प्रवास झाल्याने झोपेचे थोडे वेळापत्रक बिघडले होते.  त्यात बापजन्मात विमानाने प्रवास केला नव्हता.  तो वेगळा आनंद तर होता पण झोपेचे तंत्र बिघडले होते.  दुपारचे बारा वाजले होते.  रेणकेंच्या चुनाभट्टीतल्या घरात मी झोपलो होतो.  त्याने मला उठवले.  मी झोपतच होतो.  त्याने सांगितले, अरे ऊठ, लोक तुला शोधत असतील.  'उपरा'ला साहित्य अकादमी मिळाली आहे.  मी त्याला म्हणालो झोपू देना रे, तुला चेष्टा करायला हीच वेळ आहे का ?  त्याने अंगावरले पांघरूण ओढले नि हातात दिला महाराष्ट्र टाइम्स.  'उपरा'ला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला होता.  मला खरेच वाटत नव्हते.  साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यावेळी सत्तर वर्षांच्या पुढे मिळत असे.  माझ्यासारख्या नवख्या लेखकाला कसा मिळेल ?  त्यात माझे हे पहिलेच आपत्य.  मला खूप आश्चर्य वाटले होते.  मी उठलो, क्षणभर वि.स.खांडेकर भाऊंची आठवण झाली.  त्यांना किती आनंद झाला असता.  मी माझ्यावरली जबाबदारी वाढल्याचे लक्षात आल्यावर फार काळजीत पडलो.  तोपर्यंत मी तंबाखू खात असे.  वयाच्या बत्तीसाव्या वर्षी मला साहित्य अकादमी आणि तीही पहिल्या पुस्तकाला मिळाली.  हा राष्ट्रीय विक्रमच होता.  उशाशी तंबाखूची पुडी नि चुन्याची डबी पडली होती.  ती उचलली आणि रेणकेंच्या घराच्या खिडकीतून बाहेर फेकून दिली.  अनेक वर्षांची ती सोबतीन.  कळायला लागले तेव्हापासून गाढवामागे जाताना ती खायला लागलो.  म्हणजे जवळपास वीसपंचवीस वर्षं तंबाखू खाल्ली.  तिचा शेवट केला.  त्यानंतर तंबाखूच काय कोणतेही व्यसन नव्हते.  मनातून खूप आनंद झाला होता.  आता दोन वेळ जेवण या पलिकडे आपल्याला कोणत्याही वायफट गरजा नव्हत्या, ज्यांची शरम वाटावी.  काल दिल्लीत होतो पण माहिती नव्हते, आज माहिती झाले.  उरकले नि तसाच सातारला पळालो.  साहित्य अकादमीने मी लेखक म्हणूनही उत्तम सेवा केल्याचे शिक्कामोर्तब केले.  खूपखूप आनंद झाला.  चव्हाणसाहेबांची भेट झाल्यावर त्यांनी सांगितले. वेणूताई त्यादिवशी दिवसभर येणार्‍याजाणार्‍या सर्वांना पेढे वाटत होत्या.  साहेबांना सारखे सांगत होत्या.  फलटणने तुम्हाला अनेकदा त्रासच दिला आहे.  पण माझ्या भावाच्या शाळेत शिकलेल्या एका गरीब समाजातल्या पोराने साहित्य अकादमी मिळवली.  अमेरिकेला जाऊन आला.  तुम्हालाही आनंद दिला.  त्यांना माझा खूप जिव्हाळा.  साहेबांचे प्रेम मिळणे ही माझ्यासाठी मोठी शिदोरी होती.

सुप्रिया, साहेब म्हणजे एक परीस होता, त्यांच्या स्पर्शाने कोणत्याही लोखंडाचे सोने होई.  तुझ्या बाबांसारखे कितीतरी लोक साहेबांनी जवळ केले.  त्यांच्यावर पुत्रवत प्रेम केले.  म्हणूनच त्यांना विसरणे अशक्यच.

ती. सौ. वहिनींना, बाबांना सप्रेम जयभीम.

तुझा,
लक्ष्मणकाका