यशवंतराव चव्हाण (17)

असं छान चाललेलं दु:खातून सुखाकडे. नव्या बहराकडे. माझा भाऊ नारायण नवीन मोसंबीची रोपं घेऊन नव्यानं नवीन शेतात बाग करायचा म्हणून घेऊन आला. पुन्हा दहा एकर मोसंबी झाडं लावायचं ठरलं होतं. जुनी बाग जळाल्याचं दु:ख विसरून जायचं होतं. पहिल्या दुस-या दिवशी पाचशे-सहाशे मोसंबीची रोपं लावून झाली. रात्री बाबांनी बांधलेल्या मोसंबीच्या रोपांच्या गढ्यावर तांब्याभर पाणी टाकलं. मला बोलविलं. मी रात्री एक वाजता खडबडून उठलो. त्यांच्याजवळ गेलो. बाबांनी रूमालानं घाम पुसला. मला त्यांच्या खाटीवर बसवलं व माझ्या खांद्यावर हात टाकला व म्हणाले, ‘सगळ्यांना नीट सांभाळ. श्रीराम!’ एवढंच.

दुखलं नाही. आजारपण नाही. बाबा आमच्यातून गेले. सगळी देव-दैवतं, भजन-कीर्तन त्यांना आवडणारं सगळं केलं. त्यांनी शब्द टाकला म्हणून तीर्थयात्रेला त्यांना पाठविलं. २० जुलै १९७७ ला आम्ही एकाएकी पोरके झालो. पुन्हा दु:ख, कुठेच कोणी ख-या अर्थानं जवळ नव्हतं. फार असा कुणाचा आधार नव्हता. शेतीतल्या प्रश्नांची, नष्ट झालेल्या विहिरींची, नव्या कर्जाची गुंतागुंत अवघड होती. त्यापेक्षाही काही घरगुती, कौटुंबिक अडचणी होत्या. अडाणीपण होतं. तो संसाराचा गुंता फक्त बाबांच्या कठोर शिस्तीं व धाकानं सुटणारा होता. फक्त आता दूर कुठे तरी यशवंतरावांच्या दिव्याची मंद वात होती. तेवढीच मला प्रकाशाकडे नेणारी आहे अशी आशा वाटायची. पण ती फार फार दूर होती. काहीच सुचत नव्हतं.

थोरल्या आईला मी एकटा मुलगा व एक मुलगी व धाकट्या आईची चार मुलं, दोन मुली. सगळी माझ्यापेक्षा लहान. एक बहीण व दोघं भाऊ लग्नाचे राहिलेले. फारच प्रतिकूल परिस्थितीत बाबांनी थोडी शेती, घरदार-संसार उभा केलेला. मी कॉलेज सोडून अठराव्या वर्षी शेतीत आलो. धाकट्या भावंडांची शिक्षणं, विवाह असा व्याप सांभाळला. शेती माझ्यापरीनं सांभळली. सगळं कुंटुंब गरिबीत पण एकत्र सुखानं नांदत राहिलं. सगळ्यांचं एकमेकांवर खूप प्रेम, श्रद्धा व विश्वास. प्रपंचातले प्रश्न खूप त्रासदायक झाले; तरीही सगळ्यांना सांभाळून मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो. कुणाला कधी दुखावलं नाही. अंतर वाटावं असं कधी वागलो नाही. पळसखेड हे माझं लहान गाव. एक हजार-दीड हजार लोकवस्तीचं. पण माणसं फार उपद्व्यापी. त्रास देणारी. अकारणी काहीही संबंध नसताना माझ्यासारख्या काही नवीन करू पाहणा-याला त्यांना खूप त्रास त्या काळात दिला. त्यांची मानसिक वाढच झालेली नाही असं मला वाटायचं. १९६७ – ६८ हे केशवसुत जन्मशताब्दीचं वर्ष. मला त्या वर्षांचं महाराष्ट्र राज्याचं खूप मोलाचं केशवसुत पारितोषिक मिळालेलं होतं. ‘रानातल्या कवितां’ चं फार मोठं स्वागत महाराष्ट्रभर झालं. माझ्या गावातल्या पुढा-यांनी माझ्याविरूद्ध सभा घेऊन हे किती सामान्य आहे, शासनाचं कसं चुकलं, त्यांना कविता कशी कळत नाही, तुकाराम – ज्ञानेश्वरा-सारखं लिहिलं पाहिजे इत्यादी भाषणं करून हे पारितोषिक रद्द करावं असं निषेधाचं भाषा इत्यादी करून पारितोषिक स्वीकारायाच्य वेळेपर्यंत वाद आणला व स्वत:चं अडाणीपण सिद्ध करीत राहिले. तिथे काय बोलवं? शेतीत नवे प्रयोग केले. उभारणी केली. पाण्याची पाईपलाईन तोडून टाक, केळीचे घड कापून ओसाड विहिरीत फेकून दे अशा घटना फक्त मानसिक ताप देण्यासाठी व मला नेस्तनाबूत करण्यासाठी चाललेल्या होत्या. या सगळ्या आधीच्या व काही आतल्या बारीक गोष्टी इच्छा नसूनही मी एक-दोनदा यशवंतरावांजवळ बोललो होतो. संकोच ठेवला नव्हता. मला शेती व आर्थिक स्थिती सांभाळण्यापेक्षाही कुटुंबातली लहान-थोर माणसं, त्यांच्या भावना व प्रश्न सांभाळणं जास्त महत्त्वाचं वाटलं. जबाबदारीनं मी आजवर ते नीट सांभाळलं. सगळं कुटुंब सुखात आहे. याचं प्रमुख कारण यशवंतरावच. ते २० ऑगस्ट १९७७ रोजी बाबांच्या मृत्यूनंतर आमचं दु:ख हलकं करायला पळसखेडला आले. दिवसभर थांबले. त्यांनी त्या वेळी सांगितलेलं आम्ही सगळ्या कुटुंबातल्या माणसांनी पाळलं. त्यांचा धाक बाळगला.