कृष्णाकांठ१७३

मी मोठा निराश होऊन परत आलो. मला हे कुणाला सांगता येईना. श्री. गणपतरावांशी बोलणे अवघड होते. फक्त गपणतरावांच्या एक-दोन मित्रांशी या डॉक्टरांशी झालेल्या चर्चेतील काही भाग सांगितला आणि त्यांना सल्ला देण्याचा प्रयत्न करण्यास सांगितले. त्याचा कधी कधी उपयोग होत असे, कधी कधी उपयोग होत नसे.

१९४५ च्या शेवटी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली, म्हणून मी त्यांच्याशी प्रेमाचे भांडण केले आणि त्यांना सांगितले, की
''तुमच्या आजाराची काळजी घ्यावी, म्हणून मी माझे आवडते काम सोडून येथे राहिलो, तर तुम्ही हे काय करता आहात?''

माझ्या आग्रहाकरता ते परत मिरजेला गेले आणि त्याच वेळी जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या खटपटींना जोर चढला. मी १९३७ साली श्री. आत्माराम पाटील यांना उमेदवारी मिळावी, म्हणून त्यांच्याकरता केलेल्या खटपटींची मला आठवण झाली. पण का, कोण जाणे, अशी खटपट आपण आपल्याकरता करावी, असे मला कधीच तीव्रतेने वाटले नाही. माझे बहुतेक सर्व मित्र हे गृहीत धरून होते, की मी उमेदवार म्हणून निवडला जाणार. त्यांच्या मताने ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ होती. पण मी त्यात रस घेत नाही, याचे त्यांना आश्चर्य वाटे. मी त्यांना सांगत असे, की १९३७ साल आणि १९४६ साल यांच्यामध्ये फार मोठा फरक झालेला आहे. एक मोठे जनआंदोलन, एक मोठे युद्ध होऊन गेलेले आहे. त्यामुळे उमेदवाराची निवड ही काही दर्जेदारपणाने आणि सर्वांच्याच सल्लामसलतीने व्हायला पाहिजे. आमचे अनेक साथीदार अजून भूमिगत आहेत, काही अजून जेलमध्ये आहेत. अशा परिस्थितीत याला उमेदवारी द्या आणि याला देऊ नका, अशा तऱ्हेच्या चर्चेत निदान मी तरी पडणार नाही आणि मी उमेदवार आहे, असेही मी मुद्दाम कुणाला सांगायला जाणार नाही.

निवडणुका काही आठवड्यांवर आल्यावर स्वाभाविकच उमेदवारीच्या चर्चा सुरू झाल्या. सर्व कार्यकर्त्यांचा एकत्र बसून सल्ला घ्यावा, असा विचार मान्य असणारे स्वामी रामानंद भारती यांच्या अध्यक्षतेखाली वाळवे तालुक्यात एका गावी - त्या गावाचे नाव आज माझ्या लक्षात नाही - एक मोठी सभा झाली आणि खूप चर्चाही झाली, असे मी ऐकले. मी या सभेला गेलो नव्हतो. घाई करून आपण या सभेला उपस्थित राहू नये, असे काही तरी माझ्या मनात घर करून बसले होते. त्याचप्रमाणे श्री. गणपतरावांना आजारी टाकून मी निवडणुकीच्या राजकारणात पडावे, ही कल्पनाही मला बरी वाटत नव्हती. त्या सभेमध्ये ज्या चर्चा झाल्या, त्या चांगल्याच उलट-सुलट, नरम-गरम अशा झाल्या आणि शेवटी उमेदवारीच्या नावांबाबत कार्यकर्त्यांनी मतदानही केले. मला त्या संध्याकाळी मिरजेत भेटायला आलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले. सर्वांत जास्त मते माझ्या नावाला पडली होती. 'तेव्हा आता कृपा करून पुढे पाऊल टाका आणि निवडणुकीची तयारी करा.' हा सल्ला देण्यासाठी ही मंडळी मुद्दाम त्या सभेतून मी मिरजेला होतो, तेथे आली होती. या माझ्या होकार-नकाराच्या चर्चेत शेवटी श्री. गणपतरावांना मध्यस्थी करावी लागली आणि त्यांनी सांगितले,

''माझ्या आजारासाठी तू जर ही निवडणूक लढविणार नसलास, तर या दवाखान्यात मी एक क्षणही राहणार नाही. आयुष्यात काही गोष्टी केव्हा केव्हा आपणहून चालत येतात, तेव्हा त्यांना नकार न देता सामोरे जावे लागते. त्या पुन्हा अशा येतीलच, याची खात्री नसते. दुराग्रह सोड.''

श्री. गणपरावांचा शब्द मी मानला आणि त्यानंतर निवडणुकीचा उमेदवार होण्याच्या दृष्टीने मी कामाला लागलो. माझ्या सर्व मित्रांना आनंद झाला. इतर कोण उमेदवार असावेत, या चर्चेतही जिल्ह्याच्या प्रमुख नेते मंडळींनी माझे मत विचारले. माझ्या मताने वाळवे तालुक्यातर्फे श्री. के. डी. पाटील यांना उमेदवार म्हणून निवडले पाहिजे, असे होते. स्वातंत्र्य-सैनिकांचा त्यांच्या नावाला पाठिंबा होता. जिल्हा काँग्रेसचे जुने अध्यक्ष व्यंकटराव पवार हेही एक उमेदवार असावेत. त्याचप्रमाणे कराडचे श्री. बाबूराव गोखले अशा कार्यकर्त्यांच्या सूचना आल्या आणि यावेळी त्यानंतर फारसे वादविवाद न होता सातारा जिल्ह्याच्या दक्षिण भागासाठी माझ्या नावासह चार नावे मान्य झाली.

गेली जवळ जवळ ४० वर्षे मी निवडणुकीचे राजकारण करतो आहे. परंतु इतकी सरळ, बिनखर्चाची, तत्त्वनिष्ठ व जनतेच्या स्वयंस्फूर्त पाठिंब्यावर आधारलेली अशी कोणती निवडणूक असेल, तर ती १९४६ ची निवडणूक होय, हे मला कबूल केले पाहिजे.