या तऱ्हेने देशात आणि जगात राजकारणाने खूपच वेगळे रूप घेतले आणि स्वाभाविकपणे त्याचे आमच्या जिल्ह्यातही परिणाम होऊ लागले. जे फार कडवे भूमिगत होते, ते झालेला बदल अजून समजू शकत नव्हते. परंतु त्यांचा जीव धोक्यांत असल्यामुळे त्यांची ही गोष्ट समजण्यासारखी होती. १९४५ साल जसजसे पुढे जाऊ लागले, तसतसे हिंदुस्थानामध्येही निवडणुकी होणार, अशा चर्चा सुरू झाल्या. ऍटलींच्या मंत्रिमंडळाचे एक शिष्टमंडळ चर्चा करण्यासाठी हिंदुस्थानामध्ये येऊन गेले आणि राजकारणामध्ये नव्या नव्या घटना घडविणारा एक नवा वेग निर्माण झाला. आपल्या देशात आणि योग्य त्या क्रमाने आपल्या जिल्ह्यातही निवडणुका होणार, हे स्पष्ट झाले. याचा जो परिणाम व्हायचा, तो संघटनेच्या कार्यकर्त्यांवर आणि भूमिगत चळवळीवरही झाला. भूमिगत चळवळीतील कार्यकर्ते या निवडणुकीच्या प्रश्नाकडे समजुतीने पाहत होते. परंतु त्यांना त्यात विशेष रस वाटत नव्हता. त्यांतील काही लोकांशी माझी बोलणी झाली, तेव्हा त्यांनी सांगितले, 'याच्यातून हिंदुस्थानला स्वातंत्र्य प्राप्त होईल, असे आम्हांला अजूनही वाटत नाही. स्वातंत्र्यासाठी क्रांतीचे वातावरण सतत तेवत ठेवले पाहिजे, आणि ते कठीण काम आम्ही लोक करीत राहू,' हा त्यांचा दावा होता. मी या वादविवादात फारसा पडलो नाही. पण मी त्यांना माझ्या दृष्टीने समजाविण्याचा प्रयत्न केला. त्यांना सांगत राहिलो, की 'तुमच्या कामात आता अधिक काही गुंतागुंत होईल, असे काही होऊ देऊ नका. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा प्रश्न हा आता फक्त वर्ष, दोन वर्षाचा प्रश्न आहे. उजाडण्यापूर्वीची ही पहाट आहे.' अर्थात हे ते सर्वच मान्य करत नव्हते, परंतु माझी बाजू ते ऐकून घेत होते. १९४५ साली मी मुख्यत: माझ्या घरच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करून वकिली करण्याचा प्रयत्न करीत होतो. परंतु भूमिगत नेत्यांशी अधून मधून संबंध ठेवण्याचे योग येत असत. मीही ते ठेवीत असे आणि तेही ठेवीत असत.
या वेळेला आमच्या कराड शहरामध्ये एक नवे छोटेसे काम निर्माण करण्याची संधी मला प्राप्त झाली. एका शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षक आणि संस्थाचालक यांच्यामध्ये संघर्ष उभा राहिला. मी गावातील एक प्रमुख तरुण कार्यकर्ता, म्हणून शिक्षक मंडळी माझ्याकडे आली. त्या शिक्षक मंडळींचे नेते श्री. शंकरराव करंबेळकर होते. त्यांनी त्यांच्या संस्थेच्या चालकांशी झालेल्या संघर्षाची कारणे मला सांगितली. तेव्हा न्याय मला त्यांच्या बाजूला दिसून आला. मी शिक्षकांची बाजू घेतली. यातून माझा आणि श्री. शंकरराव करंबेळकरांचा जन्मभराचा जिव्हाळ्याचा स्नेहभाव सुरू झाला. या संघर्षाच्या निमित्ताने 'शिवाजी एज्युकेशन सोसायटी' ही शिक्षणसंस्था गावातील श्री. रामविलास लाहोटी, श्री. शंकरराव करंबेळकर, राजाराम पाटील, श्री. यशवंतराव पार्लेकर, श्री. अरब साहेब, श्री. गौरीहर सिंहासने या मित्रांच्या मदतीने सुरू झाली. कराड शहरामध्ये आज ही संस्था चांगले काम करून राहिली आहे. या संस्थेची आज तीन महाविद्यालये आहेत, पाच-सहा माध्यमिक शाळा आहेत. शिक्षणप्रसार करण्याचे काम या संस्थेने आपल्या शक्यतेनुसार उत्तम प्रकारे पार पाडले आहे, अशी माझी समजूत आहे. मला पुढे कराड सोडून जावे लागले, म्हणून या संस्थेचा ट्रस्टी म्हणून माझा जेवढा संबंध राहिला, तेवढाच आहे. प्रत्यक्ष काम श्री. शंकरराव करंबेळकर आणि त्यांचे साथी करीत होते. आज हे काम मुख्यत: श्री. पी. डी. पाटील हे लक्ष घालून करत असतात. १९४५ साली अशा घडामोडींच्या काळातही एक स्थानिक स्वरूपाचे नवीन कार्य आम्ही सुरू केले आणि ते टिकून राहिले, यात मला आनंद आहे.
श्री. गणपतरावांच्या प्रकृतीसंबंधाने मी माझी जबाबदारी जरी पार पाडीत असलो, तरी त्यांच्या प्रकृतीमध्ये हवा तसा फरक दिसून येत नव्हता. ते दोन-तीन महिने माधवनगरला राहायचे आणि परत कराडला यायचे. औषधपाणी घेत राहायचे, त्यामुळे प्रकृतीची प्रगती थांबल्यासारखे होत असे. त्यांच्या प्रकृतीत योग्य दिशेने फरक होत नाही, याची मी मिरजेच्या डॉक्टरांशी जाऊन एकदा तपशीलवार चर्चा करून आलो. मी एकटाच गेलो होतो. मला त्यांच्या प्रकृतीचे खरे स्वरूप समजावून घ्यायचे होते. कायमचे मिरजेस राहा, असे त्यांना मला आग्रहाने सांगता येत नव्हते. बरे वाटू लागले, की
''माझी प्रकृती चांगली आहे. मला माझे नित्याचे काम केले पाहिजे.'' म्हणून ते कराडला येत.
''घरचे तू एकटा किती करणार?'' असे सांगून काही व्यापार-धंदा करायला त्यांनी सुरुवात केली होती. तो करण्यासाठी ते परत येत असत. धंद्याच्या कामातही ते बरेच तरबेज होते. त्यामुळे मिरजेस पडून राहून वेळ व्यर्थ घालविण्यापेक्षा कराडला येऊन काम केले पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. त्यांना डॉक्टरांनी सांगितलेले पथ्य म्हणजे सिगारेट्स न ओढण्याचे. ते त्यांना जमले नाही. मी जेव्हा मिरजेला डॉक्टरांशी चर्चा केली, तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितले,
''खरे म्हणजे ते आता दोन वर्षांचेच सोबती आहेत. त्यांची दोन्ही फुफ्फुसे पोखरली गेली आहेत. रोगी म्हणून अंथरुणावर पडून राहण्याचा त्यांचा स्वभाव नाही आणि ज्याला हातखंडा म्हणता येईल, असे औषध अजून तरी आमच्या हाती आलेले नाही.''