थोरले साहेब - ६

थोरल्या साहेबांविषयी दोन शब्द

यशवंतराव चव्हाण यांनी स्वतः लिहिलेल्या, इतरांनी चव्हाण साहेबांविषयी लिहिलेल्या व त्यांच्या भाषणांचे संग्रह असे बरेच साहित्य सध्या उपलब्ध आहे.  यातील काही मराठी तर काही इंग्रजी भाषेत आहे.  प्रा. विजय पाथ्रीकरांच्या 'थोरले साहेब' या कादंबरीने चव्हाण साहित्यात मोलाची भर पडली आहे.

या कादंबरीच्या सूत्रधार वेणुताई आहेत.  वेणुताई १९४२ साली विवाहानंतर चव्हाण कुटुंबीयांत कराडला दाखल झाल्या.  वेणुताईंचा मृत्यू १९८३ साली दिल्ली येथे झाला.  हा सर्व काळ त्या साहेबांची सावली बनून राहिल्या.  ४१ वर्षांचा काळ म्हणजे स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर असा आहे.  कराड ते दिल्ली व्हाया मुंबई असा चव्हाण कुटुंबीयांचा राजकीय प्रवास आहे.  चव्हाण साहेबांच्या भाषेत सांगायचे झाले तर कृष्णाकाठ, सागरतीर ते यमुनाकाठ असा हा प्रवास आहे.  स्वातंत्र्यसंग्राम ते सत्ता व्हाया तुरुंगवास अशी ही सफर आहे.  टोकाच्या गरिबीपासून ते उपपंतप्रधानपद अशी ही सफर आहे.  नुसते कराड मतदारसंघाचे आमदार, नंतर पार्लमेंटरी सेक्रेटरी, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, उपपंतप्रधान असा प्रवास नाही तर महाराष्ट्र राज्य निर्मितीचा मंगल कलश आणणारे मुख्यमंत्री अन् एका अर्थाने महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार !  या सगळ्या घटनांकडे इतिहास एका नजरेने पाहतो, पत्रकारिता एका नजरेने पाहते, चव्हाण साहेबांचे सहकारी एका नजरेने पाहतात तर साहेबांचे विरोधक एका नजरेने पाहतात.  सरकारी दफ्तरातल्या नोंदीही या घटनांची नोंद घेत असतात.  या सर्व बाबी लिखित स्वरूपात वेगवेगळ्या रूपाने अभ्यासक व जिज्ञासूंपुढे आलेल्या आहेत.  दहा दिशांना पसरलेल्या या माहितीला एक अकरावी दिशा आहे.  यशवंतरावांच्या कुटुंबातून दिसणार्‍या या घटनांची ती दिशा वेणुताईंच्या नजरेतून प्रा. डॉ. विजय पाथ्रीकरांनी पाहण्याचा यशस्वी प्रयत्‍न केला आहे.  हे अवघड काम असले तरी लेखकाला ते साध्य झाले आहे.  

घटना-घटनाक्रम काटेकोर मांडले आहेत.  वेणुताईंच्या मनात त्या वेळी काय झाले असेल, त्यांनी त्याप्रसंगी काय कृती केली असेल याचे यथार्थ, प्रभावी व रसाळ वर्णन प्रा. डॉ. विजय पाथ्रीकरांनी केले आहे.  यासाठी त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले आहेत याची जाणीव वाचताना सतत होत राहते.  थोरांच्या कौटुंबिक जीवनाविषयी सामान्यांना जिज्ञासा असते.  महाराष्ट्राच्या या जाणत्या राजाच्या कौटुंबिक आयुष्याबद्दल ती आहेच.  ती जिज्ञासा या लिखाणामुळे पूर्ण होते.  'थोरल्या साहेबां'च्या निमित्ताने वेणुताईंच्या नजरेतून महाराष्ट्राचा जो राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व पक्षीय राजकारणाचा इतिहास नजरेसमोर येतो तो सध्याच्या पिढीला उद्‍बोधक ठरेल.

इतिहासाच्या चौकटी न मोडता घटनांशी इमान राखून लिहिलेल्या या रसाळ कादंबरीबद्दल प्रा. डॉ. विजय पाथ्रिकरांचे उभा महाराष्ट्र अभिनंदन करेल.


विनायक पाटील
(माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य)
कदंबवन, नाशिक-४२२ ०१२