२०
कुठलाही महाकवी किंवा कुठलाही कवी निव्वळ शब्दांचा जुळारी होऊन कवी होऊ शकत नाही. नादमाधुर्य म्हणजेच काव्य असे आपणाला म्हणता येणार नाही. आपल्या मराठी वाड्.मयामध्ये असा एक काळ होता की, ज्या वेळी शब्दलालित्य म्हणजेच साहित्य असे समजून अशा साहित्यामागे लोक धाव घेत; परंतु निव्वळ नादमाधुर्यातूनच निर्माण होणा-या काव्यात जनतेचे मन काबीज करण्याचे सामर्थ्य निर्माण होऊ शकत नाही. त्या जुळणा-या सुंदर नादमधुर शब्दांच्या पाठीमागे एक नवा सामर्थ्यवान संदेश देणारे मन आणि विचार असल्याशिवाय कवी किंवा महाकवी निर्माण होऊ शकत नाही.
२१
माझ्या मते भाषांतरी भाषा फारशी चांगली नसते. जमिनीतले पाणी, जमिनीतली सत्त्वे आणि जमिनीत इतर जी काही शक्ती असेल ती घेऊन पिऊन जमिनीतून ऊस जसा वाढत जातो; तशी भाषा ही जिवंत असली पाहिजे. मराठी भाषेने मराठी मनाचा कस घेऊनच वाढले पाहिजे. तरच ख-या अर्थाने मराठी भाषा वाढेल, अधिकाधिक उत्कर्ष पावेल.
२२
कधी साहित्यिक राजकारण्यांना मार्गदर्शन करतात, तर कधी राजकारणी साहित्यिकांना मार्गदर्शन करतात, असे हे सर्वत्र चालत आलेले आहे. तेव्हा माझ्या दृष्टीने मला जो महत्त्वाचा विचार आपल्याला सांगावयाचा आहे तो हा की, एक अनुभूती आणि एक विचार राबविण्याचे हे जे काम आहे ते अविभाज्य आहे. जीवनाच्या निनिराळया क्षेत्रांशी अधिक निकटचे संबंध प्रस्थापित केल्याशिवाय आणि जीवनामध्ये असलेले श्लेष आणि काव्य यांच्याशी अधिक जवळीक केल्याशिवाय साहित्यात फारशी मोलाची भर कोणी घालू शकेल असे मला वाटत नाही.
२३
ज्ञानभाषा आणि लोकभाषा एक झाल्याशिवाय समाजाचे जीवन समर्थ होत नाही, उन्नत होत नाही, विकसित होत नाही. ज्ञानभाषा एक आणि लोकभाषा दुसरी अशी हिंदुस्थानच्या जीवनाची परंपरागत कहाणी आहे. ऋषीमुनींची आणि पंडितांची ज्ञानभाषा होती संस्कृत; कारण ती देवभाषा होती; आणि जनसामान्यांची भाषा होती प्राकृत! हे फार पूर्वी; पण नंतरही तेच झाले.मुसलमानी अमलात ज्ञानभाषा उर्दू, फारसी, अरबी जी काही असेल ती झाली. त्यानंतर इंग्रज आले; आणि या देशातील ज्ञानभाषा इंग्रजी बनली. लोकभाषा अशा त-हेने दुर्लक्षित राहिल्यावर लोक शहाणे होणार तरी कसे? आता स्वातंत्र्यानंतर जेव्हा जनजीवन आम्हाला विकसित करावयाचे आहे असे आम्ही म्हणतो, तेव्हाही लोकभाषा ज्ञानभाषा होणार नसेल तर ज्ञानभाषा हा ज्यांचा मक्ता होता त्यांचेच संस्कार आणि त्यांचेत साम्राज्य सांस्कृतिक जीवनामध्ये निर्माण होईल.
२४
आम्ही आमच्यामध्ये नाना त-हेच्या सामाजिक भेदाभेदांची मोठी थोरली उतरंड रचली म्हणून हिंदुस्थान दुबळा झाला. आम्ही खटपट करतो आहोत आर्थिक क्रांती करावयाची, औद्योगिक क्रांती करावयाची. हातात आलेल्या मोठया थोरल्या स्वातंत्र्याच्या शक्तीचा, लोकशाहीच्या सत्तेचा वापर करावयाचा प्रयत्न चालला आहे, पण गाडा अजूनही काही पुढे जात नाही.याचे कारण समाजातील ही उतरंड आहे. उतरंड हा शब्द मी मुद्दामच वापरीत आहे; कारण आम्ही सर्व एकमेकांच्या डोक्यावर बसलो आहोत आणि वरचा जो खालच्याच्या डोक्यावर बसला आहे, त्याचे तोंड बेद करून बसला आहे. खालच्याला काही वावच नाही. समाजामध्ये आम्ही ही जी उच्चनीचतेची, जातिभेदाची, वर्णभेदांची उतरंड रचलेली आहे ती केवळ एकाच प्रांतात रचलेली नसून सर्व हिंदुस्थानभर रचलेली आहे. ही उतरंड मोडण्याचे काम ज्या दिवशी आपण करू त्या दिवशी आपण खरी क्रांती केली असे मी म्हणेन.
२५
ब्राम्हण ब्राम्हणांपुरता विचार करतो, माळी माळयांपुरता विचार करतो. हे मासले मी केवळ नमुन्यादाखल सांगितले. जातीयवादाच्या या विषारी विचारापासून आपण महाराष्ट्राला मुक्त केले पाहिजे. जातीयवादाचा हा विचारच समूळ नष्ट केला पाहिजे, तेव्हाच महाराष्ट्राचे सामाजिक मन एकजिनसी होईल; परंतु हे कार्य आपण एका दिवसात, एका रात्रीत करू शकणार नाही. त्यासाठी विचारी माणसांनी विचारपूर्वक प्रयत्न केल्याशिवाय हे घडून येणार नाही.