यशवंतराव चव्हाण यांचे मौलिक विचार- २


मला अभिप्रेत असलेला ‘समाजवाद’ हा केवळ एक आर्थिक सिध्दान्त नाही. तो मूल्यावरही आधारलेला आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तिच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास हा आपल्या विचाराची व आचाराची आधारशिळा असली पाहिजे. पिढयानपिढया हरिजन  आणि गिरिजन यांची अवहेलना होत आहे, त्यांच्यावर अन्याय होत आहेत, सामाजिक दृष्टया नि आर्थिक दृष्टया त्यांचे शोषण चालू आहे. राष्ट्रीय जीवनाच्या मंजधारेपासून त्यांना अलग करण्यात आले आहे. आपल्या राष्ट्रीय जीवनातील हे वैगुण्य आपण किती लवकर नाहीसे करणार आहोत यावरच आपल्याला समाजवादाचा कोणता आशय अभिप्रेत आहे हे ठरणार आहे. जोपर्यंत हे वैगुण्य दूर होत नाही तोपर्यंत सामाजिक उद्दिष्टांची चर्चा करणे निरर्थक आहे. ते काम सोपे नाही. समाजाचे महावस्त्र नव्याने विणावयाचे आहे. त्यासाठी गरज आहे ती समर्पणशीलतेची आणि ध्येयवादी आवेशाची.


आपल्याला लोकांच्या जीवनातील दैन्य व दारिद्य् नाहीसे करायचे आहे. त्यासाठी आपण विकासाचा कार्यक्रम हाती घेतला आहे; पण विकासाच्या कार्यक्रमात आपण गुंतलो असताना आपले राजकीय विचारांचे ज्ञान ताजे ठेवले पाहिजे. आपण कशासाठी व कोणासाठी विकासयोजना राबवीत आहोत याचे भान दिलदिमागामध्ये असले पाहिजे. कार्यकर्त्याचा राजकीय विचार पक्का पाहिजे. विद्यमान परिस्थितीचे सम्यक ज्ञान व जळते प्रश्न त्याला माहीत असले पाहिजेत; आणि आपल्या वाचनातून व परिस्थितीच्या निरीक्षणातून त्याला त्या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत.

१०
पक्ष चालतात ते निष्ठेने चालतात हे जरी खरे असले, तरी लोकशाही पक्ष हे विचारांच्या निष्ठेने चालले पाहिजेत असा तुमचा-आमचा आग्रह असला पाहिजे. व्यक्तीवरच्या निष्ठा चुकीच्या आहेत. त्या निष्ठा काम देत नाहीत; कारण व्यक्ती शेवटी चूक करू शकते. मनुष्य कितीही मोठा असला तरी त्याच्या हातून चूक होणार नाही असे विधान कोणीही करू शकणार नाही.

११
जनतेला सांगितले पाहिजे; की तू राजा आहेस. अविकसित, दुष्काळी अशा कडेकपारीच्या बनलेल्या सह्याद्रीचा तू राजा आहेस. दु:खात असलेल्या जनतेच्या जीवनावर सुखाची सावली निर्माण करणे हे राजाचे कार्य प्रत्येक मराठी माणसाने केले पाहिजे. एकेक माणूस, एकेक लहान मूल हे सावली देणारे झाड आहे असे मानून खतपाणी घातले पाहिजे.

१२
देशाच्या आर्थिक प्रगतीचे जे तत्त्व आपण स्वीकारले आहे, त्या तत्त्वाचा आपल्याला त्याग करता येणार नाही. ज्या दिवशी ह्या तत्त्वाचा आपण त्याग करू, त्या दिवशी देशाच्या संरक्षणाच्या प्रश्नांची धुळधाण होईल हे आपण नक्की समजा. माझ्या या सगळया म्हणण्याचा सारांश असा की, देशाची अंतर्गत नीती, परराष्ट्रनीती आणि देशाची संरक्षणनीती ही परस्परावलंबी असतात. एवढेच नव्हे तर राष्ट्रीय नीतीच्या एकाच सूत्राची ही केवळ वेगवेगळी रूपे असतात. कुठल्याही देशाची संरक्षणाची अलग, परराष्ट्रनीती अलग आणि अंतर्गत आर्थिक नीती अलग अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणजे त्या देशाचे भवितव्य धोक्यात येते.

१३
सहकार चळवळीत आर्थिक सत्ता आहे याचीही जाणीव लोकांत आणि त्याचप्रमाणे सहकारी कार्यकर्त्यांत निर्माण झाली आहे. ही चळवळ एका अर्थाने सत्तेचे एक केंद्र आहे; आणि सत्तेचे केंद्र म्हटले म्हणजे लोकशाहीचा अंकुश त्यावर ठेवलाच पाहिजे. तसे न केल्यास, अनियंत्रित सत्तेमुळे विकासाचे हे शस्त्र दुधारी ठरेल अशी मला साधार भीती वाटते.