शैलीकार यशवंतराव ४

एखाद्या ग्रंथावर लिहावे तसे त्यांनी अनेक व्यक्तींवर लिहिले.  यशवंतरावांचा शब्दप्रपंच अतिशय नेटका होता.  गुणग्राहकता, गुणगौरव करण्याची वृत्ती त्यांच्या अंगी भिणलेली होती.  त्यांच्या शब्दाशब्दातून परिमळ सतत दरवळला.  त्या शब्दांना अविट गोडी प्राप्‍त झाली होती.  'हा रस अद्भूत निरूपम' या शब्दांत त्याचे वर्णन करावे लागले.  राजकारणात आयुष्य घालवूनही त्यांनी रसभंग कधी केला नाही.  'गुण गाईन आवडी' या पद्धतीने साहित्यिकांचा गौरव त्यांनी केला.  अनेक साहित्यिकांशी त्यांचा ॠणानुबंध होता.  त्यांच्या साहित्याचा त्यांनी चोखंदळपणे आस्वाद घेतला होता.  अनेक साहित्यिकांशी त्यांची मैत्री होती.  त्यांच्या मित्रपरिवारात सर्वच क्षेत्रातील कर्तबगार व्यक्ती होत्या.  कृष्णा-कोयनेच्या काठावर ते वाढले.  या दोन्ही नद्यांच्या पाण्याने त्यांना काही छंद लावले व काही श्रद्धा दिल्या.  ते सर्व 'ॠणानुबंध' मध्ये व्यक्त झाले आहे.  त्यांनी आपला अनुभव लालित्यपूर्ण शब्दांत व्यक्त केला आहे.  त्यांच्यात लपलेल्या भावविश्वाने ललित रूप धारण केले.  

आपण साहित्यिक आहोत असा दावा त्यांनी उभ्या आयुष्यात कधी केला नाही.  एका साक्षेपी रसिक वाचकाशी भूमिका त्यांनी घेतली.  ते जे काही बोलले आणि त्यांनी जे काही लिहिले ते उत्तम दर्जाचे साहित्यच आहे.  ते विचारप्रधान आहे आणि भावनाप्रधानही आहे.  त्यांनी केलेले प्रत्येक भाषण आणि त्यांनी लिहिलेला प्रत्येक लेख म्हणजे शब्दशिल्पच !  ते सर्व वाचल्यानंतर वेरूळ-अजिंठ्याच्या लेणी पाहिल्याचा आनंद वाचकाला होतो.  ज्या शब्दांतून असा निखळ आनंद मिळतो त्यालाच तार अभिजात साहित्य आपण मानतो.

शब्दातून चित्र उभा करणे ही गोष्ट सोपी नाही.  यशवंतरावांना ती साध्य झाली होती.  त्यांना नक्षत्राचे देणे लाभले होते.  'कुलसुमदादी' हे एकच उदाहरण पुरेसे आहे.  काळाच्या पडद्यावर रेखाटलेले ते एक म्यूरलच आहे.  कुलसुमदादी ही सगळ्यांची दादी होती.  तिच्या प्रेमात यशवंतराव न्हाऊन निघाले होते.  या दादीला यशवंतरावांच्या रूपाने दीदार भेटला.  

यशवंतरावांनी एका ठिकाणी म्हटले आहे, ''संस्कारक्षम मन असणे ही देणगी नियतीची !''  नियतीने उदार मनाने ही देणगी यशवंतरावांना दिली होती.  संस्कारक्षम मनाबरोबर प्रतिभाही त्यांना प्राप्‍त झाली होती.  त्यांच्या शब्दांना ललितरूप मिळाले त्याचे कारण हेच आहे.  कथा-कादंबर्‍यांमध्ये लालित्य नसेल तर ?  आणि लालित्य हे केवळ शब्दातच असते का ?  ते म्हणतात, ''ललित लेखनाचा आत्मा केवळ शब्दलालित्यात नाही.  विचारांच्या पार्श्वभूमीवर भावविश्वात न्हाऊन निघालेली जिवंत अनुभूती व्यक्त होताना ललितरूपच घेते.  मग ही अनुभूती कोणत्याही क्षेत्रातील का असेना !'' (ॠणानुबंध, पृ. अकरा-बारा).  यशवंतरावांनी या शब्दात साहित्य म्हणजे काय हे सांगितले आहे.

यशवंतराव चव्हाणांचे ललित साहित्यावरचे चिंतन अतिशय मोलाचे आहे.  

भाऊसाहेब खांडेकरांचा दाखला देऊन त्यांनी ललित साहित्याविषयी म्हटलं आहे, ''ललित साहित्य अनंत व गंभीर अशा समुद्रासारखे आहे.  सागर, केव्हा, कशी रूपे घेतो, हे कळत नाही.  कधी ओसरलेला असतो, तर कधी ऊफाळलेला असतो, तर कधी शांत, तर कधी रौद्ररूप धारण केलेला.  पण त्याच्या पोटात काय असते ?  पोटात कधी रत्ने असतात, तर कधी शार्क मासे.  पोटात तळाशी तेलही असते.  रत्ने असतात, म्हणून त्याला रत्‍नाकर म्हणतात.  अशा अनेकविध रूपात तो असतो.''  (शब्दांचे सामर्थ्य, पृ. २५०)

साहित्य हे मानवी जीवनाचे प्रतिरूप असते हेच खरे.  ललितलेखक त्याची अथांगता शोधायचा प्रयत्‍न करतो.  यशवंतराव म्हणतात, ''ललित लेखकाजवळ भवितव्याचा वेध घेणारी प्रतिभा असली पाहिजे, ज्याला ही वेध घेणारी दृष्टी नाही, त्याला लेखक कसे म्हणायचे ?  हा खरा प्रश्न आहे.''  (शब्दांचे सामर्थ्य, पृ. २५१) ललित साहित्य ही कला आहे.  पण ती जीवनासाठी असली पाहिजे.  कला ही जीवनाभिमुख असली पाहिजे.  साहित्याला सामाजिक आशय असेल तरच ते प्रबोधनाचे साधन व माध्यम होऊ शकते.  साहित्यिकाची प्रज्ञा समाजाभिमुख असली पाहिजे.  साहित्यिकाची प्रज्ञा समाजाभिमुख असली पाहिजे.  लेखक संवेदनशील देखील असला पाहिजे, साहित्य हे थर्मामीटरमधील पार्‍यासारखे संवेदनशील असते, असे त्यांनी एका ठिकाणी विधान केले आहे.  यशवंतराव चव्हाणांनी दलित साहित्याचे स्वागत केले ते त्याचसाठी.  कराड साहित्य संमेलनात स्वागताध्यक्ष म्हणून केलेले त्यांचे भाषण हे साहित्यावरचे आशयगर्भ भाष्य आहे, असे मी मानतो.  साहित्यिकाची बांधिलकी समाजाशी असली पाहिजे.  ती उत्स्फूर्त असली पाहिजे.  बांधिलकी ही कलम करता येत नाही.  बीजातूनच ती अंकुरली पाहिजे.