यशवंतराव चव्हाण (16)

७ जूनला तीर्थयात्रा संपवून आई-बाबा घरी पळसखेडला आले, तेव्हा गावाच्या वेशीवर मंदिराजवळ आम्ही सगळ्या पाचही भावंडांनी व आख्ख्या गावानं त्यांचं खूप मोठं स्वागत केलं. माझे वडील कठोर शिस्तीतले, तापट; पण तेवढेच कोमल हृदयाचे. मऊ अंत:करणाचे. मंदिराजवळ मी त्यांना नमस्कार केला. तेव्हा त्यांनी मला कडकडून मिठी मारली व न राहवून ते मोठ्यांदा रडू लागले. काही बोलू लागले व ‘नामदेव, मी तुला ओळखलं नाही. तू जे काय लिहितो-वाचतो त्याला अडथळे आणले. तो तुझा चव्हाणसाहेब देवापेक्षाही देव भेटला. या आजच्या खूप लाखाड झालेल्या दुनियेत कोण कोणाला विचारतो? त्यानं आमचं फार काही केलं. तू माझा मुलगा, पण त्यांनी तुझी खरीखुरी ओळख करून दिली. मी यापुढे तुला कधीच कवितेसाठी, पुस्तकांच्यासाठी अडविणार नाही. मी सांगतो म्हणून तू दिल्लीला त्यांच्या घरी जाऊन ये. मी शेतीचं सगळं पाहून घेईन. त्यांनी कितीदा तरी बोलविलं पण तू कधीच दिल्लीला जात नाहीस अशी तक्रार त्यांनी केली. इतक्या आत्मीयतेनं आज कोण बोलवितं? तू जाऊन ये.’ ओतप्रोत भरभरून बाबा बोलत होते. डोळ्यांत अश्रू होते. नंतर बाबा, आई सतत भेटणा-यांना तीर्थयात्रेच्या महितीबरोबर यशवंतरावांच्या दिल्लीतल्या भेटीचं सांगायचे. आमच्या घरी शेतीवर यशवंतराव यायचं म्हणताहेत, ते येतील असं सांगायचे. आपण परिस्थितीनं फार गरीब, पण ते आले तर गावाची दिवाळी साजरी करू. केवढा माणूस. खूप साधा. मनानं आभाळाएवढा. माझ्या खेड्यात, आजूबाजूच्या खेड्यांत अशी माहिती तालुकाभर गेल्यावर हे सगळं खोटं, मूर्खपणाचं आहे, थापा आहेत असंच बहुसंख्य लोक म्हणायचे. त्यांचं आम्हांला कधीच काही वाईट वाटलं नाही. बाबा, दोघी आई, भावंडं व आमचं कुटुंब खूष होतं. नव्या आनंदात दु:ख विसरून बडून गेलेलं होतं.

दरवर्षी संत मुक्ताईची पालखी पैठणला जाताना माझ्याकडे मुक्कामाला असते. त्या मुक्ताईचा हा प्रसाद आहे, कृपा आहे, अशी बाबांची दृढ भावना होती. आता एकादशी व द्वादशी असे दोन दिवसांचे मुक्काम भजन-कीर्तन-प्रवचन माझ्या घरी बांधले गेले. टाळ-मृदुंगाच्या गजरात नामसंकीर्तन व सेवा करण्याचं व्रत बाबांनी अधिक उत्साहात अंगीकारलं.

बाबा तीर्थयात्रेला गेल्यावर शेतावरच्या सगळ्या विहिरींचं पाणी खूप कमी झालेलं होतं. केळीचे बाग सुकून गेले होते. केळी अर्धीअधिक तरी हाती यावी म्हणून आम्ही सगळ्या भावंडांनी रात्रंदिवस विहिरीत खोदकाम सुरू ठेवलेलं होतं. सपाटून खोदकाम, बॅस्टिंग बोअर करणं असं विहिरींवर युद्धपातळीवर चाललेलं होतं. एप्रिल-मेमधील उन्हाची धग, प्रचंड तीव्र उन्हाळा, त्य होरपळीनं बाग व फळझाड सुकून जाणं, थोडा पैसा होता तोही नष्ट होणं, खाजगी बँकेचं कर्ज शोधत फिरणं ह्या सगळ्या गोष्टींमुळे दोन महिन्यांत आम्ही अक्षरश: हतबल झालेलो होतो. कोलमडून गेलोहोतो. झोपच लागेना.

कोरडवाहू शेतीची पुन्हा खूप मशागत केली. पाऊस वेळेवर चांगला झाला. पेरणी चांगली उतरली. पुन्हा नवीन अंकुर फुटू लागले. हिरव्या पिकांनी आमच्या आशा पल्लवित होऊ लागल्या. आम्ही यशवंरावांच्या संबंधांमुळे आणखी अविश्रांत परिश्रमाला लागलो. शेती माऊलीवर विश्वास ठेवला. उन्हाळ्यातलं हे आमचं मोडून टाकणारं दु:ख व पिरिस्थिती फारशी बाबांना कळू दिली नाही. त्यांच्यापासून काही गोष्टी चोरून ठेवल्या. लहान भावांचे तळहात विहिरींमधले लोखंडी पाईप ओढून दगडधोंडे काढून सोलून गेले होते. रक्तबंबाळ झालेले होते. विहीर खोदणा-या एका मजुराचा पाय तुटून खांड पडलं होतं. कसातरी तो आमच्या प्रयत्नानं वाचला. आम्ही फार काही न सांगता मुकाट बसलो पुन्हा मृग नक्षत्रानंतर बाबा घरी आल्यावर नवं पर्व सुरू केलं. खूप जिद्दीनं पिकांची आखणी केली. महिन्या-दीड महिन्यात आयुष्यात कधी नाही इतकं सुंदर, समृद्ध पिकातलं शेत मी पाहत होतो. दु:ख विसरत होतो. यशवंतरावांनी बाबांना गुरूमंत्र दिलेला होता. आता मी मनापासून हिरवंगार शेत व हिरव्या बोलीच्या कवितेत गुरफटून गेलो होतो.

यशवंतरावांनी सांगितल्यानंतर बाबांनी स्वत: मला लेखन वाचनासाठी व त्यासाठी फिरण्याला मोकळीक देऊ केली हे माझ्यासाठी चांगलं झालं. पण परिस्थितीनं, व्यवहारानं मला ते शक्य नव्हतं. आता जबाबदारी म्हणून ते बरोबर वाटत नव्हतं. पुन्हा श्रीमती लता मंगेशकरांचं पत्र घरी आलेलं होतं. ‘जैत रे जैत’ च्या गाण्यांसाठी श्रीमती भारती मंगेशकरांनी सविस्तर दोन पेजिस् पत्र लिहून मला पुन्हा पुन्हा मुंबईला यायचा आग्रह धरला होता. बाबा म्हणाले, ‘मी म्हणतो म्हणून या कामासाठी ताबडतोब जा.’ मी मुंबईला त्यांच्या सांगण्यावरून ताबडतोब गेला व ‘जैत रे जैत’ साठी सोळा गाणी लिहून देऊन घरी आलो. आश्चर्य म्हणजे बाबा एकदा मला म्हणाले, ‘तू कविता लिहितोस. मला त्यातलं काही समजत नाही. समजलं नाही तरी चालेल, तुझी कविता मला एकदा सांग.’ मी सांगितलं, ‘यशवंतराव आपल्याकडे निश्चित येणार आहेत ना? त्यांच्याजवळ तुम्ही आपल्या शेतात बसा, तेव्हा मी खूप कविता तुम्हाला ऐकवीन.’