लोकनेते यशवंतराव चव्हाण - ५

आपल्या नावाची हकिगत त्यांना आपल्या आजीकडून समजली. यशवंतरावांच्या जन्मावेळी त्यांची आई विठाई खूप आजारी होती. त्या काळात दवापाण्याची सोय नव्हती. घरगुती औषधाने गुण न आल्याने आजीने ग्रामदैवत सागरोबाला साकडे घातले, " अक्काला (यशवंतरावांची आई) वाचविण्यास माझ्या हाताला यश दे, तुझी आठवण म्हणून मुलाचं नाव यशवंत ठेवतो." सुदैवाने आई वाचली. मुलाचे नांव यशवंत ठेवण्यात आले, हा होता यशवंतरावांच्या नावाचा इतिहास.

मोठ्या बंधूंची बदली विट्याला झाल्याने ते तिकडे स्थायिक झाले. आई मात्र दोन मुलांना घेऊन कराडमध्येच राहिली. शिक्षणाचे मोल जाणून तिने मुलांना शिक्षण दिले. इयत्ता सातवीत शिकत असताना यशवंतरावांना वृत्तपत्र वाचनाची सवय जडली. 'विजयी मराठा', 'राष्ट्रवीर' या ब्राह्मणेत्तर चळवळीचा पुरस्कार करणा-या वृत्तपत्रांचे ते वाचन करीत. आपले वाचन एकांगी राहू नये म्हणून ते मजूर, श्रध्दानंद, नवाकाळ, ज्ञानप्रकाश ही वृत्तपत्रेही वाचू लागले.  देशात घडणा-या स्वातंत्र्य चळवळीतील आंदोलनाच्या बातम्या वाचून राष्ट्रभक्तीने त्यांचे मन प्रेरीत होत असे. मराठी सातवी इयत्ता पास झाल्यावर कराडमधील टिळक हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. याकाळात हरिभाऊ आपटेंच्या कांदब-यांचे त्यांनी वाचन केले. शिवराम महादेव परांजपेंचे 'काळ' मधील निबंध, केळूसकरांनी लिहिलेले 'छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र', व-हाड प्रांतातील पंढरीनाथ सिताराम पाटील यांनी लिहिलेले 'महात्मा जोतीराव फुलेंचे चरित्र' या पुस्तकांचे वाचन यशवंतरावांनी या काळात केले. वाचनामुळे त्यांची दृष्टी चौफेर बनली. आपले मधले बंधू गणपतरावांशी ते विविध विषयावर चर्चा करु लागले. जोतीराव फुलेंच्या संघर्षमय जीवनाचा आदर्श गणपतरावांनी घेतला होता. ते यशवंतरावांना याबद्दल मार्गदर्शन करत असत. यशवंतरावांच्या शिक्षणासाठी यांनी स्वत:च्या शिक्षणाचा त्याग केला व ते पोटापाण्याचा व्यवसाय करु लागले.
१९३१ मध्ये पुण्याच्या नुतन मराठी विद्यालयात वक्तृत्त्व स्पर्धेनिमित्त जाण्याचा प्रसंग यशवंतरावांवर आला. शिवाजीराव बटाणे या मित्रामुळे यशवंतरावांचा पुण्याला जाण्या-येण्याचा प्रश्न मिटला. या स्पर्धेत आयत्यावेळी विषय देऊन बोलायला सांगत. 'ग्रामसुधारणा' या विषयावर प्रभावीपणे बोलल्यामुळे यशवंतरावांना पारितोषिक मिळाले. त्यांच्या शालेय जीवनातील वक्तृत्व स्पर्धेतील ते पाहिलेच यश होते.

शालेय जीवनात गणेशोत्सवातील नाटके पाहणे, तमाशे पाहणे आदी छंदही यशवंतरावांनी जोपासले. केशवराव दाते यांच्या 'प्रेमसंन्यास' नाटकाचा प्रयोग कोल्हापूरात होणार होता. 'नवाकाळ' मध्ये त्याची जाहिरात यशवंतरावांनी वाचली. आपले शिक्षक मित्र माधवराव घाटगे यांच्याबरोबर कोल्हापूरला जाऊन त्यांनी हे नाटक पाहिले. त्यावेळी हे नाटक 'पॅलेस थिएटर' मध्ये झाले होते. नाटक पाहून रात्रीचा मुक्काम कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनवर थंडीने कुडकुडत काढला. दुस-या दिवशी सकाळच्या रेल्वेने कराड गाठले. असे एक ना अनेक प्रसंगांनी यशवंतरावांचे शालेय जीवन भरून गेले होते. प्रत्येक प्रसंगातून त्यांना जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाली.
आई बद्दलच्या आठवणी सांगताना यशवंतराव म्हणतात, "आईने आम्हा भावंडांना मन मोठे करायला शिकविले. परिस्थितीने गांगरुन जायचे नाही ही जीवनातील पहिला धडा मी आईकडून शिकलो."