विकास करावयाचा असेल, तेथील आर्थिक जीवन संपन्न करावयाचे असेल, तर ज्याप्रमाणे काही जिवंत पाण्याचे झरे असल्याशिवाय नदी वाहू शकत नाही त्याचप्रमाणे, जेथे जिव्हाळ्याच्या ज्या काही शक्ती असतील, त्या मोकळ्या केल्या पाहिजेत.
चंद्रावर जाण्याचा प्रयत्न करावयाचा असला तरीही त्याच्यासाठी जमिनीवर जर पाय नसतील, तर चंद्राकडे जाण्याचा विचार करणे सुचणारच नाही. चंद्रावर जाणारे रॉकेट कसे तयार करावे याचा विचार शास्त्रज्ञाच्या डोक्यात चालवायचा असेल, तर त्याच्या पोटामध्ये प्रथम ज्वारीचा कण गेला पाहिजे. त्याशिवाय ते काम त्याला जमणार नाही. त्यामुळे कितीही मोठे प्रयत्न करावयाचे एखाद्या देशाने ठरविले, तरी जमिनीतून निर्माण होणा-या उत्पादनावरच शेवटी माणूस अवलंबून असतो, असा सध्याचा अनुभव आहे.
आजच्या दुनियेमध्ये आपण सगळ्या गोष्टींशी तडजोड केली तरी चालेल, पण माझे स्वत:चे असे मत आहे की, एका गोष्टीशी आपण बिलकूल तडजोड करता कामा नये; आणि ती म्हणजे गरिबी.
राज्यकर्ते आणि प्रशासक म्हणून आपण निर्जीव वस्तूंवर राज्य चालवीत नसतो, तर गतिमान सामाजिक घटना आपणास हाताळावयाच्या असतात, मानवी प्रण्यांचे प्रश्न आपणास सोडवावयाचे असतात आणि म्हणून मला जे सांगावयाचे आहे ते मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो. आर्थिक प्रश्न हाताळण्याचे दोन मार्ग आहेत विशिष्ट पध्दतीने आकडेवारी गोळाकरणे, भांडवल गुंतविण्याच्या बाबतीत शास्त्रशुध्द पध्दतीने अग्रक्रम ठरविणे, विकासाची गती निश्चित करणे आणि अशा रीतीने प्रश्नांचे उत्तर मिळाल्याचे आपल्या सदसदविवेक बुध्दीला सांगणे. हा झाला शास्त्रशुध्द मार्ग. दुसरा मार्ग म्हणजे आपल्या भोवतीच्या प्रश्नांची सविस्तर पाहणी करून, त्यातील कोणते् प्रश्न आपण सोडवले आहेत याची तपासणी करणे हा आहे.
शेतीच्या क्षेत्रात आम्ही प्राचीन काळी पहिला शोध लावला हे आमचे कर्तृत्त्व मानले जाते; पण आज आम्ही अन्नाला महाग झालो आहोत ही गोष्टही तितकीच खरी आहे. आज कित्येक लाख टन धान्य बाहरच्या देशांतून आपणास आणावे लागते. ते देश आपल्याला हे धान्य देतात हा त्यांचा मोठेपणा आणि गरज पडली म्हणजे आम्ही ते आणतो हा आमचा शहाणपणा. परंतु पोट भरण्याकरता आम्हांला दुस-यांपुढे पदर पसरावा लागतो, हे राष्ट्र म्हणून या देशाला मुळीच अभिमानास्पद नाही.
राज्य मोठे असो अगर लहान असो, त्या त्या राज्यात राहणा-या लोकांची जी भाषा असेल तिथल्या शासनाचे, शिक्षणाचे व दैनंदिन व्यवहाराचे माध्यम म्हणून स्वीकार झाला नाही, तर लोकशाही शासन हे केवळ नावापुरतेच लोकशाही शासन राहील. लोकशाहीचा आत्माच ते हरवून बसलेले असेल. कारण जनतेची इच्छा हा लोकशाहीचा मूळ आधार असल्यामुळे लोकांच्या इच्छा, त्यांच्या अंतर्मनातील भावना व सुप्त संवेदना, त्यांच्या आशा-आकाक्षा यांना प्रकट रूप देण्याचा भार त्यांच्या भाषेनेच वाहिला पाहिजे ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे.
पंढरीच्या विठ्ठलाच्या या परिसरात, त्याच्या पंचक्रोशीत आज मोठ्या आनंदाने आलो आहे. येताना मी मनात विठ्ठलाला म्हणालो, चंद्रभागा तुझ्या अंगमात पोहोचण्यापूर्वीच आज आम्ही तिला अडवली आहे, तिला आम्ही आज साकडे घातले आहे. तुझ्या चरणांजवळ ही चंद्रभागा अठ्ठावीस युगे वाहत आली. या चंद्रभागेला उजनीजवळ आज आम्ही थांबवितो आहोत. महाराष्ट्रातील शेतकरी दरसाल आषाढी-कार्तिकी एकादशीला खांद्यावर पडशी टाकून “ग्यानबा तुकाराम” म्हणत म्हणत तुझ्या दाराशी येत असतो. त्या ग्यानबा तुकारामाच्या शेतीत आणि झोपडीत विठ्ठला आता तू जा. तिथे तुझ्या चंद्रभागेला तू भेट. जनाबाईच्या मदतीला तू धावून गेलास आणि तुझी मनापासून भक्ती करण्या-या तुझ्या सगळ्या भक्तांच्या मदतीलाही तू धावून गेलास. तसशीच तुझी भक्ती करणा-या आणि महाराष्ट्राच्या झोपडीत राहणा-या गरीब शेतक-याने आज तुझी चंद्रभागा अडविली आहे. त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या मदतीसाठी “विठ्ठला, तू त्यांच्या शेतीत जा.” तू आता पंढरपूरच्या मंदिरात राहू नकोस! विठ्ठलाला मी ही मनोभावे प्रार्थना केली आहे. तुकारामाची, ज्ञानेश्वराची, एकानाथाची आठवण करून मी ही प्रार्थना केली आहे. पण कृपा करून आपण हे मात्र लक्षात ठेवा की, निव्वळ प्रार्थनेने हे सर्व घडणार नाही. त्याकरिता तुम्हाला कष्टाची गंगा उपसावी लागणार आहे. त्यासाठी जिद्दीने काम करण्याचा आपण निश्चय करू या.