शैलीकार यशवंतराव २

प्रस्तावना

डॉ. शिवाजीराव देखमुख हे मराठी साहित्याचे प्राध्यापक, अभ्यासक व संशोधक आहेत.  आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे कार्य व व्यक्तिमत्त्व हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे.

शैलीकार यशवंतराव हा प्रा. देखमुखांचा पहिलावहिला ग्रंथ आहे.  त्यात त्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतला आहे.  यशवंतरावजी चव्हाण हे एक शैलीकार वक्ते व लेखक होते.  वाग्विलासीनी शारदा त्यांच्यावर प्रसन्न होती.  ते धुरंधर राजकारणी तर होतेच होते, पण कला-साहित्य-संस्कृतीचे ते मर्मज्ञही होते.  त्यांच्या सार्वजनिक जीवनाला साहित्यकारणाची जोड मिळाली होती.  वाङ्‌मयीन संस्कृतीचे ते उपासक होते.  यशवंतराव चव्हाणांची साहित्यनिर्मिती ही मराठी माणसाच्या मर्मबंधातली ठेव आहे.  

यशवंतरावजींच्या शब्दसामर्थ्यावर फार मोठा विश्वास होता.  ते एका ठिकाणी म्हणतात, ''मी शब्दांना फार मानतो.  त्यांच्यात अस्त्रांचे सामर्थ्य आहे, तसेच प्रकाशाचे तेज आहे.  एखादा शब्द कोणी, अशा वेळी उच्चारतो की, त्यामध्ये एक विलक्षण सामर्थ्य येते.  गांधीजींनी 'क्विट इंडिया !' हे शब्द उच्चारले.  केवढे सामर्थ्य या दोन शब्दात होते.''  (शब्दांचे सामर्थ्य, सं. राम प्रधान, पृ. २४९)

यशवंतरावजींनी शब्दांची आयुष्यभर पूजा केली, आराधना केली.  शब्दांचे त्यांना अपार आकर्ष होते.  शब्दांतील सौंदर्य त्यांना मोहवीत असे.  त्यांचे मन संवेदनशील व कलासक्त होते.  खरे तर शब्द हे माणसाला प्राप्‍त झालेली कवच कुंडलेच असतात.  शब्द त्याला अभय देतात.  यशवंतरावजींना आपल्या राजकीय जीवनात शब्दसामर्थ्याचा फार मोठा फायदा झाला.  त्यांनी जनसामान्यांशी जे नाते जोडले ते शब्दांच्या माध्यमातून.  शब्दांच्या माध्यमातून त्यांनी हजारो लोकांच्या स्पंदनांना स्पर्श केला.  वक्तृत्वाच्या माध्यमातून त्यांनी लोकांशी अर्थपूर्ण संवाद साधला.

यशवंतराव चव्हाण हे शैलीकार लेखकही होते.  त्यांची भाषणशैली व लेखनशैली सारखीच होती.  त्यात कुणाचेही अनुकरण नव्हते.  स्वतःची स्वतंत्र अशी शैली त्यांनी विकसित केली होती.  Style is the man !  शैली ही लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाची जणू राजमुद्राच असते.  त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळेपण हे त्यांच्या शैलीतून व्यक्त होते, शैली म्हणजे लेखकाची ओळख, त्याची अस्मिता आणि त्याचे स्वत्व !

यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वातला सर्व गोडवा त्यांच्या शब्दांतून व्यक्त झाला आहे.  त्यांचे मन अतिशय तरल व पारदर्शक होते.  ते ॠजुतेने काठोकाठ भरलेले होते.  छोट्या छोट्या वाक्यातून त्यांनी किती तरी मोठा आशय व्यक्त केला आहे.  सुभाषितवजा वाक्यांची पेरणी त्यांनी आपल्या भाषणातून व लेखनातून केली आहे.

नवोदित लेखक एखाद्या प्रथितयश लेखकाचे अनुकरण करतो.  चालत चालतच त्याला स्वतःची वाट सापडते.  स्वतःची चालही सापडते.  यशवंतरावजींना अनेक लेखक आवडत होते.  पण कुणाचेही अंधानुकरण त्यांनी केले नाही आणि म्हणून मराठी साहित्याच्या शिवारात त्यांनी स्वतःच्या पाऊलखुणा निर्माण केल्या.  मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीला सुजलाम, सुफलाम् करण्याचा त्यांनी प्रयत्‍न केला.

यशवंतराव चव्हाणांचा पिंडच मुळात एका दर्दी साहित्यिकाचा होता.  अमृताशी पैज लावू शकेल असे त्यांचे साहित्य आहे.  प्रकाश आणि माधुर्य यांचा सुरेख संगम त्यांच्या साहित्यात आढळतो.  सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वात प्रकाश व माधुर्याचे मीलन असते.  यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व सुसंस्कृत होते.  त्या व्यक्तिमत्त्वाला मोगर्‍याची उपमा देत येईल.  त्यांच्या शब्दाशब्दातून तो उमलला, फुलला व दरवळला आहे.