लोकनेते यशवंतराव चव्हाण - ४

वडिलांच्या बोटाला धरुन यशवंतराव घरी आले. आईशी वडिलांचे बोलणे झाले व ते अंथरुणावर कलंडले. आई दु:ख करु लागली. गावातील लोकांची ये-जा सुरु झाली. ते अंथरुण बळवंतरावांचे शेवटचेच ठरले. एक-दोन दिवसातच वडिलांची प्रकृती खालावली. शेवटच्या क्षणी यशवंतराव व त्यांच्या भावंडांना घरासमोर असलेल्या तुळशीच्या एका कट्ट्यावर घोंगडे टाकून बसविण्यात आले होते. थोड्या वेळातच घरातून आईचा हंबरडा ऐकू आला.  त्या आवाजाने कावरीबावरी झालेली मुले घराच्या दिशेने धावली. काही जाणकार मंडळींनी या मुलांना रोखले व सांगितले,

"बाबांनो, येथेच थांबा, घरात जाऊ नका."

वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी यशवंतरावांवरील पितृछत्र हरपले.  यशवंतरावांना या वयात वडिलांच्या चेह-याची नीट ओळखही झाली नव्हती. या काळात या मुलांना आजी व मामा आधार मिळाला. थोड्याच दिवसात चव्हाण परिवार कराडला आपल्या भाड्याच्या घरी येऊन स्थायिक झाला. उदरनिर्वाह कसा करायचा हा मोठा प्रश्न होता. थोरले बंधू ज्ञानदेव हे सतरा-अठरा वर्षाचे होते. वडिलांच्या जागेवर त्यांना बेलिफाची नोकरी मिळाली यासाठी वडिलांच्याच काही बेलिफ मित्रांनी प्रयत्न केले.  याकामी कराडच्या मुन्सफांनी शिफारस केली. हे शिफारस पत्र घेऊन आई तीन मुलांना सोबत घेऊन सातारला जिल्हा न्यायाधिशाकडे आली. कराड ते कोरेगाव रेल्वे प्रवास करुन तेथून पुढ अकरा मैलाचा प्रवास त्यांनी बैलगाडीने केला. सातारच्या राजवाड्यात न्यायाधीशाचे कोर्ट होते. बराच वेळ बाहेर थांबल्यानंतर या सर्वांना आत बोलावले झाले. इंग्रज न्यायाधिशाने सहानुभूती दाखवून यशवंतरावांच्या थोरल्या बंधूंना वडिलांच्या जागेवर 'बेलिफ' म्हणून घेण्याचा आदेश काढला. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. एक-दोन आठवड्यातच ज्ञानदेवाची बेलिफ म्हणून नेमणूक झाली. वडिलांच्या मृत्यूनंतर निराधार झालेल्या चव्हाण कुटुंबाला आधार मिळाला. यशवंतरावांच्या पुढील शिक्षणाला त्यामुळे फार मोठा हातभार लागला.

यशवंतरावांचे शिक्षण कराडमध्ये सुरु असताना प्रत्येक वर्षी दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी देवराष्ट्रेला जाण्याची प्रथा मात्र सुरुच होती. आजोळच्या घराच्या आजुबाजुला रामोशी, धनगर समाजाची वस्ती होती. त्यांच्या मुलांशी खेळण्यात यशवंतरावांचे बालपण गेले. या समाजाची दु:खे, गरिबीचा संसार, दगडावर दगड रचून बांधलेली कमी उंचीची घरे याच्याशी यशवंतरावांचा संबंध आला. आजोळची गरिबी व त्याकाळातील सर्वसामान्य माणसांची जीवनपद्धती जवळून न्याहाळायला यशवंतरावांना मिळाल्याने त्यांना त्याचा पुढच्या जीवनात खूपच उपयोग झाला.

कृष्णेच्या पाण्यात पोहण्याचा छंद बालपणापासूनच लागलेल्या यशवंतरावांच्या जीवनातील एक प्रसंग अत्यंत महत्त्वाचा आहे. देवराष्ट्रे गावाच्या बाजूने एक ओढा वाहत जातो. या ओढ्याचे नाव सोनहिरा. ओढ्याच्या काठावर रामोश्यांच्या मुलांबरोबर एकदा यशवंतराव गेले होते. पावसाळ्याचे दिवस होते. दुपारची वेळ होती. ओढ्याला अचानक पाणी वाढले. कृष्णा आरपार करण्यात तरबेज असणा-या यशवंतरावांना ओढ्याच्या प्रवाहाबद्दल विशेष काही वाटले नाही. त्यांनी ओढा पार करण्यासाठी उडी टाकली. मध्यापर्यंत गेल्यावर ओढ्याच्या वेगवान प्रवाहातून त्यांना पलिकडे जाता येईना. आपण आता बुडणार याची जाणीव होताच त्यांनी मदतीसाठी ओरडायला सुरुवात केली. प्रसंगावधान ओळखून सोबतच्या दोन-तीन मुलांनी ओढ्यात उड्या टाकल्या. यशवंतरावांना ओढ्याच्या काठावर आणण्यात आले. जणू यशवंतरावांचा तो पुनर्जन्मच होता. यशवंतराव आयुष्यात हा प्रसंग कधीच विसरु शकले नाहीत. नंतर मात्र कृष्णेच्या पाण्यात सुट्टीमध्ये दररोज दीड-दोन तास पोहण्याचा सराव त्यांनी केला. या व्यायामाचा त्यांना पुढे पुष्कळच उपयोग झाला.